सर्वस्वाचा त्याग केल्याशिवाय परमेश्वरप्राप्ती होत नाही

देवदत्त राजाच्या राज्यात एकदा गौतमबुद्ध आले होते. त्यांचे स्वागत करायला वेशीजवळ स्वत: राजा देवदत्त, राजाचे सरदार, सेनापती मोठमोठे आहेर आणि नजराणे घेऊन बुद्धांच्या स्वागतासाठी उभे होते. प्रत्येकजण आपला नजराणा आपापल्या मानाप्रमाणे बुद्धांना देत होते. थोड्या अंतरावर हा सर्व सोहळा पाहत एक आदिवासी महिला उभी होती. गौतमबुद्ध आले आहेत हे तिला समजले. गौतमबुद्धांचे दर्शन घेण्याची तिलाही मनापासून तीव्र इच्छा झाली. ती लांबून बघत होती. मोठमोठे सरदार, जहागिरदार गौतमबुद्धांना आपल्याजवळ असलेले भरजरी नजराणे पेश करत होते. तिच्या जवळ एक अर्धवट खाल्लेल्या डाळिबाशिवाय दुसरे काहीही नव्हते. तिने मागचा पुढचा विचार केला नाही. ती गौतमबुद्धांच्या दर्शनासाठी धावत निघाली आणि सरदारांच्या घोळक्यामध्ये गौतमबुद्धांजवळ पोहोचली. हातातील अर्धे डाळिब तिने बुद्धांसमोर धरले. दोन पावलं पुढे येऊन बुद्धांनी त्या डाळिबाचा स्वीकार केला. ते पाहून जमलेल्या सरदारांनी तक्रार केली की, ”आमचे नजराणे बुद्धांनी फक्त खुणेने स्वीकारले पण अर्धवट खाल्लेले डाळिंब त्यांनी दोन पावलं पुढे येऊन स्वीकारले. असे का घडले ?” हे जेव्हा बुद्धांनी ऐकले त्यावेळेस बुद्ध म्हणाले, ”तुमच्याजवळ गडगंज संपत्ती असताना त्यातला अगदी छोटासा भाग तुम्ही मला दिला पण या स्त्रीने तिच्याजवळ होतं ते स्वत: न खाता सगळं मला देऊन टाकलं.”
तात्पर्य – सर्वस्वाचा त्याग केल्याशिवाय परमेश्वरप्राप्ती होत नाही.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.