सरोज भट्टू (Saroj Bhattu)

जागतिक टपाल दिनाच्या निमित्ताने माझ्या काही आठवणी लिहायला मिळत आहेत, ही एक छानशी संधीच मिळाली मला! माझा आणि पोस्टाचा जन्माचाच नाही तर जन्माआधीपासूनच संबंध. कसा‌ म्हणजे काय, माझे वडील १९२७पासून पोस्टात नोकरी करत होते आणि तेंव्हा त्यांचे लग्नच झालेले नव्हते, म्हणून म्हटलं मी असं.

मी पोस्टमास्तरांची मुलगी आहे,या गोष्टीचे खूप फायदे झाले.एकतर दर तीन वर्षांनी वडीलांची‌ बदली होत असे. बदलीमुळे नवी शाळा, नव्या मैत्रिणी, नवं गाव यांचा वेगवेगळा अनुभव येत राहिला. बदलीच्या गावी राहायला बहुतेक सरकारी घर(quarters) मिळतं असे. फक्त नाशिकला भाड्याचं घर होतं.

पोस्ट ऑफिसात वडील असल्याने पोस्टाचे व्यवहार लहानपणीच शिकता आले. नांदगावला असतानाच मी‌ होते. आजूबाजूच्या खेड्यातल्या, नांदगावला लग्न होऊन आलेल्या काही बायका एकदा पोस्टात आल्या. त्या निरक्षर, त्यांना माहेरी पत्र पाठवून खुशाली कळवायची होती. त्यांनी वडीलांना गळ घातली, वडीलांनी त्यांची समजूत काढली आणि मला, ती पत्र लिहायला सांगितली. ही मला मजाच वाटली, मी खरंच दोन-तीन पोस्ट कार्ड लिहून दिली. त्या बायका एकदम खूश झाल्या. कुणी मला पेरु दिले, कुणी भुईमूगाच्या शेंगा देऊन जणू कृतज्ञता व्यक्त केली. मला नेमकं काय करावं कळेना,पण खूप छान वाटलं,हे नक्की.तेंव्हापासून त्याच नाही दुसऱ्या बायकांना सुद्धा,पत्र लिहायला मीच हवी असायची.मी येईपर्यंत थांबून वाट‌ पाहात असायच्या. अगदी छोट्या कामातून आपण‌ इतरांना मदत करु शकतो, हे शिकायला मिळालं.

वडील निवृत्त ‌होईपर्यंत, अहमदनगर, पालघर, नाशिक, नांदगाव आणि सटाणा इतकी गावं फिरलो. वेगवेगळे लोक, त्यांचं रहाणं, सगळचं नाविन्यपूर्ण असायचं.अनेक मित्र-मैत्रिणी, शेजारच्या कुटुंबातील लोक, इतके वेगवेगळे असायचे, किती तरी अजूनही स्मरणात आहेत, फेसबुकमुळे संपर्कातही आहेत.म्हणूनच मला पोस्टाबद्दल फार कृतज्ञता वाटते.

अगदी सुरुवातीला, अव्वल इंग्रजीच्या काळात, फक्त स्वत:च्या सोयीसाठी इंग्रजांनी सुरु केलेली टपाल व्यवस्था काळाच्या ओघात समाजात महत्त्वाचं स्थान म्हणून ओळखली जाऊ‌ लागली.अगदी सुरुवातीला, घोडागाडीतून आणि घोडेस्वारामार्फत टपाल नेले जात असे. रात्रीच्या वेळी जंगलातून प्रवास करावा लागे, त्यावेळी टपालगाडीबरोबर बंदोबस्त म्हणून पुढे दोन, मागे दोन शिपाई आणि सर्वात पुढे मशाल घेतलेला मशालजी, हातात घुंगरू लावलेला दंडुका आपटत पळत जात असत कारण जंगलात वन्य प्राणीच नाही तर दरोडेखोरांकडूनही हल्ला होण्याची शक्यता आहे कारण ‌या‌ टपाल गाड्यांतून पैसाअडका, श्रीमंती चीजवस्तूसुद्धा पाठविलेल्या जात. गावागावात पोस्टमन जोरात ‌हाका मारुन टपाल देत असत म्हणूनच पोस्टमनला डाकवाला हा शब्द वापरला जातो. कारण डाक देना म्हणजे हाका मारणे असाही अर्थ आहे हे मी वाचलेलं आठवतंय मला..

तर अशी ही महत्त्वाची टपाल सेवा.सुखदु:खाच्या बातम्या आणणारा पोस्टमन, प्रेमिकांच्या दुनियेत अगदी आवडता मनुष्य होता, चातकासारखी वाट पाहणाऱ्या प्रियकराला, प्रेयसीची बातमी देणारा देवदूत न भासला तरचं नवलं!

आजच्या वेगवान जगात संपर्काची विविध साधने उपलब्ध आहेत, पण पोस्टाला अजूनही समाजात महत्त्वाचे स्थान नक्कीच दिले पाहिजे.

माझा तर पिंडचं पोस्टाच्या अन्नपाण्यावर पोसला आहे, या गोष्टीचं मी कृतज्ञ स्मरण करणे, माझं कर्तव्य नाही का?

— सरोज भट्टू

Saroj Bhattu

लेखाची लिंक : https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/4113768225306228/

प्रोफाईल लिंक : https://www.facebook.com/saroj.bhattu?

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*