मोरेश्वर वासुदेव उर्फ बंडोपंत सोलापूरकर

मोरेश्वर वासुदेव उर्फ बंडोपंत सोलापूरकर यांचा जन्म १८ एप्रिल १९३३ रोजी झाला.

बँड संस्कृती रुजवण्यात महत्त्वाची भूमिका असलेलं अनुभवी व्यक्तिमत्त्व म्हणून बंडोपंत सोलापूरकर यांची ख्याती होती. त्यांनी बँडची संस्कृती नुसती रुजवलीच नाही, तर तिला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्याचे महत्त्व अधोरेखित केले. वयाच्या सातव्या वर्षांपासून त्यांनी त्यांचे मोठे बंधू अण्णासाहेब सोलापूरकर यांच्याकडे क्लॅरोनेट वादनाचे प्राथमिक आणि पंडित नागेश खळीकर यांच्याकडे गायकी अंगाने वादनाचे धडे गिरवले. उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांच्या मार्गदर्शनाखाली लयकारी आणि मिंड यांतील बारकाव्यांचा अभ्यास केला.

प्रभात फिल्म कंपनीच्या संगीत विभागात काम करताना ‘माणूस’सारख्या चित्रपटातही क्लॅरोनेट वाजवले होते. तसेच राम कदम, कल्याणजी आनंदजी, रवींद्र जैन, वसंत देसाई आदी संगीतकारांसह काम केले. ‘गुळाचा गणपती’, ‘बाळा जो जो रे’, ‘माहेरची साडी’, ‘राम लखन’ आदी अनेक चित्रपटांसाठीही वादन केले. एकल वादनातून मोठी लोकप्रियता मिळत असतानाही त्यांनी बँडकडे दुर्लक्ष केले नाही. उलट, या दोन्हीत योग्य तो समन्वय राखत त्यांनी दोन्ही गोष्टी जनमानसात पोहोचवल्या.

प्रभात बँडने अमृतमहोत्सवी वर्ष पूर्ण केले आहे. सोलापूरकर कुटुंबीयांनी स्थापन केलेल्या या बँडपथकाने मिरवणुकीमध्ये ब्रास असलेल्या वाद्यांवर मराठी गीतांचे वादन ही प्रथा सुरू केली. क्लॅरोनेटवादक म्हणून ख्याती असलेले बंडोपंत सोलापूरकर हे सॅक्सोफोन, ट्रम्पेट अशा ब्रासच्या वाद्यवादनासह अनेक वर्षे गणपती मंडळाच्या मिरवणुकीच्या अग्रभागी असायचे.

बंडोपंत सोलापूरकर यांचे २३ जानेवारी २०१३ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*