मराठी आडनावात ‘वाघ’

Wagh - The Tiger in Marathi Surnames

महाराष्ट्रीय आडनावात बर्‍याच प्राण्यांना महत्त्वाचं स्थान आहे हे अुदाहरणादाखल दिलेल्या काही आडनावांवरून पटतं. अस्वले, कोल्हे, लांडगे, अुंटवाले, अुंदीर, काळवीट, कुत्रे, श्वान, कोकरे, कोल्हे, खेकडे, गाढवे, गाय, गोम, घोडे, घोरपडे, घोणस, घोणसे, विंचू, अिंगळे, जिराफे, झुरळे, डुकरे, डोंगळे, तरस, नागे, बकरे, बैले, बोकड, बोकडे, मुंगळे, मुंगी, मुंगे, सरडे, ससे, सापे, सांबरे, सिंह, हत्ती, हत्ते, हरणे …. वगैरे …. अनेक.

वाघ हा हिंस्र प्राणी जंगलातच राहतो. काही देवदेवतांचं वाघ हे वाहन आहे. वाघ फार पूर्वीपासून माणसाळवलेला प्राणी आहे याचा हा पुरावा आहे. सर्कशीतल्या वाघांकडून अनेक विस्मयकारक कामं करून घेतली जातात, याचा आपण अनुभव घेतलेला आहेच. जंगलात भरकटलेलं वाघाचं पिल्लू पाळलं तर त्याचं हिंस्रपण कमी होतं. थोडक्यात म्हणजे माणसाचा आणि वाघाचा बराच सहवास आल्यामुळं, वाघाला मराठी आडनावात स्थान मिळालं असावं.

मराठी आडनावांत ‘वाघ’ बराच लोकप्रिय दिसतो. त्या कुटुंबात कोणीतरी वाघासारखा पराक्रम केला असेल किंवा अेखाद्या व्यक्तीचा स्वभाव, वाघाच्या स्वभावाशी मिळता-जुळता असेल म्हणजे वाघासारखा क्रूर किंवा दरारा निर्माण करणारा असेल, म्हणून त्याच्या कुटुंबाचं आडनाव ‘वाघ्ये, वाघ, वाघे किंवा वाघिरे’ असं रूढ झालं असावं. आता तो कुटुंबप्रमुख ‘वाघ’ झाला म्हणून त्याच्या अख्ख्या कुटुंबात, अितकेच नव्हे तर त्याच्या नंतरच्या अनेक पिढ्यांच्या आडनावात वाघ का म्हणून वास्तव्य करून असावा?

अेखाद्याला वाघाच्या शिकारीचा छंद असल्यामुळं त्यानं बर्याचच वाघांची शिकार केलेली असावी म्हणून त्या कुटुंबाचं आडनाव ‘वाघमारे’ पडलं असावं. परंतू वाघचोर, वाघचोरे किंवा वाघचौरे ही आडनावं रूढ झाल्याचं मात्र खरोखरच आश्चर्य वाटतं. आता, वाघ ही काय चोरी करण्याची वस्तू आहे की चोरी करण्यासारखा प्राणी आहे? अेखाद्या व्यक्तीची सर्कस वगैरे असावी म्हणून त्यानं जंगलात जाऊन वाघ पकडून आणले असावेत म्हणून ते ‘वाघधरे’ झाले. तरीपण ‘वाघचोरे’ या आडनावाचं आश्चर्य वाटतंच. आता ‘वाघचोरे, वाघधरे’ ही आडनावं आपण पचविली पण, ‘वाघमोडे’ हे आडनाव मात्र अतीच झालं. वाघ ही काय मोडायची वस्तू आहे? परंतू वाघाला मोडण्याचाही पराक्रम कुणीतरी केला असावा.

‘वाघचवडे, वाघचवरे, वाघचौरे, वाघचौंडे’ ही आडनावं, काही आडनावांचे अपभ्रंश असावेत. ‘वाघनखे किंव वाघपंजे’ या आडनावांची माणसं जर तुमच्या आसपास वावरत असतील तर जरा जपूनच राहिलं पाहिजे. ‘वाघडोळे’ हे आडनाव वाघासारखे लाल डोळे असल्यामुळं पडलं असावं. ‘वाघमळे’ हे आडनाव कसं पडलं असावं याचा मात्र अंदाज करता येत नाही.

आडनावात वाघ असलेली आणखी काही आडनांवं – काळवाघे, तांबेवाघ, व्याघ्रळकर, वाघ्रळकर, वाघदर, वाघपांजर, वाघराळकर, वाघरी, वाघरु, वाघरे, वाघलगावकर, वाघवले, वाघसकर, वाघळकर, वाघळे, वाघंबे, वाघंबेकर, वाघाटे, वाघाडे, वाघापूरकर, वाघीकर, परतवाघ वगैरे. वाघाचं कातडं अंगाभोवती गुंडाळून राहणारे ते ‘वाघवस्त्रे’ झाले असावे.

कुठेतरी वाचल्याचं आठवतं की अीशान्य भारतात जमिनीखाली वाढणार्‍या, सुरणासारख्या कंदाला ‘वाघ’ असं म्हणतात. म्हणून अशा कंदांची लागवड करणारं कुटुंब म्हणजे ‘वाघमळे’ असावं असं वाटतं. ते कंद चोरणारे ‘वाघचौरे’ आणि कंद मोडणारे ‘वाघमोडे’ झाले असावेत. आणि काही आडनावातील ‘वाघ’ हा या कंदास अनुसरून असावा. तरीपण आसामातला कंदरूपी वाघ महाराष्ट्रीय आडनावात कसा आला हे गूढ राहतंच

वाघमारे आडनावाचा अेक होतकरू तरूण, नोकरीसाठी मुलाखतीस गेला. कंपनीचे मालकच मुलाखत घेत होते.

तुझं नाव काय? मालकानं विचारलं …..
प्रभाकर अनंत वाघमारे …. तरूणानं सांगितलं …

तुझ्या आडनावामुळं मी तुला नोकरी देत नाही …. मालक …

अहो पण का? माझा बायोडेटा वाचा, माझा रेझ्युमे बघा …. तरूण म्हणाला.

त्याचा काही अुपयोग नाही … कारण माझं आडनाव वाघ आहे …. मालक.

— गजानन वामनाचार्य

2 Comments on मराठी आडनावात ‘वाघ’

Leave a Reply

Your email address will not be published.


*