आडनावाची खरोखर गरज आहे का?

आडनावाची खरोखर गरज आहे का? आडनावे काय सांगतात? आडनाव सोडले तर काय बिघडते?

विवाहानंतर महिलांनी कोणते आडनाव लावावे? सासरचे? की माहेरचे आडनाव सोडूच नये? की सासर-माहेरचे जोड आडनाव धारण करावे?

कुलनाम, आडनाव, सरनेम, फॅमिली नेम, लास्ट नेम वगैरे शब्दांनी परिचित असलेले कुटुंबाचे नाव हे जगभर आवश्यक समजले जाते आणि बव्हंशी प्रत्येक कुटुंबाला असतेच असते. व्यक्तीची आणि कुटुंबाची ओळख म्हणून कायदेशीर दस्तअैवजात किंवा कागदपत्रात नोंदी करण्यासाठी आडनाव ही अेक आवश्यक बाब आहे. आडनावांच्या बाबतीत बरीच क्रियापदे वापरली जातात. आडनाव पिढीजात चालत आले, पडले, रूढ झाले, घडले, घेतले, सोडले, धारण केले, पुसले, आडनावाचा त्याग केला वगैरे.

अेक गोष्ट मात्र सर्वांनी लक्षात असू द्यावी. या लेखात, ज्या आडनावांचा मी अुल्लेख केला आहे, संदर्भ दिला आहे ती आडनावे प्रत्यक्षात आहेत, अस्तित्वात आहेत. त्या आडनावांच्या व्यक्तिंचा किवा त्या आडनावांचा अुपहास, अुपमर्द, हेटाळणी, निदा किवा स्तुती करण्याचा मुळीच अुद्देश नाही. तरी त्या आडनावांच्या व्यक्तींनी कृपया कोणताही गैरसमज करून घेअू नये.

आडनाव प्रचलीत होण्यासाठी प्रथम ते, त्या कुटुंबाने स्वीकारले पाहिजे. काहीतरी कारणामुळे ते स्वीकारले जाते, मग ते पिढ्यान् पिढ्या चालू राहते. अशारितीने प्रत्येक आडनावाला अितिहास असतो. बव्हंशी व्यक्तींना तो माहित नसतो. काहींना तो दंतकथा किंवा आख्यायिकांच्या स्वरूपात माहित असतो. तर काही व्यक्तींनी तो घडविला असतो. अेखाद्या कुटुंबातील व्यक्तिला विचारले की तुमचे आडनाव कसे रूढ झाले? किवा केव्हापासून रूढ झाले? तर ते त्याला नक्की सांगता येणार नाही किवा ती व्यक्ती तिच्या आडनावाबद्दल कांही आख्यायिका सांगेल. ती अैकून तुम्हाला अचंबा वाटेल की अितक्या लहानशा व क्षुल्लक घटनेमुळे, प्रसंगामुळे किंवा बाबीवरून हे आडनाव कसे पडले? म्हणजे रूढ झाले आणि ते पिढ्यानपिढ्या कसे चालू राहिले?

त्या त्या कुळातील सर्व व्यक्तींचे कुलनाम सामाअीक असते म्हणून त्या कुलनामाला श्रेष्ठनाम असे म्हणण्याचा प्रघात पडला. कानडी भाषेत श्रेष्ठ ह्या अर्थी ‘अड्ड‘ हा शब्द आहे म्हणून कुळनामाअैवजी ‘अड्डनाम‘ हा शब्दप्रयोग रूढ झाला आणि पुढे त्याचे ‘आडनाव‘ असे रूपांतर झाले. कुलनाम हा शब्दप्रयोगही चांगला आहे पण तो क्वचितच वापरला जातो. अर्धनाम या संस्कृत शब्दाचे अडनाम किंवा आडनाव हे अपभ्रष्ट रूप आहे असे काहीजण प्रतिपादतात. परंतू ही व्युत्पत्ती अर्थाला अनुकूल नाही असे डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकरांचे मत आहे.

