आडनाव घडण्याची किंवा आडनावात बदल होण्याची प्रक्रिया

सुप्रसिध्द नट, चरित्र अभिनेते आणि सिने दिग्दर्शक गजानन जागीरदार याचे मूळ आडनाव जहागिरदार असे होते. कॉलेजात शिकत असतांना समाजवादी विचारांनी त्यांना प्रभावित केले. त्यामुळे सरंजामशाहीचे द्योतक असलेले जहागिरदार हे आडनाव सोडून, त्यांनी आपल्या मूळ गावाच्या नावाला कर जोडून काथर्देकर हे आडनाव धारण केले. परंतू हे आडनाव अुच्चारण्यास आणि लिहीण्यास कठीण असल्यामुळे बरेच घोटाळे होअू लागले. काही व्यक्तींना तर ते अुच्चारणेच जमेना. शेवटी त्यांनी जागीरदार हे आडनाव स्वीकारले. कारण जहागीर हा शब्द मूळ फारशी जागीर या शब्दाचा अपभ्रंश आहे. जागीरीमुळे, जहागिरीची बाधाही टळली आणि काथर्देकरामुळे होणारी जिभेची सर्कसही टळली. पुढे जागीरदार हेच त्यांचे आडनाव कायमचे रूढ झाले.

भोसले हे मराठा समाजातले सुप्रसिध्द आडनाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजाचे पूर्वज राजस्थानातील शिसोदिया रजपूत कुळाचे होते. त्यापैकी काही कुटुंबे, महाराष्ट्रात, सातारा जिल्ह्यातील भोसा या गावी स्थायिक झाली आणि त्यांनी भोसले हे आडनाव स्वीकारले. दुसरीही व्युत्पत्ती आढळते. शिवाजी महाराजांच्या शिसोदे वंशात, चौदाव्या शतकात भैरवजी अुर्फ भोसाजी हा थोर व शूर पुरूष झाला. (अ. स. १३३० ते १४०७) त्यांच्यावरूनच भोसले हे आडनाव पडले आणि ते प्रतिष्ठितही झाले.

महाराष्ट्रातील मराठ्यांच्या ९६ कुळापैकी ३३ कुळे रजपूतांची आहेत. परमारांचे पवार, राणाचे राणे, आणि चौहानांचे चव्हाण झाले आहेत. शिवाजी महाराजांच्या दरबारात, त्यांनी अेखाद्या व्यक्तीच्या गुणावगुणाबद्दल किवा स्वभावाबद्दल अुल्लेख केला की ती व्यक्ती त्याच नावाने ओळखली जाआी आणि तेच त्या व्यक्तीचे आडनाव रूढ होआी. अेकदा दलितवर्णाची काही पराक्रमी मंडळी शिवाजी महाराजांना भेटावयास आली आणि म्हणाली…राजे…आम्हाला आडनावे नसल्यामुळे, समाजात आम्हाला सन्मानाने वावरता येत नाही. तेव्हा महाराज म्हणाले…अेव्हढीच तुमची तक्रार असेल तर आजपासून तुम्ही आमचीच, म्हणजे मराठ्यांची आडनावे लावा. तेव्हापासून काही दलीत कुटुंबांनी भोसले, पवार, निंबाळकर अशी आडनावे स्वीकारली. आता तर काहींनी ब्राम्हणांची आडनावेही स्वीकारली आहेत. आठवले, सावरकर, साठे, तांबे, गरूड, कांबळे अशी आडनावेही स्वीकारली गेली. ही प्रथा अजूनही चालूच आहे.

भुरचंडी या आडनावाचा प्रवास फारच मनोरंजक आहे. हे आडनाव मूळचे भृशूंडी असे होते. त्या कुटुंबातील कर्त्या पुरूषाला, दोन भुवयामध्ये अेक मोठा, सोंडेसारखा दिसणारा मस होता. भृ म्हणजे भुवअी आणि शूंडी म्हणजे सोंड. अशारितीने त्या कुटुंबाचे आडनाव भृशूंडी पडले. अुच्चारावयास किंवा लिहावयास कठीण आणि कानाला कठोर वाटणार्‍या शब्दांचा अपभ्रंश, सोप्या आणि कानाला गोड वाटणार्‍या शब्दांकडे होतो. म्हणून भृशूंडी या आडनावाचा प्रवास… भुरशूंडी.. भुरशंडी.. भुरचंडी.. असा झाला असावा.

१९७० च्या दशकात, जयप्रकाश नारायण यांनी जातीवाचक आडनावे बदलण्याची किंवा सोडण्याची मोहीम सुरू केली होती. त्यावेळी सबंध भारतात सुमारे ५० हजार व्यक्तींनी आपल्या आडनावात बदल केला.

आडनावातही अुत्क्रांती झालेली किंवा होत असलेली दिसते. मराठी कुटुंबे केवळ महाराष्ट्रातच आहेत असे नाही. भारतभरच्या प्रांतात मराठी कुटुंबे, अनेक दशकांपूर्वी किंवा शतकांपूर्वी गेलेली आहेत. मूळचे मराठी आडनाव, प्रादेशिक प्रभावामुळे बदलते.

ग्वाल्हेरला स्थायिक झालेल्या राजाभैय्या पूँछवाले यांच्या आडनावाची कथा… १८८१ ते १९५६ हा राजाभैय्यांचा जीवनकाल. मूळचे ते सांगली जिल्ह्यातील वष्ट या गावचे. गाण्याच्या निमित्ताने अेकोणिसाव्या शतकात जी मंडळी अुत्तरेकडे झुकली, त्यातलेच राजाभैय्या हे अेक. ग्वाल्हेरला स्थायिक झाल्यावर त्यांचे आडनाव पूँछवाले कसे पडले याचा संदर्भ मात्र मिळत नाही.

