दुसर्‍याला काही देण्यातच खरा आनंद असतो

एक वाटसरू जंगलातून जात होता. वाटेत खाण्यासाठी त्याने काही फळे घेतली होती. फळ खाऊन झाले की त्याचे बी अंतराअंतराने तो जंगलात टाकत असे. उद्देश एवढाच की, पाऊस पडल्यावर त्यातून एखादं सुंदरस झाड तयार होईल. काही दिवसांनी पाऊस पडला. बीमधून अंकुर वर आला. त्याने दोन्ही हातांची ओंजळ करून सूर्यदेवाला प्रकाशाचे दान मागितले. त्या दानात रोपटे टवटवीत, हिरवेगार होऊन वाढू लागले. मातीने त्याला खाद्य पुरविले, वार्‍याने गोंजारले, पावसाने पाणी दिले, पाखरांनी त्याच्यासाठी गाणी म्हटली. रोप सुखावले, मोठे झाले. त्याला नाजूकशी कळी आली. कळीचे फूल झाले. पण टपोरे फूल सगळ्यांच्या उपकाराने वाकून गेले. दवबिदूंना अश्रू होऊन पडताना पाहून वार्‍याने त्याला विचारले, ”तू का रडतोस ?” त्यावर फूल म्हणाले, ”सगळ्यांनी मला दिलं. मी कोणाला काहीच परत करू शकलो नाही. माझ्याजवळ देण्यासारखं काहीच नाही.” त्यावर वारा हसून त्याला म्हणाला, ”अरे, तुझ्याजवळ देण्यासारखं खूप आहे. तुझ्याजवळचा सुगंध तू सर्व जगाला भरभरून दे. तुझ्याजवळचे मधाचे कुंभ भुंग्यांना दे. तुझे फळ पक्व झाले की ते खाऊन जग आनंदित होईल.
तू फक्त संकल्प कर आपल्या जवळचं आपण सहजपणे जगाला खूप काही देऊ शकतो.”
तात्पर्य – दुसर्‍याला काही देण्यातच खरा आनंद असतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.