माणूस श्रेष्ठ की सिंह श्रेष्ठ

एक माणूस अरण्यात फिरत असता तेथे त्याची एका सिंहाशी भेट झाली. त्यावेळी त्या दोघांनी निरनिराळय़ा विषयांवर बर्‍याच गप्पा मारल्या व त्यामुळे ते दोघे एकमेकांस आवडू लागले.

शेवटी मात्र ते ‘माणूस श्रेष्ठ की, सिंह श्रेष्ठ?’ या विषयावर बोलू लागले व त्याचे वादात रूपांतर झाले. ते दोघेही भांडू लागले. नुसत्या बोलण्याने माणसाचे श्रेष्ठत्व त्या माणसास सिध्द करता येईना.तेव्हा त्याने आपल्याजवळ असलेले शिल्प त्याला दाखविले.

सिंहाची आयाळ हातात धरून त्याच्या पाठीवर एक माणूस आहे असे ते शिल्प होते. ते पाहून सिंह त्याला म्हणाला, ‘ज्याने हे शिल्प तयार केले तो मनुष्य होता, तोच जर सिंह असता तर माणसाच्या छातीवर बसून सिंह त्याला मारतो आहे, असे त्याने दाखविले असते.’