मराठी आडनाव – बोंबला

Marathi Surname - Bombla

भुसावळजवळील, वरणगाव येथे माझी आत्या राहते. त्या कुटुंबाला, अहिल्याबाआी होळकरांच्या काळापासून अेका मंदिराची देखभाल करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मंदिराचा खर्च भागविण्यासाठी, थोडी शेतजमीनही देण्यात आली आहे. जमीन कसण्यासाठी ती अेका कुळाला देण्यात आली.
कुळकायदा आला तेव्हा त्या कुळाने जमिनीवर हक्क सांगितला. जमीन स्वत:ची नसून मंदिराची असल्यामुळे ती कुळकायद्यात येत नाही असे परोपरीने सांगूनही अुपयोग झाला नाही आणि शेवटी कोर्टात दावा लागला. कुळ…. वादी आणि आत्याचे कुटुंब….. प्रतिवादी असा खटला अुभा राहिला.
कुळाची अुलट तपासणी करतेवेळी, प्रतिवादीच्या वकीलाने विचारले, ‘तुझे नाव काय ?’
‘खुशाल बोंबला ‘ अुत्तर आले.
‘तुझे नाव विचारतो आहे, ते सांग.’
‘खुशाल बोंबला ‘ पुन्हा अदबीने अुत्तर आले.
न्यायाधीशंानी लाकडी हातोडा आपटीत, कुळाला त्यांचे नाव सांगण्याचा हुकूम सोडला. तेव्हा वादीचा वकील सांगू लागला.
‘कुळाचे नाव ‘खुशाल’ आहे आणि आडनाव ‘बोंबला’ आहे. म्हणूनच तो ‘खुशाल बोंबला’ हे स्वत:चे नावच सांगतो आहे साहेब.
सर्व अुपस्थित मंडळींनी ह्या विनोदाला दाद दिली.
नंतर त्याच्या धाकट्या भावाची अुलट तपासणी सुरु झाली.
‘तुझे नांव सांग ‘ वकीलांचा प्रश्न.
‘पुना बोंबला’ अदबीने अुत्तर आले.
आता मात्र न्यायाधीश चांगलेच रागावले. कोर्टात हा काय प्रकार चालला आहे. मघाशी खुशाल बोंबला म्हटले आता हा पुन्हा बोंबला म्हणतो आहे. वकीलाच्या प्रश्नांना नीट अुत्तर देता येत नाहीत का?
पुन्हा वादीच्या वकीलांनी खुलासा केला. साहेब, माझ्या अशिलाचे नाव ‘पुना’ आहे आणि आडनाव ‘बोंबला’ आहे म्हणून तो, पुन्हा बोंबला असे न म्हणता ‘पुना बोंबला’ हे आपले नावच सांगतो आहे. कोर्टाची बेअदबी करीत नाही.
आता मात्र कोर्टात प्रचंड हशा पिकला.
पुढे ती जमीन आतेकडेच राहिली आणि तेच कुळ कायम राहिले.

— गजानन वामनाचार्य

1 Comment on मराठी आडनाव – बोंबला

Leave a Reply

Your email address will not be published.


*