आडनावाचीही पसंती हवी

विवाह जुळवितांना किंवा जुळतांना, मुलाचे आडनाव बरेच वेळा अडचणीचे होते. लग्नानंतर विचित्र, विक्षिप्त, खटकणारे किंवा लाजिरवाणे आडनाव स्वीकारण्यास काही मुली तयार नसतात. अशावेळी, एकतर नवर्‍या मुलाने आपले आडनाव बदलून घ्यावे किंवा मुलीने लग्नानंतरही माहेरचेच आडनाव लावावे. काही व्यक्तींना असे वाटते की, अंक शास्त्रानुसार नावात किंवा आडनावात बदल करावा किंवा नाव/आडनावच बदलावे. खरे पाहिले तर समाजाला जे नाव/आडनाव स्वीकारार्ह असेल त्यानेच लाभ होणार असतो.

काही मराठी आडनावे इतकी विचित्र आणि लाजिरवाणी असतात की, ती, त्या कुटुंबांनी का स्वीकारली, कोणत्या कारणामुळे रूढ झाली आणि पिढ्यानपिढ्या कशी वापरात ठेवली हे फार मोठे गूढ आहे. अशी आडनावे धारण करून समाजात वावरणार्‍या मुला-मुलींना विशेषतः विद्यार्थी/विद्यार्थीनींना आणि लेकी-सुनांना टीका, निंदा, हेटाळणी आणि टिंगल यांना सतत तोंड द्यावे लागते, मनस्ताप सहन करावा लागतो अशी अडचणीची आडनावे बदलण्याची आवश्यकता आहे. ती आडनावे बदलून घ्यावीशी वाटण्याची प्रेरणा समाजात रुजली पाहिजे. समाजासाठी आडनाव धारण करून, समाजात वावरावयाचे असल्याने, विक्षिप्त आडनावे हा सामाजिक कलंक आहे असे मी मानतो आणि तो पुसण्यासाठी, धुवून काढण्यासाठी पुरोगामी बदलत्या दृष्टीकोनातून उपाय योजायला हवेत, प्रयत्न करायला हवेत. कायदेशीररित्या नावात/आडनावांत बदल करून घेणे हा प्रमुख आणि प्रभावी उपाय आहे.

नाव, आडनाव, धर्म, मातृभाषा आणि जात या पाच बाबी, प्रत्येक व्यक्तीला जन्मताच मिळतात. यातील पहिल्या तीन बाबी, म्हणजे नाव, आडनाव आणि धर्म बदलता येणे शक्य आहे. अपत्याला बारशाच्या दिवशी पाळण्यात ठेवून, नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या साक्षीने, आई वडील आणि वडीलधार्‍या व्यक्तीच्या आवडीचे नाव बाळाला, समारंभपूर्वक ठेवले जाते. बाळ मोठे झाल्यावर त्याला, त्याचे नाव, त्याच्या वडिलांचे नाव आणि आडनाव आवडतेच असे नाही. या बाबी मुलांवर, त्यांच्या आईवडिलांकडून जबरदस्तीने लादल्या जातात. मुले सज्ञान झाली म्हणजे त्यांपैकी जे नको असेल ते कायदेशीररित्या बदलविण्याचा हक्क समाजाने त्यांना दिला पाहिजे आणि आता तो दिलाही आहे. पण त्याचा फारसा वापर होताना दिसत नाही.

लहानपणी मातृभाषा वापरली जाते पण शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात ती वापरली जातेच असे नाही. लहान वयातच आईवडिलांबरोबर, त्या त्या धर्माच्या प्रार्थनास्थळी जाण्याची सवय लागून, आईवडिलांचाच धर्म स्वीकारला जातो. आता बरेच आंतरधर्मीय विवाह होतात, त्यामुळे अपत्यांनी कोणता धर्म स्वीकारावा याबाबत संदेह निर्माण होतो. मातृभाषा आणि धर्म यांचा प्रभाव, कुटुंबाच्या आडनावांवर आणि अपत्यांच्या नावांवर पडलेला असतो.

