खांडेकर, विष्णू सखाराम

Khandekar, Vishnu Sakharam

V S Khandekar
शब्दप्रभुत्व, कल्पनावैभव, कोटिबाजपणा, वास्तववादी, व्यामिश्र आणि प्रयोगशील लेखन करणारे महाराष्ट्रातले श्रेष्ठ कादंबरीकार, लेखक विष्णू सखाराम खांडेकर म्हणजेच वि. स. खांडेकर. वि. स. खांडेकरांचा जन्म सांगली येथे ११ जानेवारी १८९८ रोजी झाला. खांडेकरांचे मूळ नाव गणेश आत्माराम खांडेकर. त्यांचे वडील आत्माराम बळवंतराव खांडेकर यांचे १९११ साली निधन झाले. त्यावेळी खांडेकरांचे वय अवघे तेरा वर्षांचे होते. त्यांच्या वडिलांचे चुलत भाऊ सखाराम रामचंद्र खांडेकर यांनी त्यांना दत्तक घेतले आणि त्यानंतर विष्णू सखाराम खांडेकर या नावाने ते ओळखले जाऊ लागले. मॅट्रिकची परीक्षा खांडेकर आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. परीक्षेत चांगले यश लाभल्यामुळे त्यांच्या मामांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश मिळवून दिला. परंतु परिस्थिती अभावी त्यांना शिक्षण इंटरच्या वर्गातच सोडून द्यावे लागले. या काळात त्यांचा परिचय बालकवी, गणपतराव बोडस, अच्युतराव कोल्हटकर, का. र. मित्र इ. साहित्यिकांशी झाला आणि त्यांच्या लेखनाची सुरुवातही याच काळात झाली. ‘रमणीरत्न’ हे त्यांचे पहिले नाटक त्यांनी लिहून पूर्ण केले. कॉलेज सोडल्यावर ते सावंतवाडीला आपल्या बहिणीकडे राहू लागले.
१९१९ नंतर खांडेकरांचे लेखन जोरात सुरू झाले होते. कादंबरी, काव्य, लेख, विनोदी साहित्य, असे त्यांचे साहित्य प्रसिद्ध होऊ लागले. पुढे शिरोड्याच्या ट्युटोरियल इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी स्वीकारली. पुढे ते लवकरच मुख्याध्यापक झाले. शिरोड्याचा त्यांचा काळ हा लेखक म्हणून उमेदीचा काळ होता. १९३८ नंतर ते कोल्हापूरला जाऊन स्थायिक झाले. ‘हृदयाची हाक’, ‘कांचनमृग’, ‘दोन ध्रुव’, ‘उल्का’, ‘दोन मने’, ‘हिरवा चाफा’, ‘रिकामा देव्हारा’, ‘पांढरे ढग’, ‘पहिले प्रेम’, जळलेला मोहोर’, ‘अश्रू’, ‘ययाती’, ‘अमृतवेल’, ‘क्रौंचवध’ इ. त्यांच्या कादंबर्या. याशिवाय ‘वायूलहरी’, ‘चांदण्या’, ‘सायंकाळ’, ‘अविनाश’, ‘मंदाकिनी’ इ. तीस कथासंग्रह, ‘वनभोजन’, ‘धुंर्धुमास’, ‘फुल आणि काटे’, ‘गोकर्णीची फुले’, ‘गोफ आणि गोफण’ हे लेख. आगरकर, गडकरी यांचे चरित्र आणि

व्य वाङ्मयाचे संग्रह प्रकाशित झाले. ‘ज्वाला’, ‘देवता’, ‘सुखाचा शोध’, ‘माझं बाळ’, ‘लग्नं पहावं करून’, ‘सरकारी पाहुणा’ या चित्रपटांच्या कथा, संवाद आणि गीते त्यांनी लिहिली होती. खांडेकरांचे विनोदी वाङ्मय वैशिष्ट्यपूर्ण होते तर ‘रुपक कथा’ ही खांडेकरांनी मराठी कथेला दिलेली देणगी आहे.

त्यांच्या लेखनाचे अनेक भाषांत अनुवाद झाले आहेत. १९७४ साली ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराने त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला. भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ पदवी देऊन सन्मानित केले.

२ सप्टेंबर १९७६ रोजी या ज्येष्ठ साहित्यिकाचे निधन झाले.

अधिक माहितीसाठी खालील लिंक्स क्लिक करा.

लेखक,कवी वि.स.खांडेकर (2-Sep-2017)

लेखक,कवी वि.स. खांडेकर (19-Jan-2018)

लेखक वि. स. खांडेकर (2-Sep-2021)

## Vishnu Sakharam Khandekar

1 Comment on खांडेकर, विष्णू सखाराम

Leave a Reply

Your email address will not be published.


*