मांडके, (डॉ.) नित्यानंद

नित्यानंद मांडके हे भारतामधील एक सुप्रसिध्द हृद्यरोगतज्ञ होते. बाळासाहेब ठाकरेंवरती शस्त्रक्रिया केल्यानंतर ते खर्‍या अर्थाने प्रकाशात आले असले तरीही त्याआधीसुध्दा अनेक अशक्यप्राय वाटणार्‍या शस्त्रक्रिया त्यांनी त्यांच्या जादुभर्‍या बोटांनी यशस्वी करून दाखविल्या आहेत. त्यांचा जन्म १ जानेवारी १९४८ मध्ये पुण्यात झाला. बारावी पर्यंतचे शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी बी. जे. वैद्यकिय महाविद्यालयात प्रवेश मिळवला व याच महाविद्यालयात त्यांना त्यांची उर्वरित आयुष्याची सोबतीण मिळाली. शालेय व महाविद्यालयीन जीवनातसुद्धा डॉक्टर नितु हे अतिशय हुषार व कुशाग्र बुध्दीचे विद्यार्थी म्हणून सर्वांना परिचीत होते. परंतु आभ्यास एके आभ्यास हे तत्व त्यांना मान्य नसल्यामुळे फुटबॉल, बॉक्सिंग अशा अनेक क्रीडाप्रकारांमध्ये त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला होता. दुसर्‍या वर्षाला असताना ते त्यांच्या महाविद्यालयीन सॉकर संघाचे संघनायक देखील होते. स्पष्टवक्ता स्वभाव व पाण्यासारखे नितळ विचार यांमुळे काही जणांना ते भावले तर काही जणांना खटकले. त्यांच्या या स्वभावामुळे त्यांनी जेवढी माणसे जोडली, त्यांच्या तुलनेत कमी का होईनात पण अनेक शत्रुही बनवले.

एम.बी.बी.एस. ही पदवी मिळवल्यानंतर ते के. ई. एम. रुग्णालयामध्ये रूजु झाले. तिथे त्यांनी हृद्यविकार व शस्त्रक्रियांसंबंधीचे विशेष पदव्योत्तर शिक्षण पुर्ण केले. नितु मांडकेच्या पत्नी अल्का मांडके या त्यावेळी अ‍ॅनेस्थेशीयाचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यामध्ये राहात होत्या. पदव्योत्तर शिक्षण झाल्यानंतर नितु हे ब्रिटनला गेले जिथे त्यांनी ह्रद्यविकारांसंबंधीची सखोल माहिती संपादन केली. अतिशय अद्ययावत व भारतात ज्यांचा गंधसुध्दा नव्ह्ता अशा, ह्रद्यशस्त्रक्रियांसाठी लागणार्‍या तंत्ची व यंत्रांची तोंड ओळख करून घेतली. या वाटेतील खाचखळगे नीट समजावून घेतले. या क्षेत्रात नव्याने विकसित झालेल्या पध्दतींची व शोधांची ओळख त्यांना त्यांच्या इंग्लंड वास्तव्यामध्येच झाली. अतिशय हालाखींमध्ये दिवस काढून त्यांनी ज्ञानसाधना केली. नव्या सुधारणांबद्दल मनात असलेलं प्रचंड कुतुहल, उपजत चिकीत्सक वृत्ती, व पक्ष्यांनाही लाजवेल अशी सतत नवीन भरारी मारण्याची महत्वाकांक्षा या स्वभावगुणांमुळेच ते प्रत्येक संकटातून तरून गेले. इंग्लंडमध्ये असताना नितुंची आर्थिक परिस्थिती फार चांगली वगैरे नव्हती. परंतु त्यांना मिळणार्‍या ज्ञानाची व अनुभवांची किंमत भारतासाठी खुपच अमुल्य होती. ब्रिटनमधील एका सामान्य रूग्णालयामध्ये काम केल्यानंतर ते ब्रिस्टॉल मधील एका प्रतिष्ठीत रुग्णालयामध्ये रूजु झाले. तिथेही त्यांची मासिक कमाई अगदी नगण्य अशीच होती. राहण्याचा व शिकण्याचा खर्च भागवण्यासाठी त्यांना कधी कधी ओळखीच्यांकडून पैसे उधार घ्यावे लागत. थोड्या वर्षांनंतर त्यांनी सौ अल्का मांडके व त्यांच्या लहान मुलीला इंग्लंडमध्येच बोलाविले. तिथे काही वर्षे राहिल्यानंतर नितु मांडके अमेरिकेला गेले. तिथे त्यांना जगविख्यात डॉक्टर पिकासीओ यांचा सहवास व त्यांचे पुर्ण मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या हातांखाली काही दिवस प्रामाणिकपणे काम केल्यानंतर नितु मांडके भारतात परतले. भारतात त्यांना सहजपणे कुठलीच नोकरी न मिळाल्यामुळे ते वैद्यकिय सल्लागार म्हणुन जे. जे. रूग्णालयात काम करू लागले. बाकीचे सर्जन लोकं त्यांच्या कामाचा वेग, चपळाई, व सफाई बघून अवाक होत असत. त्यांच्या कौशल्याने व विनोदी स्वभावामुळे रुग्णांना ते हवेहवेसे वाटायला लागले व त्यांची किर्ती सर्वदुर पसरली. त्यांची काम करण्याची उरक व अचुकता पाहून त्यांना ‘सुपरफास्ट’ हे नाव पडले. डॉक्टर नितु मांडके हे अतिशय कार्यक्षम सेवातत्पर प्रसंगावधानी व सर्वच रूग्णांबद्दल समान आत्मीयता व तळमळ असलेले जणु देवदुतच होते. अनेक जणांना त्यांनी मृत्युच्या दाढेतुन बाहेर काढले आहे. असे म्हणतात की समोरच्याला वाचवण कितीही अवघड असलं, तरीही त्यांच्या चेहर्‍यावरची प्रसन्नता व सदैव त्यांच्या मुखातून निघणारा आशावाद पाहूनच रूग्ण अर्धे बरे होत असत. त्यांनी ज्या आत्मविश्वासाने व धीरोदत्तपणाने काही महिन्यांच्या कोवळ्या अर्भकांवर शस्त्रकिया केल्या आहेत त्याच पध्दतीने त्यांनी अनेक वठलेल्या वृध्दांनासुध्दा आपल्या शस्त्रक्रियांद्वारे नवसंजिवनी दिली आहे. बाळासाहेबांव्यतिरिक्त अनेक प्रसिध्द खेळाडुंच्या व सिने तारकांच्या शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीपणे केल्या आहेत.

नितु मांडके यांच्या व्यक्तिमत्वामधील प्रकर्षाने जाणवणारा आणखी एक विलोभनीय पैलु म्हणजे त्यांच्या स्वप्न बघण्याच्या व महत्वाकांक्षीपणाच्या कक्षा सामान्य माणसापेक्ष्या खुपच रूंद होत्या. पण हेही खरेच की ती स्वप्ने त्यांनी सामान्य माणसाला डोळ्यांसमोर ठेवूनच पाहिली. म्हणून त्यांना केवळ हृद्यविकारांशी व हृद्यशस्त्रक्रियांशी संबंधित सर्व आधुनिक व अद्ययावत सोयी सुविधांनी व आपत्कालीन यंत्रणांनी सुसज्ज असलेले सुपर स्पेशॅलिटी रूग्णालय बांधायचे होते. त्याचे कामही निम्म्याहुन अधिक पुर्ण झाले होते. पण त्यांचे हे स्वप्न परमेश्वरी इच्छेपुढे अधुरेच राहिले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*