ग्वाल्हेरलाच स्थायिक झालेल्या, ग्वाल्हेर घराण्यातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संगीत तज्ज्ञ श्री. कृष्णराव पंडित यांच्या आडनावाची कथा…. कृष्णराव पंडितांचे आजोबा, श्री. विष्णूपंत हे महाराष्ट्रातील चिंचवड येथे रहात होते त्यावेळी त्यांचे आडनाव चिंचवडकर असे होते. ग्वाल्हेरचे त्यावेळचे महाराज श्रीमंत जियाजीराव शिंदे यांनी विष्णूपंतांना ग्वाल्हेर दरबारात निमंत्रित केले. त्यांनीच विष्णूपंतांना पंडित ही पदवी दिली. नंतर तेच आडनाव या कुटुंबास चिकटले.

विदर्भ-मराठवाडा या भागात अनेक तेलगू भाषिक कुटुंबे आंध्रप्रदेशातून, अनेक पिढ्यापूर्वी महाराष्ट्रात आली आणि स्थायिक झाली. महाराष्ट्रीय संस्कृतीशी समरस झाली. आता त्यांची मातृभाषा मराठीच झाली आहे. वार हा कर किंवा वाले या प्रत्ययार्थाने जोडलेली आडनावे नागपूर विदर्भाकडे भरपूर आहेत. हेडगेवार, कन्नमवार हे त्यातलेच. लोकनायक बापूजी अणे यांचे मूळचे आडनाव अन्नमवार असे होते. वार सोडून, त्यांच्या पूर्वजांनी अणे हे मराठीशी जुळणारे आडनाव धारण केले. महाराष्ट्रातून आंध्रप्रदेशात स्थायिक झालेली मराठी मंडळी तेलगूभाषिक झालीत. तेथे सामावलेल्या केतकर आडनावाच्या काही कुटुंबांनी केतवार हे आडनाव धारण केले आहे.

महात्मा ज्योतीराव फुले म्हणजे ज्योतीराव गोविंदराव गोर्‍हे. गावात कुलकर्ण्याच्या वादामुळे गोर्‍हे कुटुंबीय सातारा जिल्ह्यातील कटगूण गाव सोडून पुण्यात धनकवडीला स्थायिक झाली. ते पुण्यात फुलांचा व्यवसाय करू लागले. त्यावरून त्यांचे आडनाव फुले असे रूढ झाले असावे.

कदम हे महाराष्ट्रातील प्रख्यात अैतिहासिक घराणे आहे. अ. स. ३४५ च्या सुमारास दक्षिण कोंकण आणि कर्नाटकाचा काही भाग यावर कदंब वंशाचे राज्य होते. याच कदंब वंशाने गोमंतक आणि असपासच्या प्रदेशावर सुमारे ८०० वर्षे राज्य केले. आता या घराण्याचे वंशज कदम या आडनावाने ओळखले जातात.

पहिल्या बाजीरावाचे आडनाव बर्वे असे होते. पेशवाअीची वस्त्रे मिळाल्यानंतर त्यांचे पेशवे हे आडनाव रूढ झाले. आजही पेशवे आडनावांची कुटुंबे आढळतात. संतमहंतांची आडनावे झाकलीच जातात. ज्ञानेश्वर महाराजांचे आडनाव कुळकर्णी, तुकोबारायाचे आडनाव मोरे, रामदासस्वामींचे आडनाव ठोंबरे असे होते.

नागपुरात अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या अेका शामने आपले आडनाव सोडून १९व्या वर्षी मानव हे आडनाव धारण केले. जाती, धर्म, वंश किंवा आनुवंशिकता न दाखविणारे हे आडनाव आहे. त्यांच्या पत्नीने आपले माहेरचे आडनाव बदलले नाही तर त्यांचा मुलगा आपल्या नावासमोर आअीचे आणि वडिलांचे फक्त नावच लावतो, आडनाव लावीत नाही.

आडनाव कोणत्या कारणामुळे बदलले जाअील याला काही नियम लावता येणार नाहीत. अॅडमिरल विष्णू भागवत यांचे मूळ नाव विष्णूकुमार शर्मा असे होते. कानपूरच्या यज्ञदत्त शर्मा यांचे ते सुपुत्र. सर्व गुण समान असले तर वरचा नंबर किंवा पदोन्नती, आडनावातील अंग्रजी वर्णाक्षराच्या आधारे देतात. शर्मामधला अेस् बराच खाली आहे. सहाध्यायी तर दास वगैरे आडनावाचे आहेत. म्हणून शर्मा जाअून तेथे बी पासून सुरू होणारा भागवत आला. वामनाचार्य आडनाव बदलून ते आचार्य असे घ्यावे असा आग्रह माझ्या मुली करीत असत कारण डब्ल्यूमुळे त्यांना नेहमी शेवटी बसावे लागे. पण आम्ही आडनाव बदलले नाही. आनुवंशिकता जपणारी आडनावे वगळली जाण्याची ही अुदाहरणे आहेत. ज्या कारणासाठी आपल्या पूर्वजांनी आडनावांची प्रथा रूढ केली ते कारणच नाहीसे होते आहे असे वाटते.

— गजानन वामनाचार्य

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*