कुणाला वडिलोपार्जित अिस्टेट भरपूर मिळते तर कुणाला अजिबात मिळत नाही पण आडनावाचा वारसा मात्र, अगदी नको असला तरी, मिळतो. आडनाव कसेही असले तरी आपण ते आपल्या नावासमोर मोठ्या अभिमानाने लावतो. पिढ्यानपिढ्या आडनावाचा वारसा चालू राहतो.

जगभरची कुलनामे म्हणजेच आडनावे रूढ होण्याच्या पध्दती आणि कारणे जवळजवळ सारखीच आहेत. निवास, व्यवसाय, जात, कर्तृत्व, पद, हुद्दा, स्वभाव, सवयी, गुणावगुण, व्यंग वगैरेंमुळे आडनाव पडते किंवा बर्‍याच वेळी ते समाजाकडून किंवा प्रतिष्ठित व्यक्तीकडून त्या कुटुंबावर लादले जाते. कारण अुघड आहे…विचित्र, विक्षिप्त, लाजिरवाणे आडनाव, ते कुटुंब आपणहून स्वीकारणार नाही. काही आडनावे तर अितकी अश्लील आहेत की त्यांचा अुल्लेख करणे देखील असभ्यपणाचे ठरेल. पण ही आडनावे पिढ्यान् पिढ्या वापरली जाताहेत. प्राणी, भाज्या, घरगुती वापरावयाच्या वस्तू आणि पदार्थ, शरीराचे अवयव वगैरेमुळे ही मराठी आडनावे रूढ झाली आहेत. काही आडनावे तर, त्यांच्या मूळ स्वरूपाचा अपभ्रंश झाल्यामुळे, निरर्थकच वाटतात. मराठी आडनावांचे, त्यांच्या स्वरूपावरून, ज्ञातीवरून किंवा अशाच काही वैशिष्ठ्यावरून काही गट तयार करता येतात.

मराठी आडनावात, संस्कृती, शिक्षण, संस्कार, चालीरिती, रितीरिवाज, नीतीमत्ता, गरीबीश्रीमंती, विद्वत्ता वगैरेंचा प्रभाव पडला आहे. अितकी विविध, वैचित्र्यपूर्ण आणि काही विक्षिप्तही आडनावे कशी प्रचारात आली, स्वीकारली गेली, रूढ झाली, अितकेच नव्हे तर त्या आडनावांचा वारसा पिढ्यान् पिढ्या कसा चालू राहिला हे अेक फार गहन असे गूढ आहे. या मागे कोणतेतरी प्रबळ कारण असले पाहिजे. समाजाने लादलेली आडनावे काही पिढ्यानंतर पचविली जातात. आडनाव कसेही असले तरी त्या कुटुंबांना त्याचा अभिमानच वाटतो आणि ते आडनाव त्यांना बदलावेसेही वाटत नाही कारण तसे केले तर सगेसोयरे आणि परिचितांमधली त्या कुटुंबाची ओळख पुसली जाते. बव्हंशी स्त्रियांना, लग्नानंतर, सासरच्या आवडीचे आणखी अेक नाव ठेवले जाते. लग्नानंतर आडनाव आणि नावही बदलल्यामुळे तिची, लग्नापूर्वीची ओळख म्हणजे आयडेंटिटी पूर्णतया पुसली जाते. पण हे दिव्य करायला ती राजी असते. स्वतंत्रवृत्तीच्या किंवा स्वतंत्रबाण्याच्या, स्वाभिमानी कर्तृत्ववान महिलांना ही बाब खूपच खटकते. म्हणूनच त्या आपले नाव आणि आडनाव विवाहानंतर बदलीत नाहीत किंवा थोडी तडजोड करून माहेर-सासरचे आडनाव मिळून तयार झालेले जोड-आडनाव लावतात. पाश्चिमात्य देशातही काही महिलांनी विवाहानंतर जोड-आडनावे स्वीकारल्याचे संदर्भ आढळतात.

— गजानन वामनाचार्य

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*