शिदे, विठ्ठल रामजी

Shinde, Vitthal Ramji

 

‘ग्रामीण जनतेची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे आणि सर्व चळवळींना नैतिक अधिष्ठान असले पाहिजे’ असे उदात्त विचार आणि तपस्वी जीवनाचा पुरस्कार करणारे विठ्ठल रामजी तथा महर्षी अण्णासाहेब शिदे. जमखिडी येथील एका धार्मिक कुटुंबात १८७३ ला अण्णासाहेब शिद्यांचा जन्म झाला. आईवडिलांच्या संस्कारामुळे लहानपणीच भागवत धर्माचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला. घरची परिस्थिती बेताचीच. त्यामुळे त्यांनी आपले सर्व शिक्षण स्वकष्टावरच केले. १८९१ साली मॅट्रिक झाल्यानंतर पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी बी. ए. ची पदवी मिळवली. एल्एल्. बी. च्या प्रथम वर्षाचा अभ्यास पूर्ण झाल्यावर मात्र प्रार्थना समाजाचे प्रचारक म्हणून त्यांनी आपले कार्य सुरू केले. याच कार्यासाठी त्यांना युनिटेरियन शिष्यवृत्ती मिळाली. आणि ते ऑक्सफर्ड येथे मँचेस्टर कॉलेजात तुलनात्मक धर्मशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी गेले. तेथे त्यांनी लिव्हरपूल व अॅमस्टरडमयेथील युनिटेरियन परिषदेत सहभाग घेऊन ‘लिबरल रिलिजन इंडिया’ या आपल्या निबंधाचे वाचन केले. भारतात परत आल्यानंतर प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी त्यांनी तीन वेळा आसेतू हिमालय प्रवास केला. त्यानंतर ते ब्रह्मदेशात सुद्धा जाऊन आले. १९०६ मध्ये त्यांनी ‘डिप्रेस्ड क्लास मिशन सोसायटी ऑफ इंडिया’ उर्फ भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळाची स्थापना केली. १९१० मध्ये प्रार्थना समाजातून बाहेर पडल्यावर अस्पृश्यता निवारणाचे कार्य त्यांनी हाती घेतले. या कार्यासाठी काम करताना त्यांनी देशभर शाखा काढल्या. त्यांचे विविध विषयांचे वाचन व चितन याचा दांडगा व्यासंग होता. महाराष्ट्र अनेक ठिकाणी सामाजिक सुधारणेवर व्याख्यानं, वृत्तपत्रांमधून लिखाण तसेच त्यांचे काही ग्रंथसुद्धा प्रसिद्ध आहेत. पुण्याच्या दलित वस्तीत त्यांनी आपले आणि कुटुं बाचे वास्तव्य केले होते. त्यांनी दलित विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची स्थापना केली. १९३० च्या असहकार चळवळीत सहभाग घेतल्याबद्दल त्यांनी सश्रम कारावासही भोगला होता. १९३५ साली बडोदे येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र या दोन विषयांच्या शाखा संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. महर्षी शिंदे

हे कर्मकांडाचे व रूढींचे विरोधक असले तरी वृत्तीने धार्मिक होते. जीवनातील एकात्मतेचा त्यांनी नेहमी पुरस्कार केला. समाजासाठी आदराचे स्थान बनलेल्या महर्षी शिद्यांनी अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली. त्यांच्या नावावर बरीच ग्रंथसंपदा आहे. ‘विठ्ठल रामजी शिंदे यांचे लेख, व्याख्याने व उपदेश’, ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’, ‘माझ्या आठवणी व अनुभव’, ‘शिदे लेखसंग्रह’ आणि ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची रोजनिशी’ अशा या भाषाशास्त्रज्ञ, निर्भय समाजसुधारक आणि उदारमतवादी विचारवंताचे २ जानेवारी १९४४ रोजी निधन झाले.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*