आपण जिला जात म्हणतो, ती मानवनिर्मित आहे, निसर्गनिर्मित नाही. सोनार, सुतार, लोहार, माळी, कुंभार, चांभार, तेली, धनगर, कोष्टी, न्हावी, धोबी, वगैरे जाती नाहीत, व्यवसाय आहेत, व्यवसायावरून त्या त्या कुटंबांनी स्वीकारलेली आडनावे आहेत. पिढ्यान्पिढ्या हा व्यवसाय चालत राहिल्यामुळे त्याला जातीचे स्वरूप आले आणि ते आडनावाच्या रुपाने पक्के झाले. नंतर समाजाने अनेक उपजाती आणि पोटजाती निर्माण केल्या. पण ते चुकीचे आहे. आता कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा व्यवसाय किंवा करीयर वेगवेगळे असते.

ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि दलित… हे वर्ण, त्या त्या व्यक्तींच्या कुवतीनुसार, राजांनी किंवा समाजधुरीणांनी, समाजाला वाटून दिलेली कामे आहेत, म्हणजे व्यवसायच आहेत, जाती नाहीत. हे वर्णही मानवनिर्मित आहेत, निसर्गनिर्मित नाहीत.

आता समाजाची जीवनशैली बदलली आहे. सोनाराची मुले मोठमोठ्या जबाबदारीची कामे नीटरीतीने पार पाडू शकतात. माळ्याची मुले, स्वतःची मोठमोठ हॉटेले यशस्वीरित्या चालवू शकतात. कुणाचीही मुलं क्रिकेट किंवा असाच कोणताही खेळ खेळून अनेक जागतिक विक्रम मोडू शकतात. कुणाचीही मुले वैज्ञानिक, तंत्रज्ञ, अभियंते, उद्योजक, कारखानदार किंवा मुत्सद्दी होऊ शकतात. थोडक्यात म्हणजे हजारो वर्षापूर्वीची समाजव्यवस्था आता कालबाह्य झाली आहे. या समाजव्यवस्थेमुळे आता समाजाची हानीच होते आहे. काळानुसार आपण आपला सामाजिक दृष्टीकोन आता बदलला पाहिजे. संसार सुखाचा आणि यशस्वी होण्यासाठी, जाती आणि वर्ण यापेक्षा कितीतरी व्यक्तीगुण अधिक महत्वाचे ठरू शकतात.

आता विज्ञानाने सिध्द केले आहे की स्त्रीचे बीजांड जेव्हा पुरूषाच्या शुक्राणूकडून फलित होते तेव्हा मूळ गर्भपिंड निर्माण होतो. त्यात पित्याकडून आलेली २३ गुणसूत्रे आणि मातेकडून आलेली २३ गुणसूत्रे अशा एकूण ४६ गुणसूत्रांच्या २३ जोड्या असतात. गुणसूत्रात जनुके आणि डीएनए हे, आनुवंशिकता दाखविणारे आणि प्रत्यक्षात आएईवडीलांच्या पूर्वजांच्या अनेक पिढ्यांपासून आलेली असतात. हा आनुवंशिक घटकांचा संच, अपत्याच्या कातडीचा रंग कोणता असावा, डोळ्यांचा रंग कोणता असावा, केसांचा रंग कोणता असावा, उंची केव्हढी असावी, बुध्दीमत्ता किती असावी, शरीरयष्टी कशी असावी…हे सर्व ठरवितो. हीच तुमची जात आणि हेच तुमचे विधीलिखित असते. बाकी सर्व मानवनिर्मित आहे. ही गुणसूत्रे आईवडिलांच्या कुळाकडून आलेली असतात. म्हणून ते कुळ किंवा तो वंश ओळखण्यासाठी कुलनाम म्हणजेच आडनाव लावण्याची प्रथा रूढ झाली. पण आता, आडनावामुळे वंशाचा संदर्भ तर मिळत नाहीच पण गैरसमज मात्र निर्माण होतात.

समाजात व्यक्ती ओळखली जावी म्हणून नाव आणि आडनाव वापरले जाते. आडनाव रूढ होतांना व्यवसाय, सरकारी हुद्दा किंवा पद आणि निवास या बाबी प्रामुख्याने विचारात घेतल्या गेल्या. परंतू एखाद्या व्यक्तीचे गुणावगुण, शारीरिक व्यंग, बरावाईट स्वभावविशेष, किंवा सवय यावरून त्या अख्ख्या कुटुंबाचेच आडनाव पडणे आणि ते पिढ्यान्पिढ्या चालू ठेवणे हा प्रघात कसा पडला असावा हे फार मोठे गूढ आहे. पक्षी, प्राणी, वस्त्रे, घरगुती वापराच्या वस्तू, भाज्या यांना आडनावात का स्थान मिळाले हेही एक आश्चर्यच आहे.

