जयश्री पोळ (Jayshree Pol)

आज जागतिक टपालदिन एका ग्रुपसाठी लिहीलेलं हे पत्रलेखन ,खुप पत्र लिहीली मी….मैत्रीणी नातेवाईक यानां म्हणजे २००१ पर्यंत

नंतर फोन आला त्यामुळं प्रमाण कमी झालं…

प्रिय,

अंगण

सा.द.वि.वि.

माझं बालपण मी ज्या अंगणाच्या अंगाखांद्यावर खेळले त्या अंगणास ……

आजी व मी म्हशीच्या मागं जाऊन शेण गोळा करुन शेणात पाणी टाकुन हिरव्यागार शेणाने तुला लिंपायचो….शेण कमी असलं की आजी फक्त सडाच मार म्हणायची . मग मी सुंदर रांगोळी काढायचे त्यावर हळदी कुंकु टाकलं की तुझं रुपडं किती सुशो़भीत व्हायचं.

मामी आजी तुझ्याच मध्यभागी असलेल्या तुळशीला व महादेवाला मनोभावे पुजा करायच्या.

खंड्या (कुत्रा) सावली आली की तुझ्या शेणावळीत तोंड पोटात खुपसुन झोपायचा. कोंबड्याचीं पळापळ असायची…

तिथंच जरा शिराळ पडलं की मी भातुकलीचा डाव मांडायचे चिखलाची भाकरी केली की तुझ्यावर चिखलाचा कुस्कुरा पडायचा…

किती खराब व्हायचास तु ….फुफाटा व्हायला वेळ लागायचा नाही…

तुझ्याच एका कोपर्यातल्या चुलीतली राख तुझ्या अंगावर पसरायची…वार्याच्या हेलकाव्याने तुझं हिरवं रुप धुरकट करायची… येता जाता कुणाच्या पायाच्या नखानं फोलपाटा निघाला की सगळं अंगच तुझं रोज रोज खराब व्हायचं मग तु ओसाड दिसायचास….सारवलेल्या अंगणा..आता तु कसा आहेस…पुर्वीसारखा आता दिसत नाहीस म्हणे … परवा मामी म्हणत होत्या…. आता तुझं रुपडं बदललंय शहाबादी फरशी टाकलीय अन् खरच परवा तुला पाहिलं ….वाडा छान वाटला  पण माझं अंगण कुठंतरी लपुन बसलंय असं वाटलं….. पुर्वीच्या अंगणात घरापेक्षा माझा वावर तुझ्यासोबतच जास्त असायचा…. तुला आठवतं का रे …. झिम्मा, फुगडी ,गजगे ,चिंचोक्याचा किंवा खड्याच्या वडीचा डाव त्याच सारवलेल्या अंगणात तुझ्याच अंगावर मामेबहिणीसोबत खेळ खेळायचे …तु सदैव सोबती होतास… प्रत्येक पावसाळ्यात तुझ्यात साचलेल्या पाण्यात उड्या मारल्या…. बघ तु किती कणखर होतास पण ति उड्या मारण्याची ताकद माझी हरवलीय रे आता…हिवाळा आला की अंगणात शेकोटी करुन सुखद झळाही झेलल्या ….पण आता सुखद झळाही कुठेतरी फरपटत नेतात. उन्हाळ्यात अंगणात भर दुपारी तु्झ्यावर पडणारा चिंचेच्या चिगुराचा वर्षाव….रात्री तुझ्याच अंगावर चिंधी झालेली वाकळ त्यावर दुसरी चांगली वाकळ अंथरुन रात्रभर गार वार्यात गाढ निद्रापण अंगणा तुझी उष्णता कधी कधी फार पोळुन जायची …पण त्या उष्णतेचे थेंब थंड झाले की तु तुझा ओलसरपणा जाणवु द्यायचास ….आपलं नातंच पुर्वीपासुन असं दृढ होतं ना…. अंगणातच साखरपुडा अंगणातच माझ्या लग्नाच्या बांगड्या भरायचा कार्यक्रम किती सुख दिलंस ना तु….तु प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार झालास…..तुझ्या माझ्या आठवणी म्हणजे माझ्या आयुष्याचं अत्तर आहे जे मी रोज हुंगत असते …म्हणुन तर आठवणीवर लिहीत असते….काळ लोटले ….कित्येक पावसाळे उन्हाळे हिवाळे गेले…पण तुझी आर्त साद मला सतत येते…..

सुखदुःख येणं म्हणजेच जीवन….आजी आजोबा तर गेलेच गेले…. पण या पाच वर्षात तुझ्यावरच बारक्या तरुण भावाचा मृतदेह ठेवावा लागला होता. मामाच्या तरुण सुनेनंही शेवटचा श्वास तुझ्याच अंगावर घेतला होता… तुलाही सवय झालीय रे दुःख झेलायची…. कारण आपलं नातंच पुर्वीपासुन असं दृढ आहे…..

तुझं एक बरं असतं बघ तु सगळ्यानां सामावुन घ्यायचास तुझ्या स्वभावात तक्रारीचा सुर मात्र कधी गावला नाही अगदी माझ्या लक्ष्मीमायसारखं ….कुणी तुडवलं ,कुणी रडवलं ..म्हणत कधी किरकिर नाही …… आपलं नातंच असं दृढ राहिलंय…..

आता पत्र लिहीताना तुझं पुर्वीचं रुप समोर दिसतंय मन व अंगण याचा खुप जवळचा संबंध असतो ना….पण या शहरी भागात ना अंगण ना कुंपण फक्त चार भिंतीत तुझं नसणं मात्र जीवाला खातंय. इथे अंगण नाही तर मनाला बंदिस्तपणाचं लिंपण चढेलं की काय असं वाटुन राहतं….. खुप झालं इथंच थांबते पुन्हा एकदा साष्टांग दंडवत…???

सौ.जयश्री सदाफुले_ पोळ

(उस्मानाबाद )खोपोली

(हे पत्रातलं अंगण आरळी (बु)

ता.तुळजापुर

जि.उस्मानाबाद

जिथं मी लहानाची मोठी झाले म्हणजे आईचं माहेर व माझं आजोळ आहे माझ्या मामाचं गाव)

— जयश्री पोळ

Jayashree Pol

लेखाची लिंक : https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/4113718718644512/

प्रोफाईल लिंक : https://www.facebook.com/jayshree.pol?

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*