तृप्ती जवळबनकर (Trupti Jawalbankar)

प्रिय आई ,

साष्टांग नमस्कार

खरतर तुला प्रश्न पडला असेल..उठल्यापासून झोपेपर्यंत २४ तास डोळ्यासमोर असुनही ते ही अगदी हाकेच्या अंतरावर आणि सतत तुज्याभोवती ‘आई आई’ म्हणुन पिंगा घालणारी मीआणि मुद्दाम तू जप करत असताना disturb कराव म्हणून उगाच “माझी आई” अस लाडतच म्हणत तुझ्या कमरेला गच्च विळखा घालुन कवटाळणार्या तुझ्या लेकिने अचानक पत्र लिहीण्याचे प्रयोजन कसे काय केले …?

अग ,परवा नाही का तू सकाळी तुळशीला पाणी घालताना म्हणालीस ..माझी तुळस काय छान दिसतेय ग..मंजूळा आणि हिरवीगार डवरलेली तूळस पाहून पूढे सहज म्हणून गेली ‘खरच माझी लेक आता लग्नाला आली’..आणि मग तुझे डोळे पाणवले..आंगणातील तुळस पाहून तुला जस वाटत तुझी लेक काही दिवसांनी सासरी जाईल. .तस तू घरातून अंगणात जातानाही तुला होणारा त्रास ,तुझी मंदावलेली चाल,कमरेत वाकलेली तू ..माथ्यावरचे केस विरळ होत चाललेले आणि तुझ्या पायाला लागणारी कळ, मला सांगत असतातच ग..की माझ्या आईच आता वय झाल आहे ..तुला आता पहिल्यसारख होत नाही..तू आता तीन जावयांची सासू आणि नातवंडांची आज्जी आहेस आणि म्हणुनच गेले कित्येक दिवस मनात घर केलेला आशय postday च्या निमित्ताने कागदावर उतरवला आहे …हे सगळ तुझ्यासमोर बोलताना माझा कंठ दाटून येतो ग..म्हणुन हे पत्र.

हाताच्या पाच बोटांप्रमाणे एकसारखे नसलेल्या तुझ्या पाच मुलींना त्यांच्या जन्मापासून ते उच्चशिक्षणाच्या शिडिवर पोचवतना तू तुझ्या हाडांच्या शिड्या केल्यास..आम्ह्ला मोठ करताना,शिक्षण ,लग्न,मुलींची बाळंतपण इथपर्यंतच्या प्रवासात आई तू आणि बाबा अनेक अनाकलनिय संकटांच्या मालिकेला समोरे गेला आहात..तुमच धारिष्ट, त्याग,आम्हा पाच बहिणींना संस्काराच्या दागिन्यांनी मढवताना आम्हाला मुलांप्रमाणे वाढवल आहे..स्व्तःच्या पायावर उभ केल.

आणि आज तुझ्या तीन लेकिंना सासरी पाठवुन माझी सासरी जाण्याची वेळ जवळ येतेय ..तेंव्हा असं वाटत ,उद्या मी सासरी गेल्यावर कोण काळजी घेईल तुमच्या तब्येतीची,वेळेच्या वेळी तुम्हाला गोळ्या कोण देइल..जशी तुला माझी काळजी वाटते ना की उद्या मी सासरी गेल्यावर मला गरमागरम पोळी कोण देइल..अगदी तशीच.म्हणून ना हल्ली मला तुझ्याकडे पाहून या ओळी म्हणाव्या वाटतात..अगदी अशिच आहेस तू …

“पिकलं सीताफळ त्याची हिरवीकंच काया
मायबाईच्या पोटामंदी सार्या दुनियेची माया “

आजवर तुम्ही आमचे पालक होता, अजुनही आहात पण ही पालकत्वची भूमिका मात्र आम्हाला पार पाडू दे      आता..लेकिकडुन कस घेवू हा विचार सोडून दे..तुम्ही आम्हाला मुलांप्रमाणे वाढवल ना मग आम्हाला करु दे ना आता तुमची सेवा..आम्ही कायम आहोत तुमच्या सोबत..!!!

फक्त तुझ्या अखंड मायेची, प्रेमाची ,तृप्तीची शाल पांघरु दे..

बस्स इतकच सांगायच होत..

“मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे “…

तुझीच,

लाडकी लेक

तृप्ती जवळबनकर

अंबेजोगाई

— तृप्ती जवळबनकर

Trupti Jawalbankar

लेखाची लिंक : https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/4116010001748717/

प्रोफाईल लिंक : https://www.facebook.com/profile.php?id=100009777465270

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*