रोजचा पेपर वाचताना बरेच वेळा ‘‘नावात बदल’’ अशा मथळ्याखाली नोटीस प्रसिद्ध झालेली वाचनात येते. ‘‘मी अमुक अमुक खाली सही करणार असे जाहीर करतो/ते की, मी माझे जुने नाव बदलले असून यापुढे मी अमुक अमुक नाव धारण केले आहे. पुढील आयुष्यात मी नवीन नावानेच ओळखला/ली जाईल याची कृपया नोंद घ्यावी’’ अशा तर्‍हेची ती नोटीस किंवा जाहिरात असते.

गेले कित्येक वर्षापासून मी अशा नोटीसा कापून ठेवल्या आहेत. आडनावे बदलासंबंधी मी, स्त्री (१९९२) आणि अमृत (२००३) या मासिकांत लेखही लिहीले आहेत. आता ते पुन्हा वाचतांना आडनावासंबंधी, नावासंबंधी, त्यांच्या बाबतीत असलेल्या सामाजिक दृष्टीकोनासंबंधी आणि समाजात होऊ घातलेल्या परिवर्तनासंबंधी बरेच विचार मनात घोळतात. पहिला महत्त्वाचा विचार म्हणजे अशी कोणती परिस्थिती उद्भवली असावी? कोणती घटना घडली असावी? किंवा कोणते मूलभूत कारण असावे की जेणेकरून त्या व्यक्तिच्या मनात प्रचंड काहूर निर्माण झाले आणि ती व्यक्ती आपले आडनाव/नाव बदलविण्याच्या तिच्या जीवनातील एका महत्त्वपूर्ण निर्णयापर्यंत येऊन पोचली. काही आडनावे तर अतकी अश्लील वाटतात की ती या लेखात उदाहरणादाखल देणेही योग्य वाटत नाही. ही आडनावे धारण करून समाजात वावरणार्‍या विद्यार्थ्यांना आणि लेकी-सुनांना किती उपहास, अवमान, टिंगलटवाळी सहन करावी लागली असेल याची कल्पनाच करवत नाही. अशी आडनावे बदलविणार्‍या व्यक्तींचे खरोखर कौतुकच केले पाहिजे. समाजातील एक प्रकारचा कलंक धुण्याचे महत्कार्य या व्यक्तींनी केले आहे असे म्हणता येईल. एका सुशिक्षित व्यक्तीला शिक्षकाच्या नोकरीसाठी अर्ज करावयाचा होता. त्याचे आडनाव गाढवे असे होते.

हे आडनाव शिक्षकी पेशाला शोभेसे नाही. विद्यार्थी त्या आडनावाचे चेष्टेकरता उपयोग करतील. शिक्षकाच्या पेशाला हानीकारक असे आडनाव नसावे म्हणून तो ज्या गांवचा मूळ रहिवासी होता, त्या गावावरून ‘तारळेकर‘ असे आडनाव बदलवून घेतले. आता विचार करा, गाढवे, डुकरे, उंदरे, कुत्रे, ढेरपोटे, रगतचाटे, माणूसमारे, अशासारखी आडनावं असणार्‍या मुलाशी कोणती सुशिक्षित मुलगी लग्न करण्यास राजी होईल?

काही विचारवंत, या आडनांव बदलापलीकडचा विचार करतात. त्यांच्या मते, आडनावांमुळे जर टीका, टिंगल, पक्षपात, वशिलेबाजी किंवा वंशावळनिर्देश यासारखे सामाजिक प्रश्न किंवा अडचणी निर्माण होत असतील तर आडनाव हवेच कशाला? ते सोडून द्यावे किंवा वगळावे. व्यक्तिओळख, म्हणजे आयडेंटिटी हाच जर आडनावाचा उद्देश असेल आणि तो जर अतर उपायांनी सफल करता येण्यासारखा असेल तर आडनावाची गरज उरणार नाही, ते सोडले/गाळले तरी चालण्यासारखे आहे. पुरूषाला त्याचे आडनाव त्याच्या वडिलांकडून मिळालेले असते तसेच विवाहापूर्वी ते स्त्रियांनाही मिळालेले असते. आडनांव माहेरचे असो की सासरचे असो ते वडिलांकडून किंवा नवर्‍याकडून म्हणजे पुरूषाकडूनच आलेले असते.

