कोणतीही कला ही ईश्वराची देणगी आहे. त्यामुळे ज्यावेळेस त्यात ईश्वरानुसंधान होतं त्यावेळेस ती कला उच्चदर्जाची होते यात शंका नाही

पंडित रामाचार्य यांच्या गाण्याची मैफल संपली. तेव्हा सारे सभागृह उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करीत पंडितजींना मानवंदना देत होते. आयुष्यात असे गाणे ऐकले नाही अशीच प्रत्येक श्रोत्याची प्रतिक्रिया होती. श्रोते भारावले होते. याच्यापेक्षा उत्तम गाणं असूच शकत नाही अशी प्रतिक्रिया एका श्रोत्याने दिली तेव्हा रघुनाथ महाराज हळूच म्हणाले, ”असं काही नाही.” खरं तर रघुनाथ महाराज एक सज्जन आणि प्रतिभावान व्यत्रि*मत्त्व होतं तरीही त्यावेळी त्यांचे हे उद्गार ऐकून अजितकुमारला थोडा रागच आला. त्याने रघुनाथ महाराजांना हटकले व म्हणाले, ”यापेक्षा उत्तम गाणं तुम्ही तरी तुमच्या आयुष्यात ऐकलय का ? मग का असं बोललात.” त्यावर रघुनाथ महाराज शांतपणे म्हणाले, ”उगीच चर्चा कशाला ? उद्या पहाटे ये.” दुसर्‍या दिवशी पहाटे महाराज अजितकुमारला घेऊन गावाबाहेरच्या मंदिराजवळ गेले. मंदिराजवळ जाताच त्याला सूर कानावर आले. बाहेरच्याच झाडाखाली बसून तो गाणे ऐकू लागला. डोळे कधी मिटले गेले आणि गाणे ऐकता ऐकता समाधी कधी लागली हे अजितकुमारला कळलेच नाही. गाण्याचे सूर थांबले. अजितकुमारनी डोळे उघडले. सूर्यकिरणेही वर आली होती. पहातो तो काय पंडित रामाचार्य यांची पाठमोरी आकृती त्याने पाहिली. नकळत त्याने त्यांचे पाऊल पडले होते तेथील माती कपाळला लावून विनम्रभावे वंदन केले. त्याला उठवत रघुनाथ महाराज म्हणाले, ”ऐकलंस त्यापेक्षा उत्तम गाणं पंडित रामाचार्यच गात होते पण ते ईश्वरासाठी गात होते म्हणून ते अधिक चांगलं होतं.” कला कोणासाठी सादर करतो यावर ही तिचे श्रेष्ठत्व असते. रघुनाथ महाराजांचे हे वाक्य ऐकून अजितकुमारने त्यांनाही नतमस्तक होऊन वंदन केले.
तात्पर्य – कोणतीही कला ही ईश्वराची देणगी आहे. त्यामुळे ज्यावेळेस त्यात ईश्वरानुसंधान होतं त्यावेळेस ती कला उच्चदर्जाची होते यात शंका नाही.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.