शिल्पा स्वामी-निंबाळकर (Shilpa Swami-Nimbalkar)

टपाल , तार , मनिऑर्डर

टपाल,पत्र!

“टपाल”,”तार”,”मनिऑर्डर”,

असा आवाज तर आता कालातीतच झाला आहे.हा आवाज खाकी गणवेश व टोपी घालून एक शबनमी बॅग अडकवून सायकलची घंटी वाजवून वर्णी देणारे असे पोस्टमन काका द्यायचे आणि,घरातील मोठे जे कोणी असेल त्यांची स्वाक्षरी घेवून पत्र,मनिऑर्डर हातात देवून सायकलला टांग मारून निघून जायचे.

भारतीय डाकमुद्राविद्येला प्रदीर्घ इतिहास आहे.ईस्ट इंडिया कंपनीने १६८८ मध्ये मुंबई व मद्रास येथे टपाल कार्यालये स्थापन केले.रॉबर्ट क्लाइव्हने १७६३ मध्ये व्यवस्थित टपाल सेवा सुरू केली पण ती फक्त कार्यालयीन टपालापुरतीच मर्यादित होती. तथापि १८३७ सालच्या भारतीय टपाल खात्याच्या अधिनियमांनुसार सर्व भारतभर टपाल सेवा आरंभ झाली.१९११ मध्ये जगातील पहिली हवाई टपाल सुरू करणारा भारत हा पहिला देश होता,आणि १९२९ मध्ये खास हवाई टपालटतिकिटांचा संचलन प्रसिद्ध करणारा ब्रिटिश राष्ट्रकुलातीलही पहिला देश म्हणून ही भारतच होता.टपालाची वाहतूक पृष्ठभागावरून व हवाई मार्गाने होते.  

आमच्या लहानपणी आमचे आजोबा(वडिलांचे वडिल) ज्यांना आम्ही आप्पा म्हणायचो,(जे लातूरला राहात होते व आम्ही आमच्या पप्पांच्या नोकरीनिमित्त परभणीला राहात होतो)ते आम्हाला नित्यनेमाने महिन्यातून एकदा तरी पत्र पाठवायचे.किती प्रेमळपणे पत्र लिहित होते ते,आणि शेवटाला एक वाक्य हमखास लिहायचे ते-“बाकी सगळे क्षेम”.खूप अप्रूप वाटायचे त्यांचे पत्र येई तेंव्हा,न् त्या काळात आजच्या एवढे मोबाईल वगैरे,छे,नव्हतेच जणू म्हणून आम्हा सर्वांची ख्याली खुशाली अप्पांना कळवण्यासाठी पप्पा किंवा मम्मी सोबत बसून आम्ही पत्र कसे लिहितात वगैरे बघत असू.साधे पोस्ट कार्ड,आंतर्देशीय कार्ड आणि कुठले कुठले प्रकारचे टपाल असतात ते माहित करून घेतले होते.शिवाय पत्र पाठवतानाच्या दोन महत्वाच्या गोष्टी त्यातली 1-नाव,पत्ता,पिनकोड- पत्र ज्या व्यक्तीला पाठवायचे,त्या व्यक्तीचे अचूक असे नाव व पिनकोड सहित सविस्तर पत्ता लिहिणे फार गरजेचे.आणि 2- तिकिट.

त्या काळात आजच्या सारखे video call करून राखी बांधून वगैरे होत नव्हते,तर आमची मम्मी टपालाद्वारे तिच्या भावांना म्हणजे आमच्या मामांना राखी पाठवायची व आम्ही पण आमच्या चुलत भावंडांना पत्र लिहून सोबत राखी पाठवायचे,मजा होती ती पण.भाऊ सुध्दा ताई,बहिणीच्या टपालाद्वारे येणा-या राखीची वाट बघायचे व बहिण पण राखी मिळाली म्हणून सांगणारे,भावाच्या प्रतिउत्तराच्या पत्राची वाट पाहायची.ते वाट पाहणे पण खूप सुखद होते ना!

काळ पुढे सरकत गेला,आता आप्पा ही नाहीत,आणि पत्र,टपालाचा वापर पण मागे पडला.

प्रगत तंत्रज्ञानाने मोबाईल वगैरे वापरणे सोपे झाले.आजच्या पिढीला पोस्ट ऑफिस, पोस्टमनसारखं हे सर्व शाळेच्या Field trip मधून सांगितले जाते वा ओळख करून दिली जाते.आता सर्वत्र मोठ्या मोठ्या सोसायट्या असतात तेथे वैयक्तिक letterbox लावलेले असतात,मग पोस्टमन काका आलेले पत्र वगैरे त्यात टाकून जातात,त्यामुळे Community Helpers पैकी एक असणारे पोस्टमन काका मुलांना भेटतात ते कुठे तर field trip at post office मध्ये.

जुन्या काळात कित्येक अशी गाणी जी पत्र व पोस्टमन काकांवर लिहिलेली प्रसिध्द आहेत.आणि हे पोस्टमन काका,पत्र नुसतेच घरपोच करत नव्हते तर अडाणी लोकांना वाचून पण दाखवत व त्यांच्यासोबत दोन-चार सुख दुःखाच्या गोष्टी पण बोलत होते.

आज “जागतिक टपाल दिवस,”म्हणून,लहानपणीच्या टपालाशी जोडलेल्या आठवणींना उजाळा देण्याचा हा प्रयत्न,बस्स!

(९/१०/२०)

 

— शिल्पा स्वामी-निंबाळकर

Shilpa Swami Nimbalkar

लेखाची लिंक : https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/4112076538808730/

प्रोफाईल लिंक : https://www.facebook.com/shilpa.nimbalkar.9?

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*