डॉ. राजन गवस

मराठी लेखक डॉ. राजन गवस यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९५९ रोजी झाला. राजन गवस यांनी भाऊं पाध्ये यांच्या साहित्यावर पीएच. डी. केलेली आहे. राजन गवस यांनी साधारण ऐंशीच्या दशकात लिहायला सुरुवात केली. कविता, कथा, कादंबरी आणि ललित लेखन अशा मार्गावरून त्यांची लेखणी चालत राहिली. या सा-याच लेखनात राजन गवस यांच्या लेखनाचे तीन पैलू प्रामुख्यानं नजरेत भरतात.

‘भंडारभोग’ या जोगत्याच्या जीवनावरच्या कादंबरीत सुरुवातीच्या भागात क‘व्वा वगैरे पात्रं अंधश्रद्धेनं अत्यंत अडाणी, चुकीचं आणि अन्याय्य वागत असतानादेखील गवस यांच्यातला निवेदक अशा पात्रांचा उपहास करत नाही.

शक्यतो मतं बनवण्याचं स्वातंत्र्य वाचकालाच द्यायचं परिपक्व भान दाखवतात गवस. अजून एक अंतर्विरोध म्हणजे कधी राजन गवस यांचा नायक किंवा निवेदक कृषिसंस्कृतीचं प्रतिनिधित्व करतो, तर कधी त्या संस्कृतीपासून दूर गेलेल्या, अपराधगंड बाळगणार्या व्यक्तींचं प्रतिनिधित्व करतो.

राजन गवस यांनी प्रामुख्याने तीन-चार विषयांवर लिहिलं आहे. सर्वप्रथम म्हणजे ‘देवदासी’ आणि ‘जोगते’ या अनिष्ट रूढींच्या भयावह वास्तवाचं चित्रण. ‘चौंडकं’, ‘भंडारभोग’ या कादंब-या आणि ‘खांडुक’, ‘हुंदका’ यासारख्या कथांमधून ते प्रगटतं. दुसरा विषय म्हणजे गावपातळीवर चालणारं पंचायती, सोसायट्या वगैरेमधलं राजकारण आणि त्याला असलेली जातीयतेची डूब.

‘रिवणावायली मुंगी’, ‘तळ’, ‘घुसमट’ अशा अनेक कथा स्त्रीकेंद्री आशय व्यक्त करतात. एकूणच, हरवत चाललेली मूल्यं, निसर्ग आणि माणूसपण हे त्यांच्या ललित लेखनचे विषय आहेत. बाईचं जगणं मात्र नेहमीच त्यांच्या लेखनाच्या केंद्रस्थानी आहे.

भालचंद्र नेमाडे, भाऊ पाध्ये आणि रंगनाथ पठारे यांच्या साहित्यावर राजन गवस यांनी बारकाईनं अभ्यास करून समीक्षात्मक लेखन-संपादन केलं आहे. गवस यांच्या साहित्यात मांडणी आणि अभिव्यक्तीवर कळत-नकळतपणे या साहित्यिकांचा प्रभाव पडलेला दिसतोच.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*