भोसले हे मराठा समाजातलं सुप्रसिध्द आडनाव आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज राजस्थानातील शिसोदिया रजपूत कुलाचे होते. त्यापैकी काही कुटुंबं, महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील भोसा या गावी स्थायिक झाली आणि त्यांनी ‘भोसले’ हे आडनाव स्वीकारलं.
भोसले आडनावाची दुसरीही व्युत्पत्ती आढळते. शिवाजी महाराजांच्या शिसोदे वंशात, चौदाव्या शतकात, भैरवजी अुर्फ भोसाजी हा थोर व शूर पुरूष झाला (अि. स. 1330 ते 1470). त्यांच्या नावावरूनच भोसले हे आडनाव पडलं आणि ते प्रतिष्ठीतही झालं.
महाराष्ट्रातील मराठ्यांच्या 96 कुळापैकी 33 कुळं रजपुतांची आहेत. प्रमाराचे परमार…नंतर परमारांचे ‘पवार’, राणाचे ‘राणे’ आणि चौहानांचे ‘चव्हाण’ झाले आहेत. मराठ्यांची आडनावं बरीच जुनी असावीत. शिलाहारापासून शेलार, मौर्यापासून मोरे, चालुक्यापासून चाळके, पल्लवापासून पालव, कदंबांपासून कदम वगैरे.
शिवाजी महाराजांच्या दरबारात, त्यांनी अेखाद्या व्यक्तीच्या गुणावगुणांचा किंवा स्वभावाचा अुल्लेख केला की ती व्यक्ती त्याच नावानं ओळखली जाअी आणि तेच त्या व्यक्तीचं आडनाव रूढ होअी. अेकदा दलितवर्णाची काही पराक्रमी मंडळी शिवाजी महाराजांना भेटावयास आली आणि म्हणाली…राजे..आम्हाला आडनावे नसल्यामुळे, समाजात सन्मानाने वावरता येत नाही. तेव्हा महाराज म्हणाले….अेव्हढीच तुमची तक्रार असेल तर आजपासून तुम्ही आमचीच, म्हणजे मराठ्यांचीच आडनावे लावा. तेव्हापासून काही दलीत कुटुंबांनी भोसले, पवार, निंबाळकर अशी आडनावं स्वीकारली. आता तर काहींनी ब्राम्हणांचीही आडनावं स्वीकारली आहेत. आठवले, सावरकर, साठे, तांबे, गरूड, कांबळे अशी आडनावं स्वीकारली गेली. ही प्रथा अजूनही चालूच आहे.
स्थलांतरीत, कुटुंबांनी, स्थलांतर केलेल्या प्रदेशांना साजेशी आडनावं धारण केल्याची अनेक अुदाहरणं आढळतात. भारतात, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत, वेगवेगळ्या भाषिकांचे, संस्कृतींचे, चालीरिती आणि परंपरा जपणार्यांचे प्रदेश आहेत. पंजाब, अुत्तर प्रदेश, बंगाल, राजस्थान, गुजराथ, महाराष्ट्र, कोंकणकारवार, कर्नाटक, आंध्र, तामिळनाड, केरळ वगैरे प्रदेशात, कुळ ओळखण्याच्या वेगवेगळ्या पध्दती आहेत. म्हणजेच कुलनामं वापरण्याच्या , पुरातन काळापासून रूढ झालेल्या परंपरा आहेत. दक्षिण भारतात, व्यक्तीचं नाव, वडिलांचं नाव, आणि गावाच्या नावाचाही निर्देश करतात. गावाचं नाव पहिलं, वडिलांचं नाव नंतर आणि व्यक्तीचं नाव शेवटी लावतात. त्यामुळं, नावावरून, सख्खे भाअू देखील वेगळे वाटतात.
मराठी साम्राज्याच्या अुत्तरेकडील विस्तारामुळं बडोदा, ग्वाल्हेर, अिंदूर, देवास वगैरे संस्थानात हजारो मराठी कुटुंबं स्थयिक झाली आहेत. घरात त्याचं मराठीपण टिकून आहे. पानिपतच्या दारूण पराभवाला 14 जानेवारी 2010 रोजी 250 वर्षे पूर्ण झाली. अेखाद्या घटनेला दारूण अपयश आलं तर त्या घटनेचं पानिपत झालं असा वाक्प्रचारही रूढ झाला आहे.
सदाशिवरावांबरोबर लढाअीत सहभागी झालेले पण जिवंत राहिलेले सुमारे 300 योध्दे, महाराष्ट्रात परत न येता, तेथेच स्थायिक झालेत. या 250 वर्षात त्यांच्या वारसांची संख्या 10 लाखावर पोचली आहे. आता ही सर्व कुटुंबं हरयानवी झाली आहेत. त्यांची आडनावंही बदलली आहेत. पवारांचे ‘पनवार’. महालेंचे ‘महालान’, जोगदंडांचे ‘जागलान’ असं परिवर्तन झालं आहे. मूळचे ‘सावंत’ असलेले हरयानवी गृहस्थ मला भेटले. आता ते ‘सवांत’ असं आडनाव लावतात.
तंजावरकडेही बरीच मराठी कुटुंवं स्थायिक झाली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र भाअू, व्यंकोजी भोसले तंजावरला गेले. त्याचे वंशज सर्फोजी भोसले, तंजावरचे राजे होते (1798 ते 1832)
— गजानन वामनाचार्य
आडनावांच्या नवलकथा :: फेसबुक गट :: 4 ::
रविवार 18 जानेवारी 2015
तेलोरे आडनाव कसे व कुठून आले त्याचा इतिहास भाट कोण आहे ते सांगा. 9421264926