किरण नगरकर

नामांकित लेखक व द्विभाषिक कादंबरीकार

भारतातील हाताच्या बोटांवर मोजता येणार्‍या द्विभाषिक लेखकांमध्ये व नामांकित कादंबरीकारांमध्ये किरण नगरकर ह्यांचे नाव प्राधान्याने घेण्यात येते.

मुंबई या महानगरीतील कनिष्ठ वर्गीयांचे खुमासदार आणि अंतर्मुख करणारे वर्णन वाचकांसमोर उलगडणारी, नगरकरांची १९९४ साली प्रकाशित झालेली ‘रावण अँड एडी’ ही कादंबरी बहुचर्चित ठरली. या कादंबरीमधईल काही अजरामर प्रसंग व चित्तवेधक संवाद आजही वाचकांच्या चांगलेच स्मरणात आहेत. या कादंबरीचा पुढचा भाग द एक्स्ट्राज’ हार्पर कॉलिन्स या प्रख्यात प्रकाशन संस्थेने प्रकाशित केला, व त्यालासुध्दा ‘न भुतो न भविष्यती’ असा वाचक प्रतिसाद मिळाला. उद्घाटनप्रसंगी प्रसिध्द चित्रपट अभिनेते नसिरूद्दीन शाह यांनी या कादंबरीच्या निवडक परिच्छेदांचे वाचन केले होते. ‘सात सक्कं त्रेचाळीस’ या पहिल्या कादंबरीमधून मराठी साहित्यसृष्टीमध्ये दमदार व काहीसे खळबळजनक पदार्पण केल्यानंतर, किरण नगरकरांनी इंग्रजी भाषेत अनेक सुरस व दर्जेदार कादंबर्‍या लिहिल्या. त्यापैकी रावण अँड एडी, आणि ककल्ड (प्रतिस्पर्धी) या दोन कादंबर्‍यांचा मराठीत अनुवाद करण्यात आला.

कक्ल्ड या त्यांच्या गाजलेल्या कादंबरीला २००२ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. जर्मन, फ्रेंच, इटालियन, स्पॅनिश, पोर्तुगीज या विदेशी भाषांमध्ये त्यांच्या कादंबर्‍या अनुवादित झाल्यामुळे त्यांच्या नावाला, व अर्थात सिध्दहस्त लेखणीला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली आहे. न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्सच्या डिस्कव्हरी मालिकेत २०१२ च्या प्रकाशनांत रावण अँड एडी ही पहिली भारतीय कादंबरी ई-बुकच्या स्वरूपात प्रकाशित झाली. त्यामुळे भारतीय व मराठी साहित्याचे विचार तसेच संस्कृती सातासमुद्रापलीकडे पोहोचविण्याचा विक्रम त्यांनी आपल्या लेखनाच्या जोरावर केला, असे म्हणावे लागेल. लिटप्रॉम ही आशियाई आणि लॅटिन अमेरिकी साहित्याला प्रोत्साहन देणारी जागतिक संस्था आहे. ह्या संस्थेने केलेल्या क्रमवारीनुसार जगातील ३० सर्वोत्कृष्ट लेखकांमध्ये किरण नगरकर यांची १२व्या क्रमांकावर वर्णी लागली आहे. ही क्रमवारी सर्वेक्षणाच्या माध्यमातून ठरविण्यात येते. त्यांची ‘गॉड लिटील सोल्जर’ ही कादंबरी ‘लिटप्रॉम’च्या तीस सर्वोत्कृष्ट पुस्तकांपैकी एक आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

— किरण नगरकर

## Kiran Nagarkar

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*