जात म्हणजे काय? ….. बदलता दृष्टीकोन

तुमचा वंश, तुमचं कुळ यालाच तुमची ‘जात’ असं म्हटलं जातं. जी जात नाही ती ‘जात’ असंही म्हणतात. भारतात, जातीसंस्था ही फार पुरातन काळापासून अस्तित्वात आहे. वर्ण आणि जाती या संकल्पना, वास्तविक चांगल्या अुद्देशानं समाजात रूढ झाल्या. जन्मत:च तुम्ही आपल्या बरोबर जे जे गुणावगुण घेअून येता ते तुमचं ‘जात’ (तुमची ‘जात’ नव्हे). जन या संस्कृत क्रियापदापासून जनन, जनता, जन्म, जात हे शब्द आले आहेत.

आजच्या विज्ञानयुगात जात म्हणजे जन्मत: … जन्मापासूनच .. पण आता त्याला निराळाच अर्थ लावला जातो आहे. त्या शब्दाचं राजकारण केलं जातं आहे. अेव्हढं मात्र खरं की, जातीच्या संकल्पनेनं भारतीय संस्कृतीवर फार खोलवर परिणाम केले आहेत. त्याचे दुष्परिणाम काही कुटुंबांनी पिढ्यानपिढ्या भोगले आहेत. जातीवाचक आडनावं असणार्या कुटुंबांना अजूनही हेटाळणी सहन करावी लागते आहे. पूर्वी बलुतेदारांचे व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत असत. तीच त्यांची ‘जात’ झाली आणि तीच त्यांची आडनावंही रूढ झाली. अजून कसं समाजाच्या लक्षात येत नाही की जाती या मानवनिर्मित आहेत, निसर्गनिर्मित नाहीत. सगळे व्यवसाय समान दर्जाचे असतांना देखील, त्यानुसार रूढ झालेली आडनावं, जाती वाचक झाल्यामुळं, समाजात वेगवेगळे स्तर निर्माण झाले. घराण्याचा व्यवसाय बदलू शकतो. आता तर आअी, वडील आणि मुलं या सर्वांचे व्यवसाय भिन्न असू शकतात. त्यामुळं व्यवसायदर्शक आडनावांना काहीच अर्थ अुरला नाही.

‘जात’ या संज्ञेची अुकल आता विज्ञानानं केली आहे. आअीकडून येणारी २३ गुणसूत्रं आणि हजारो जनुकं, तसेच वडिलांकडूनही येणारी २३ गुणसूत्रं आणि हजारो जनुकं, हीच आनुवंशिक सामुग्री तुमचा गर्भपिंड घडवीत असते. जन्मत:च येणारी ही ४६ गुणसूत्रं, सुमारे ३० हजार जनुकं आणि त्यांना सामावून घेणार्‍या तुमच्या अब्जअब्जावधी पेशी घेअूनच तुम्ही जन्माला येता. जन्मत:च तुमची साथ करणारी ही आनुवंशिक सामुग्री म्हणजे तुमचं ‘जात’ (तुमची ‘जात’ नव्हे), असा हा आजच्या विज्ञानयुगातला ‘जात’ या संज्ञेचा अर्थ आहे. पण तो समजून घेतला गेला नसल्यामुळं अनर्थ माजला आहे.

— गजानन वामनाचार्य 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*