रमाबाई महादेव रानडे

स्त्री शिक्षण ज्याकाळात सामाजिकदृष्ट्या वर्ज्य मानली जात होती अश्या परिस्थितीत शिक्षणासाठी पुढाकार घेणारी महिला म्हणजे रमाबाई महादेव रानडे.

या थोर विभुतीचा जन्म २५ जानेवारी १८६२ रोजी सातारा जिल्ह्यातील एका लहानशा खेड्यात झाला. रमाबाईंना माहेरी असताना अक्षर ओळख झाली नव्हती,आणि वयाच्या ११व्या वर्षी त्यांचा महादेव गोविंद रानडे यांच्याशी विवाह झाला. त्यांचे पती महादेव गोविंद रानडे हे सामाजिक चळवळ आणि नवविचारी मतवादाचे खंदे पुरस्कर्ते होते. घरच्यांच्या आणि समाजाच्या विरोधाला झुगारून महादेव रानडे यांनी आपल्या पत्नीस म्हणजेच रमाबाई रानडेंना शिक्षण दिले.लग्नानंतर रमाबाईंच्या शिक्षणाची सुरुवात झाली. रमाबाईंनी मराठी, हिंदी आणि बंगाली या भाषांमध्ये विशेष प्रावीण्य संपादन केले.

न्यायमूर्ती रानड्यांच्या कार्यापासून प्रेरित होऊन रमाबाई स्त्री समाज सुधारणा चळवळीमध्ये सामील झाल्या. स्त्रियांच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी आणि व्यासपीठ निर्माण करण्यासाठी “हिंदू लेडीज सोशल क्लब”ची मुंबईमध्ये स्थापना केली. पुण्यातील “सेवा सदन” या संस्थेच्या अध्यक्षपद त्यांनी भूषवले. सेवा सदनचा झपाट्याने झालेला विस्तार आणि प्रसार हा रमाबाईंच्या ध्यासाचेच द्योतक आहे. समाजातील वाईट रूढी, परंपरा यांना विरोध करत त्यांनी अस्पृश्यता, बालविवाह आणि सती या प्रथांविरोधात आवाज उठवत व ठाम भूमिका घेऊन समाजाचे मतपरिवर्तन करून, आपल्या सेवेचे व्रत अखंडपणे सुरू ठेवण्यातच रमाबाईंच्या जीवनाचे मुख्य कर्तव्य होते.१९१३ साली गुजरात आणि काठेवाड येथील दुष्काळग्रस्त भागांना भेट देऊन दुष्काळपीडितांना मदत केली. आयुष्याच्या अखेरच्या काही वर्षांमध्ये त्या आपल्या सेवा सदनच्या कार्यकर्त्यांसोबत आषाढी आणि कार्तिकी वारीच्या वेळी आळंदीला जात असत. तेथे सेवा सदनच्या कार्यकर्त्या वारीला आलेल्या स्त्री वारकऱ्यांना मोफत औषधोपचार करीत असत. त्यांच्या अशा सामाजिक कार्यातून समाजसेवेच्या कार्यात एकूणच स्त्रियांचा सहभाग वाढत गेला. इ.स. १९०४ मध्ये जेव्हा रामकृष्ण गोपाळ भांडारकर, श्री. भाजेकर आणि सामजिक चळवळीतील नेत्यांनी अखिल भारतीय महिला परिषद आयोजित करण्याचे ठरवले तेव्हा त्यांनी रमाबाईंकडे या कार्याची सूत्रे सपूर्द केली. रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली या परिषदेचे पहिले अधिवेशन डिसेंबर १९०४ रोजी मुंबई येथे भरले होते.

१९०८ मध्ये श्री. बी.एम. मलबारी आणि श्री. दयाराम गिडुमल हे, रमाबाईंकडे स्त्रियांना रुग्णसेवेचे प्रशिक्षण देऊन समाजात रुग्णसेविका निर्माण करण्याची कल्पना घेऊन आले.रमाबाईं रानडेंच्या आयुष्यातील अजून दोन अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टी म्हणजे, स्त्रियांसाठी अनिवार्य प्राथमिक शिक्षणाची मागणी करण्यासाठी केलेले आंदोलन आणि १९२१-२२ मध्ये मुंबई प्रांतात स्थापन केलेली पीडित महिलांची संघटना. पुण्यात देखील मुलींसाठी ‘हुजुरपागा’ शाळेची स्थापना केली. १९१५ साली, सेवा सदन, पुणे उदयास आली आणि मग अनेक शाखांमार्फत संस्था विस्तारत गेली. मुलींचे प्रशिक्षण केंद्र, तीन वसतीगृहे असे अनेक उपक्रम सेवा सदनमार्फत राबवले गेले. त्यांनी आपला जीवनपट ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’ या पुस्तकात शब्दबद्ध करून ठेवला आहे. २६ एप्रिल १९२४ रोजी रमाबाई रानडे यांचे पुणे मुक्कामी सेवा सदनच्या इमारतीत निधन झाले.

रमाबाई रानडेंच्या सन्मानाप्रीत्यर्थ त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात भारतीय टपाल खात्याने १५ ऑगस्ट १९६२ रोजी त्यांचे छायाचित्र असलेले पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले होते.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*