शेख, साबीर

शेख, साबीर

शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासून अखेर पर्यंत एकनिष्ठ असलेले आणि बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय तसंच शिवसेनेचा मुस्लिम चेहरा अशी ओळखले असणारे नेते म्हणजे साबीर शेख ! साबीर शेख यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे १५ मार्च १९४५ रोजी झाला होता. साबीर शेख यांचे शालेय शिक्षण नारायणगावातील शाळेत झाले. त्यानंतर ते अंबरनाथ येथील “ऑर्डनन्स फॅक्टरीत” नोकरी करू लागले, आणि तेथेच कामगार नेते म्हणून नावारूपाला आले. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून येणारे साबीर शेख हे युती सरकारच्या काळात ते कामगार खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. समाजातील प्रत्येक व्यक्तीला समावून घेतल्यामुळे त्यांचा जनसंपर्क ही दांडगा होता. ठाणे जिल्ह्यातील कामगारांच्या अडचणी सोडविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. कल्याणच्या उपशहरप्रमुखापासून ते ठाणे जिल्हाप्रमुखापर्यंत विविध पदे त्यांनी भूषवली. ज्ञानेश्वरीचे भाष्यकार, शिवचरित्राचे अभ्यासक, कीर्तन-प्रवचनासोबतच हिंदू धर्म, संत वाङ्‌मय, साहित्य आणि दुर्गप्रेमी म्हणून ते प्रसिद्ध होते.

साबीर शेख आमदार असताना देखील कल्याणजवळच्या कोन गावातील एका चाळीत राहात होते यावरुन त्यांचा साधेपणाची जाणीव होते. शिवचरित्र मुखोद्गत असलेल्या साबीरभाईंनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, गो. नी. दांडेकर यांच्याबरोबर महाराष्ट्रातील अनेक गड-किल्ले पालथे घातले. बाळासाहेब ठाकरेंनी साबीरभाईंना “शिवभक्त” ही पदवी दिली होती.

साबीर शेख यांच्या अअयुष्यातील अखेरच्या काही महिन्यांपूर्वी प्रसारमाध्यमांनी साबीर शेख कसे विपन्नावस्थेत जीवन जगताहेत, याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर त्यांना अनेकांनी मदत केली होती. मात्र पुन्हा त्यांची दयनीय अवस्था झाल्यानं त्यांना कोन गावच्या घरातून “कल्पतरू युवाविकास मंच”ने पुढाकार घेऊन औरंगाबादच्या “मातोश्री वृद्धाश्रमा”त नेण्यात आलं होतं. १५ ऑक्टोबर २०१४ या दिवशी त्यांचे निधन झाले.

(लेखन व संशोधन – सागर मालाडकर)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*