सुनील गोबुरे (Sunil Gobure)

एक अनावृत पत्र…
प्रिय पोस्टमन काका,
चमकलात ना..?
‘आँ..पोस्टमनलाच पत्र?’ असे भाव मला तुमच्या चेह-यावर दिसताहेत.. अगदी स्पष्ट..

काका,
सकल दुनियेची पत्रे तुम्ही पोचवता.. हजारो लोक पत्र लिहीतात.. हजारो लोकांपर्यंत ती तुमच्याव्दारे पोहोचतात.. कुणी त्या पत्राने आनंदीत होतात. कधी हीच पत्र मने विदीर्ण करुन जातात. पण हे सर्व निर्वीकारपणे तुम्ही वाटत राहता.. एखाद्या व्रतस्थ संंन्याशासारखे..
‘नाही पुण्याची मोजणी..
नाही पापाची टोचणी..
जिने गंगौदकाचे पाणी..’
अगदी या गीतात म्हटल्या प्रमाणेच..

पण मग, कोणी तुम्हाला पत्र पाठवतं का हो काका? म्हणजे तुम्ही बटवड्यासाठी साॕर्टींग करताना.. अचानक एका पत्रावर आपलेच नाव पहावे अन अचंबित व्हावे.. असे कधी झालय का हो तुम्हाला? मला वाटतं.. नाही..!!
कारण पोस्टमनचे काम काय..तर पत्र पोचवणे.. त्याला कुणी कशाला पत्र लिहायला पाहिजे..? असा कद्रु विचार करणारे आम्ही आणी आपला समाज.. तुम्हाला गृहीत धरलेलं असतं आम्ही.. तुम्हालाही एखाद्या पत्राची आस असेल.. तुम्हीही आयुष्यभर एका तरी पत्राची वाट पाहिली असेल..(जे तुम्हाला कधीच कोणी लिहीले नसेल..) हे आमच्या कधी डोक्यातच आले नाही हो काका..म्हणूनच उशीरा का होइना…हा पत्रप्रपंच…

काका..
तुम्हाला आठवत असेल नसेल.. एक काळ होता.. पोस्टमन हा काही लोकांसाठी देवदूत असायचा.. एका साध्या पोस्टकार्डवर आलेली आपल्या प्रियजनांची खुशाली.. जगण्याला बळ द्यायची तेंव्हा.. आंतरदेशीय पत्राचा अगदी सगळा भाग लिहील्यावरही..शेवटी त्याच्या आतल्या फ्लॕपवरही ‘ताजा कलम’ लिहीताना.. अजून जागा नाही म्हणून जडावलेल्या हातातून..उमटणारे प्रेम कागदावरही दिसायचे..माझी मुंबईची मावशी व आई अशी पत्रे एकमेकांना लिहायच्या.. कितीही लिहीले तरी पुरे न पडणारे ते शब्द.. हे सारे तुम्हीच तर पोहोचवायचात ना काका..? माझी आई मला नेहमी म्हणायची.. “तु खोपोलीला पहिल्या नोकरीसाठी गेलास.. तेंव्हा तिथून जी पत्रे पाठवायचास..ती मला अजूनही आठवतात..” खूप काही असायचं त्या पत्रांमधे.. ‘जरा इथले जेवण वेगळे आहे..पण होईल सवय बाकी सगळं ठीक आहे..’ या माझ्या दोन वाक्यांमधली अव्यक्त वाक्ये.. आईला बरोबर वाचता यायची ती.. तसेही reading between the lines हे आयांनाच जमतं..काय काय सुचना यायच्या मग तिच्या पुढच्या पत्रात.. हे प्रेम..ही काळजी.. तुमच्यामुळेच तर पोहोचायची आमच्यापर्यंत..!! पण मग पुढे मिरजला घरी फोन आला. रात्री अकरानंतर एस.टी.डी. बुथवरुन फोन होउ लागले आणि पत्र पाठवणे इतिहासजमा झाले..माझ्यासाठी तरी.. आणि मग कुठेतरी ती पत्रातली आत्मीयता हरवली. एस.टी.डी बुथच्या पॕनेलवर दर चार सेकंदाला वाढणारा आकडा.. आणि ते पहात ‘चल.. ठेवतो आता..’ म्हणून संपवलेला संवाद..
हो… खरंंय.. पत्रे पाठवणे संपले, आणि हा अंतरमनाचा संवादही संपला..

पोस्टमन काका,तुम्हाला कदाचित कल्पनाही नाही आम्ही किती बदललोय.. पत्र ते एस.टी.डी ते ई-मेल ते मोबाईल ते व्हाॕट्सअप फेसबुक.. हा आमच्या पिढीने केलेला प्रवास अविश्वसनीय आहे.. पण तो बहुधा तुम्हाला बायपास करुन गेला असावा.. गावाबाहेरुन काढलेला रस्ता असतो तसा.. तुम्ही तसेच राहिलात..मागेच कुठल्यातरी थांब्यावर..
किंवा एखाद्या छोट्या रेल्वे स्टेशनवर.. जिथे कोणतीही एक्स्प्रेस थांबत नाही.. का असे राहिलात..? का नाही बदललात तुम्हीही..काळाबरोबर? का अजूनही तुमचा तो खाकी युनीफाॕर्म घालून सायकलवरुनच फिरत असता तुम्ही..? उन्हात, पावसात आणि थंडीतही .. बहुधा तुमच्या त्या बटवडा पिशवीत असतात आता.. बिले, नोटीसा, सर्क्यूलर, मासीके वा आमंत्रण पत्रीकाच.. पण पत्रं…? अहो पत्रं कोण पाठवतात आजकाल?

मोबाईल युगाने ज्या गोष्टी कालबाह्य झाल्यात त्यातलेच एक पत्र.. पण काका..मला खात्री आहे.. सारे काही संपलेले नाही.. काही गोष्टींचा उलगडा होतोय आम्हाला.. आम्हाला लवकरच कळेल..आमचे हे मोबाईल जगणे हे खरे जगणे नाहीये.. आम्ही खूप दुरावलोय एकमेकांपासून.. आई वडिलांपासून, भावा बहिणींपासून, मित्रांपासून..

लवकरच आम्ही पुन्हा पत्र लिहायला सुरवात करु.. आणि तुमची ती प्रेमळ हाक घराबाहेर पुन्हा यायला लागेल.. “पोस्टमनssss…!” त्या दिवसाची आम्ही वाट पाहू.. तुम्हीही पहालच.. मात्र तो स्टेशनवरचा फलाट सोडू नका बरं..!!
थोडी कळ काढा नी तिथेच थांबून रहा.. आमची एक्स्प्रेसही लवकरच थांबेल तिथे…. तुम्ही असाल ना..?

कळावे.. लोभ असावा..
तुमचाच,
सुनील गोबुरे

— सुनील गोबुरे

Sunil Gobure

लेखाची लिंक : https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/4115966138419770/

प्रोफाईल लिंक : https://www.facebook.com/sunil.gobure?

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*