वास्तविक आडनाव सोडण्याचा विचार करणे म्हणजे गाडी उलटी नेण्यासारखे आहे. पूर्वी आडनावे क्वचितच वापरली जात. ब्रिटिशांच्या आमदानीत व्यक्तिओळख निःसंदिग्ध करण्यासाठी ती रूढ करण्यात आली. आडनावे प्रचलीत करण्यामागचा हेतू चांगला होता परंतू काहींच्या बाबतीत सामाजिक मतप्रवाहाने भलतीकडेच वळण घेतले आणि आक्षेपार्ह, लाजिरवाणी आडनावे निर्माण/रूढ झाली.

पुरूषप्रधान समाज रचना अमान्य असलेल्या काही महिलांनी दोन्ही कुळांच्या आडनावास विरोध दर्शविला. कारण त्यांच्या मते त्यांच्या नावात त्यांच्या जन्मदात्या आईचे/जननीचे नाव येत नाही. वडिलांच्या नावाचा उल्लेख पुरूष असल्यामुळे त्यांना नको होता म्हणून त्यांनी वडिलांचे नाव आणि आडनाव गाळून आपल्या आईचा उल्लेख केला. उदा. शालिनी नावाच्या आईच्या, पालवी नावाच्या कन्येने आपले नाव पालवी शालिनीकन्या किंवा शालिनीकुमारी पालवी असे रूढ करण्यासारखे आहे.

केव्हा नाव बदलावेसे वाटते ?

१. आडनावाची टिंगलटवाळी होत असेल.
२. आडनावात/नावात प्रचलीत काळानुसार बदल करावासा वाटत असेल. उदा. जातीसूचक किंवा व्यवसायसूचक आडनावे.
३. स्त्रियांचे बाबतीत विवाहानंतर पतीचे नाव आणि आडनाव लावले जातेच पण बरेच वेळा स्वतःचे नावही बदलले गेल्यामुळे तिची पूर्ण ओळखच पुसली जाते. पुढे नवर्‍यापासून फारकत झाली तरी ती नवर्‍याचेच नाव, आडनाव आणि लग्नाचे वेळी त्याने ठेवलेले नावही लावत राहते. बदल आवश्यक आहे.
४. काही व्यक्तींना अंकशास्त्रानुसार आपले नाव/आडनाव बदलवून घ्यावेसे वाटते.
५. सरकारी गलथानपणामुळे चुकीचे आडनाव/नाव दाखल केले गेले असेल.
६. दत्तकविधान झाले असेल.
७. आडनावाचे आद्याक्षर बदलावेसे वाटत असेल.
८. आडनावात वेगळेपण दाखवावयाचे असेल.
९. प्रांत किंवा स्थानिक भाषा यांच्याशी साधर्म्य साधावयाचे असेल.
१०. बदनामी लपविण्यासाठी. वगैरे वगैरे.

टिंगलटवाळी होऊ शकेल अशी काही बदलक्षम आडनावे येथे देत आहे. ही आडनावे धारण करणारी कुटुंबे आहेत म्हणूनच त्यांची आडनावे अुदाहरणादाखल येथे घेतली आहेत. त्या आडनावांचा कोणत्याही प्रकारे अवमान करण्याचा मुळीच हेतू नाही याची कृपया नोंद घ्यावी.

अ) शारीरिक व्यंगेः टिल्लू. ढेरपोटे, टणक, खुजट, चिपाड, लाळे, पांगळे, वेडे, वेडसे, पिसाट, लोचट, लुळे, लुकडे, लटपटे, बावळे, नाचरे, नकटे, गबाळे, लंगडे, दीडमिशे, रातांधळे, आंधळे, येडेकर, येडे, बोंबले, बोबडे, बारजिभे, बहीरट, बहिरे, कानतुटे, एकशिंगे,

