गुरु नेहमी आपल्या शिष्याची परीक्षा घेत असतात. एक दिवस रामकृष्ण परमहंसांच्या मनात नरेंद्रची (विवेकानंद) परीक्षा बघावी हा विचार आला. त्यांनी नरेंद्रला आपल्याजवळ बोलावले आणि त्याला म्हणाले, ”हे बघ नरेन, कालीमातेच्या कृपेने तिने मला काही चमत्कार करायच्या सिद्धी दिल्या आहेत. त्या सिद्धी मला तुला द्यायची इच्छा आहे. तू त्या घेशील का ?” त्यावर नरेंद्र म्हणाला, ”सिद्धी आणि चमत्कारांचा मला काय उपयोग ? त्यातून मला देव भेटणार आहे का ?” त्यावर रामकृष्ण म्हणाले, ”नाही, मी ज्या सिद्धी तुला देणार आहे त्यातून तुला देव भेटणार नाही; पण कितीही ऐश्वर्य आणि विश्वातील कोणतीही वस्तू तू मागशील त्या क्षणी तुला मिळेल.” त्यावर नरेंद्रने लगेच उत्तर दिले, ज्या सिद्धीमुळे मला देव भेटणार नाही त्या सिद्धी मला नकोत. मला फक्त देव हवाय आणि त्याच्याशी माझी भेट घडवून द्या.” नरेंद्रचे हे शब्द ऐकून रामकृष्णांना अतिशय आनंद झाला. नरेंद्रची ईश्वराविषयीची तळमळ किती तीव्र आणि प्रामाणिक आहे त्यांना समजले.
तात्पर्य – ध्येय गाठणारा शिष्यच गुरुचा लाडका असतो.
Leave a Reply