माधवी माहुलकर (Madhavi Mahulkar)

॥श्री॥

दि.९। १०। २०२०

प्रिय माणुसकी,

पत्र लिहण्यास कारण की इतक्या वर्षात तुझा काहीच मागमुस नाही, आताशा आम्हाला तुझी खुप आठवण येते आहे. तुझी खुप गरज भासते आहे पण तु आम्हाला विसरलेली दिसते आहे, तुला आमची आठवण येत नाही का ग? खरच तुला आता शोधतांना खुप त्रास होतो आहे, तु जी नीतीमुल्य आम्हाला शिकवलीस त्याचा आम्हाला विसर पडला अस तुला वाटत आहे का? हो तसच असाव कदाचित. पुर्वी अस नव्हत ग, तुझ्यासोबत तुझी जिव्हाळा, आपुलकी, प्रेम, विश्वास, आधार, दया ही बहीण भावंड असायची, आमच्यासारख्यांच्या घरात एकत्रीतपणे हेपण आमच्यासोबत नांदायचे, कीती छान वाटायच न तेव्हा.

बाई ग आयुष्याची जीवघेणी घोडदौड सुरु झाली आणि खरच त्या दरम्यान तुझा आम्हाला विसर पडला, यामधे इर्षा, मत्सर, राग,वाद,विवाद,अबोला या तुझ्या शत्रुंनी आमच्या मनाचा ताबा घेतला आणि आमच्या नकळत तु कधी नाहीसी झालीस ते कळलच नाही बघ, जीवनात सगळं काही मिळत ग पण तुला मिळवण फार कठीण होऊन बसल आहे.

पुर्वीचे दिवस आठवले की डोळ्याच्या कडा पाणावतात, भलेही पैसा जास्त नसायचा पण आपल्या घासातला घास दुसरयाला देण्याची दानत होती, साध्याच चार भिंतींमधे सुख आणि समाधान गुण्यागोविंदाने नांदत होते, अपेक्षांचे ओघे मनावर नव्हते त्यामुळे मने प्रसन्न होती. मैत्रीसुद्धा कृष्ण आणि सुदाम्यासारखी हातात हात घालुन मिरवत होती, वर्षात दोनच वेळा मिळणारया कपड्यात समाधान होत, तुझी भावंड सतत आमच्यासोबत असायची त्यामुळे रुसवे, फुगवे, भांडण हे तात्पुरतेच असायचे, तु या सगळ्यात मोठी न ग,तुच सगळयांना सांभाळुन घ्यायची.

पण खरच तुलाच सगळे विसरले.ही जीवघेणी स्पर्धा जेव्हपासुन सुरु झाली तेव्हापासुन तुझ्या अस्तित्वाला तडे जाऊ लागले, प्रत्येकजण पैसा, प्रसिद्धी यांच्या हव्यासाने झपाटल्या गेला, सुखासीन जीवन जगण्याकरता रक्ताचे पाणी करु लागला, भोगी, विलासी वृत्तींना खतपाणी देऊ लागला,मनुष्य माणुसकीला विसरला.

आयुष्याच्या घोडदौडीत तो डोळ्यावर पट्टी चढवुन आंधळेपणाने वागयला लागला. स्वार्थापुढे त्याला सगळयाच गोष्टी गौण वाटायला लागल्या.सख्खे भाऊ बहीण एकमेकांचे हाडवैरी होऊन एकमेकांच्या कुटुंबांचा नाश करु लागले, मुल आईबापाची वैरी झाली म्हणुन वृद्धाश्रमांची संख्या वाढत चालली आहे.अग काय आणि कीती कीती सांगायच ग तुला? तु मनुष्यावर एवढी रागावली आहेस का ग? सहाजीकच आहे म्हणा तुझे असे रागावणे, जेव्हा तु आमच्यात होतीस तेव्हा आम्ही तुझी किंमत केली नाही, त्यामुळे तुला आम्हाला धडा शिकवणे भागच होते.आम्हाला अक्कल यावी, आमची डोकी ठिकाणावर यावीत म्हणुन तर तु आमच्यापासुन दुरावा साधलास हो न?

पण आता बस झाल बाई, डोळ्यातील आसव थांबता थांबत नाही आहेत, या सहा सात महिन्यात तर संकटांनी कहरच केला आहे, पण तरीही या काळात पोलीस, डाॅक्टर्स, नर्सेस, समाजसेवी संस्था, समाजसेवक यांच्या अथक परीश्रमातुन तुझे दर्शन झाले, पण फक्त तेवढेच पुरेसे नाही, आम्हाला तुझी कायमचीच गरज आहे. नवीन पिढीला आपले आशीर्वाद देशील की नाही? एक मनुष्य म्हणुन मी तुझी सर्वांच्या वतीने माफी मागते पण तु आमची साथ सोडु नकोस ही विनवणी करते.जीथे कुठे असशील तिथुन ताबडतोब आम्हाला सावरायला त्वरीत निघुन ये.

तुझी खरच खुप खुप उणीव भासते आहे.

तुझ्याच प्रतिक्षेत,

तुझाच मानव समाज.

 

सौ.माधवी जोशी माहुलकर.

— माधवी माहुलकर

Madhavi Mahulkar

लेखाची लिंक : https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/4114388018577582/

प्रोफाईल लिंक : https://www.facebook.com/profile.php?id=100009376486496

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*