राजाभाऊ चितळे

मराठी माणसाकडे व्यावसायिक बुध्दी नाही किंवा त्याच्याकडे इतर ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी लागणारे संभाषण चातुर्य व व्यवसाय फोफावण्यासाठी लागणारी मेहेनती वृत्ती नाही अशा विधानांना छेद देणारे अनेक मराठी व्यावसायिक महाराष्ट्रात, भारतात, व जगात होवून गेले आहेत.

अतिशय उत्तम चव व दर्जा, रास्त किंमत, निरनिराळ्या सण समारंभांसाठी लागणार्‍या मिठाई, पक्वानांची व इतर पदार्थांची भरपुर रेलचेल, व टिकाऊपणा या मुलभूत वैशिष्ठांच्या जोरावर चितळे गृह्द्योगाने आपले नाव सर्वसामान्य नोकरदार माणसाच्या ह्रद्यावर कोरले आहे. कुठलाही सण असो वा कार्यक्रम, कुठे सहल जाणार असो किंवा अचानक पाहुणे येणार असोत, प्रत्येक मराठी माणसाची पाऊले ही आपसुकच चितळेंच्या दुकानाकडे वळतात. इतके वर्ष जपलेला घरगुतीपणा व त्याला दिलेला व्यावसायिकतेचा हळुवार स्पर्श ही चितळेंच्या मिठाईची खासियत. आज चितळेंची मिठाई तिच्या प्रचंड गुणवत्तेच्या व अवीट माधुर्याच्या बळावर केवळ भारतालाच नव्हे तर अगदी परदेशालासुध्दा प्रदक्षिणा घालून आली आहे. चितळेंच्या व्यावसायिक पंखांनी आज महाराष्ट्राधील लहानतल्या लहान गावांनासुध्दा आपल्या कवेत घेतल आहे. चितळेंच्या या अभुतपुर्व यशामागे त्यांच्याच चार हातांनी घेतलेली अपार मेहेनत, व लढवलेल्या अनेक कल्पक युक्त्या आहेत. हे चार हात म्हणजेच रघुनाथराव चितळे व राजाभाऊ चितळे, कोल्हापूरमधील प्रसिध्द डेअरीचालक बी. जी चितळे यांचे सुपुत्र.

राजाभाऊ चितळे यांचा जन्म २२ ऑगस्ट, १९३२ रोजी कोल्हापुर येथे झाला. राजाभाऊंनी त्यांचे पदवी शिक्षण बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स ला १९५४ मधे पुर्ण झाले. त्यानंतर त्यांनी त्यांचे थोरले भाऊ रघुनाथराव यांच्यासोबत वडिलोपार्जित डेअरी व मिठाई चा व्यवसाय पुढे चालवण्यास सुरूवात केली. सुरूवातीला चितळे हे नाव पुण्यातील काही गल्ल्यांपर्यंत मर्यादित होते. परंतु जसे जसे हे पदार्थ लोकांच्या पसंतीस उतरले तसा हा व्यवसाय फुगतच गेला व या सर्व व्यवसायाच्या आधुनिकीकरणाची व घरगुतीपणाला अद्ययावत तंत्रज्ञानाची सुंदर जोड देण्याची जबाबदारी उचलली ती राजाभाऊंच्या कल्पक हातांनी. रघुनाथरावांनी चितळेंच्या अभेद्य साम्राज्याचा पाया रचला तर राजाभाऊंनी त्या साम्राज्याचं मजबूत जाळं महाराष्ट्रभर विणून त्यावर सुवर्णकळस चढविला. राजाभाऊ मिठाई असोसिएशन ऑफ इंडिया चे अध्यक्ष होते. तसेच ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इन्डस्ट्रीस, अँड अ‍ॅग्रीकल्चर ( MCCIA) चे सक्रीय सभासद होते. नाफरी ला असलेल्या भारतामधील सर्वात प्रतिष्ठीत व अद्ययावत अश्या खाद्य तंत्रज्ञान प्रयोगशाळेचे ते पदाधिकारी सुध्दा होते.

राजाभाऊंच्या संपन्न व्यक्तिमत्वामधला आणखी एक विलोभनीय पैलु म्हणजे ते एक उत्तम बास्केटबॉल खेळाडु होते. त्यांनी पुणे जिल्हा बास्केट बॉल असोसिएशन चे अध्यक्षपद देखील भुषविले होते. 1975 मधे डेअरी चालवत असताना दुधात भेसळ करणार्‍यांच्या कारवाया मोडून काढण्यासाठी त्यांनी पाऊच मध्ये दुध विकण्याचा पायंडा पाडून दुध व्यवसायाच्या गुण्वत्तेमध्ये, व दरांमध्ये अनोखी क्रांती घडविली होती. चितळे बंधुंचे आजचे खाद्यपदार्थ निर्मीती कारखाने बघितले तर तिथे सर्वात अद्ययावत व बाहेरून मागवलेली यंत्रसामुग्री आपणास दिसते. खाद्यपदार्थ बनविण्याच्या संपुर्ण प्रक्रियेमधये कुठेही हातांचा वापर केला जात नाही. याचे सर्व श्रेय अर्थातच राजाभाऊंना जाते. अशा या सर्व मराठी जगताला अभिमान वाटायला लावणार्‍या राजाभाऊंचे प्रदिर्घ आजाराने वयाच्या ७८ व्या वर्षी जोशी हॉस्पिटलमध्ये निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

1 Comment on राजाभाऊ चितळे

Leave a Reply

Your email address will not be published.


*