अर्चना वाघमारे (Archana Waghamare)

टपाल दिनानिमित्त आजीला लिहिले पत्र शेअर करते.

तिर्थरूप आईस,

शि. सा. न. वि. वि.

पत्रास कारण की, ९ ऑक्टोबर रोजी टपाल दिवस आहे. त्यानिमीत्ताने आपल्याला ज्याच्याशी बोलावेसे वाटत आहे ते पत्ररूपाने लिहून व्यक्त होण्याचे आहे. खूप विचार करावा लागला नाही गं की, कोणाला पत्र लिहू याचा. कारण पत्र म्हटलं की पहिल्यांदा माझ्या डोळ्यासमोर स्पष्टपणे उभा राहिला तो तुझा चेहरा गं.

आई तू माझ्या पप्पांची आई म्हणजे आमची आजी पण आम्ही तुला कधी आजी म्हटलंच नाही.आमच्या तोंडून म्हातारी आई हाच शब्द वापरला जायचा.किती ही ठरवले की तुला आई म्हणून हाक मारावी पण जमलेच नाही. म्हातारी आई बोलालयला खूप छान वाटायचं.आपुलकी वाटत होती व आहे.तुला चार मुले ,चार सुना,आणि आम्ही १५ पिल्लावल तुझी नातू-नाती,तुझे नशीब छान म्हणून तू परतूंडे ही पाहिलेस,त्यांना ही अंगाखांद्यावर खेळवलस. सर्वांचाच तुझ्यावर खूप जीव,प्रेम. तुझे प्रेम मिळण्यासाठी सर्व मुला व नातवंडांची धडपड चालत असे.आम्ही दिवाळी, उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्या की गावी यायचो.गावात आलो की बसस्टॅन्ड पासून गावातील लोक आपुलकीने चौकशी करायचे कधी आलात ?बरे आहात ना? त्यांना उत्तरे देऊन कधी एकदा घरी पोहोचतो याचा ध्यास मनी असायचा.

घराच्या सोफ्यात ,दाराच्या तोंडी ,भिंतीला टेकून बसलेली तू असायचीस आमचीच वाट पाहत.आम्ही आलो की,मायेने जवळ घेऊन तोंडावरून हात फिरवून आमचे गालावर ओट टेकवून मटा मटा मुके घ्यायचीस त्यावेळी तुझ्या तोंडून घासलेल्या मिश्रीचा वास यायचा पण तो ही हवाहवासा वाटायचा गं.आता ही गावी जातो पण तू त्या सोप्यावर भिंतीला टेकून बसलेली दिसत नाहीस गं…कधी कधी वाटते की आता तू कोठूनतरी येशील आणि त्याच मायेने, प्रेमाने,आम्हाला जवळ घेऊन तोंडावरून हात फिरवून आमचे मटा मटा मुके घेशील.पण आमची निराशा होते.तू कुठेच दिसत नाहीस.

मला अजून ही आठवतंय मी तुझी खुशाली विचारणेसाठी सन २००९ मध्ये पत्र लिहिले होते.त्या पत्रात एवढं लिहिले नव्हतं.कधीतरी तुला हे सांगायचं होतं गं.पण ते पत्र शेवटचं ठरलं.आज तुला आमच्यातून जाऊन ११ वर्षे झाली आहेत. माझ्या मनातले हे तुला सांगायला ११ वर्षे लागली.याच महिन्यात १४ ऑक्टोबर रोजी तुझी पुण्यतिथी आहे. माझे हे पत्र तुला वाचता जरी नाही आले तरी यातील माझ्या तुझ्यासाठीच्या भावना कोणत्या ना कोणत्या रूपाने तुझ्यापर्यंत नक्कीच पोहचतील याची खात्री आहे.

अजून खूप काही लिहावेसे वाटते पण आता पत्र पुरे करते.तू जिथे कुठे असशील तिथून आम्हाला पाहत असशीलच ना तुझा आशीर्वाद असाच कायम आमच्यासोबत राहू दे.

तुझीच नात

अर्चना

लोणंद,जि.सातारा.

— अर्चना वाघमारे

Archana Waghmare

लेखाची लिंक : https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/4111351132214604/

प्रोफाईल लिंक : https://www.facebook.com/archana.waghamare.50? 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*