सुखापाठोपाठ दु:ख हे असतेच. दु:खाचे दिवस शांतपणाने काढले तर येणार्‍या सुखातला आनंद अवर्णनीय असतो

गेले चार-पाच महिने देवदत्तला सतत संकटांशी सामना करावा लागत होता. त्यामुळे त्याला विलक्षण मनस्तापही होत होता. सतत आत्महत्येचे विचार त्याच्या मनात धिगाणा घालत होते. शेवटी एक दिवस तो नदीवर आत्महत्या करायला गेलाच. आपल्या विचारांच्या तंद्रीत तो पुढे पुढे पाण्याकडे जात होता. त्याचे आसपास लक्षही नव्हते. बाजूलाच स्नानासाठी आलेले त्याचे गुरु उभे होते. परंतु त्यांच्याकडेही त्याचे लक्ष नव्हते. त्याची अस्वस्थता पाहून त्याला थांबवित गुरुंनी विचारले, ”कुठे निघालास ?” या वाक्यासरशी त्याची तंदा्री तुटली. गुरुंच्या या प्रश्नावर त्याने खरे उत्तर दिले आणि त्याला गुरुंची परवानगी सुद्धा घ्यावीशी वाटली. तो म्हणाला, ”महाराज, मी आत्महत्या करायला चाललो आहे. कारण मी फार दु:खी आहे.” यावर गुरु म्हणाले, ”तू अवश्य आत्महत्या कर. आत्महत्या करण्याने तुझं दु:ख नक्कीच संपेल, पण त्याबरोबर तुझं सुखही जाईल.” त्यावर देवदत्त म्हणाला की, ”मी जगलो तर माझे झालेले अपमान, माझ्यावरील संकटं हे जातील का ?” त्यावर गुरु म्हणाले, ”हो, नक्कीच. ती संकटं कधी ना कधी जातीलच.” आणि पुन्हा चांगले दिवस येतील. पण आत्ता आत्महत्या केलीस तर तू आधी केलेल्या चांगल्या कामाच्या खुणाही जातील आणि आत्ता जरी लोकं तुझा मत्सर करत असतील तरी पूर्वीपासून तुझ्याशी कोणी प्रेमाने वागत असेल तर ते प्रेमही संपेल.” या त्यांच्या उत्तराने काय समजायचे ते देवदत्त समजला आणि आत्महत्या न करता घरी परतला.
तात्पर्य – सुखापाठोपाठ दु:ख हे असतेच. दु:खाचे दिवस शांतपणाने काढले तर येणार्‍या सुखातला आनंद अवर्णनीय असतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.