ब) वाईट सवयी : वाघचोर, पगारचोर, चणेचोर, चोरपगार, चोरमुले, चोरघडे, चोरटे, चोर, चुळभरे, जीभकाटे, चावरे, चहाडे, हंबरडे, रगतचाटे, केकाटे, दातरंगे, सालकाढे, पातळहागे, हगरे, हगवणे, शौचे, झोंबाडे, रडे, रडके, किरकिरे, कुरकुरे, विसरभोळे, चाटुफळे, मानमोडे, भिकारी, बेरड, डोईफोडे, पोटफाडे, प्राणजाळे, गालफाडे, कोडगे, कानफाडे, कानपिळे, कानतोडे, कानकाटे, अघोरी, खराबे, आडमुठे, भाआीमारे, बैलमारे, बापमारे, ढोरमारे, माणूसमारे, डुक्करमारे, घामटे, घरमोडे, घरबुडवे, कचरे, उकिर्डे, झोपे, उपडे, उताणे, उकिडवे, आळशी, रावण, दानव, ब्रम्हराक्षस, हडळ, भूते, भूत.

क) पक्षी आणि प्राणीवाचक : सरडे. विंचू, वानरे, वाघळे, मुंगसे, माकडे, मगर, बोके, बोकड, बदके, गीध, डास, चिलटे, ढेकणे, टोळ, घोडे, गांडोळे, गेंडे, खेकडे, लांडगे, कोल्हे, कुत्ते, कुत्रे, काळसर्प, कावळे, उंदरे, उंदीर, अस्वले, अजगर गाढवे, गाढवी, गधे, गधडे, झुरळे

ड) वस्त्रे : लंगोटे, पोलके, परकर, सदरे, धोत्रे,

काही जातीसूचक आणि व्यवसायसूचक आडनावे बदलाविशी वाटल्यास आश्चर्य वाटावयास नको.

जुने आडनाव बदलायचे असल्यास नवीन आडनावांच्या पर्यायासंबंधीही विचार करावा लागेल. त्या कुटुंबाचे मूळ गाव किंवा ज्या गावी दीर्घकाळ वास्तव्य झाले असेल त्या गावी निवास दर्शविणारे आडनाव स्वीकार्य व्हावे. बाळाच्या जन्मापूर्वीच जसे नाव ठरविले जाते तसेच आडनावही ठरवावे. खटकणार्‍या आडनावात बदल करावयाचा असल्यास बाळाचा जन्मदाखला घेतेवेळीच काळजी घ्यावी म्हणजे पुढील आयुष्यातील बरेच कायदेशीर सोपस्कर टाळता येतील. जन्मदाखल्यात नवीन आडनावच नोंदवावे. बालवाडीत प्रवेश घेतांना म्हणजे नर्सरीस्कूल किंवा केजीत अॅडमिशन घेतांनाच नवे आडनाव नोंदवावे. म्हणजे ते कायमचे रूढ होईल. निवास दर्शविण्याचे तीन प्रकार आहेत. उदा. नागपुरकर, नागपुरे आणि नागपूरवाले. यातील नागपुरे हा प्रकार जास्त सुटसुटीत वाटतो. वाईट सवयी, शारीरिक व्यंगे, कालबाह्य झालेले व्यवसाय, प्राणी, भाज्या, घरगुती वस्तू आणि पदार्थ वगैरे आडनावांना योग्य आणि समाजस्वीकार्य पर्याय मात्र शोधून काढावे लागतील. नवे आडनाव ३ ते ५ अक्षरी, कमी जोडाक्षरे असणारे असावे. शक्यतोवर कठोर व्यंजने म्हणजे छ, झ, ट, ठ, फ, क्ष, ज्ञ टाळावीत.

सध्या आडनाव बदलण्यासाठीचा अर्ज, फक्त चर्नीरोड येथील, संचालक, शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नेताजी सुभाष रोड मुंबई ४००००४ येथेच स्वीकारले जातात. वास्तविक राज्यातील तालुका किंवा जिल्हा पातळीवर प्रत्येक तहसिलदाराच्या किंवा जिल्हाधिकार्‍याच्या कचेरीत असे अर्ज, शुल्कासहित स्वीकारले गेले आणि ती माहिती महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द होण्याची व्यवस्था केली गेल्यास, ग्रामीण भागातील जनतेची सोय होऊ शकेल. त्याच कचेरीत, राज्यसरकारच्या राजपत्राच्या प्रतीही उपलब्ध व्हाव्यात.

गजानन वामनाचार्य,
१८०/४९३१, पंत नगर, घाटकोपर (पूर्व),
मुंबई ४०००७५.
दूरध्वनी – ०२२-२५०१२८९७, ९८१९३४१८४१

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*