आरती शिरोडकर (Aarti Shirodkar)

प्रिय आईस

प्रिय आईस,

एक घट्ट मिठी आणि सप्रेम नमस्कार 

कशी आहेस? खरं तर आपण बर्‍याच वर्षांनी लिखित स्वरूपात बोलतोय त्यासाठी आम्ही साहित्यिक चे आभारच मानायला हवेत. त्यांनी आज टपाल दिनाच्या निमित्ताने हा उपक्रम राबवलाय. नाहीतर मी तुला पत्र लिहिण्याचा तसा काही प्रश्नच उद्भवत नाही कारण तसं तर आपण रोजच बोलतो आणि हो मला माहितेय आज परत तू थोडी फार मला रागे भरशीलच, हा एवढा सोप्पा विषय मी पत्रलेखनासाठी निवडला म्हणून कारण तुझा एकच अट्टाहास असायचा नेहमी, सगळ्यांपेक्षा वेगळा विषय निवडायचा. यावरून आपल्यात बर्‍याचदा वाद पण झालेत. पण आज राहू दे अगं ! या निमित्ताने मायलेकीचं हितगुज की काय असतं ते मला पण करायला मिळेल आणि हा विषय असताना at least आज तरी मी दुसरा कोणता विषय निवडूच शकत नाही. आत्तापर्यंत फक्त ऐकलं होतं, लग्न झालेल्या मुली म्हणे आईबरोबर तासनतास गप्पा मारत बसतात पण मला ही संधी कधी मिळालीच नाही. आज या पत्राच्या निमित्ताने आपणही करू थोडंं हितगुज.

खरं तर तुला जाऊन १९ वर्ष झाली. पण मला हे सगळं अगदी कालच झाल्यासारखं वाटतं नेहमी. ते दिवस जसेच्या तसे डोळ्यासमोर आहेत. हे असं होईल आणि अचानक तू एक दिवस आमच्यात नसशील असं कधी वाटलंही नव्हतं आम्हाला. खरं तर मला तेव्हा खूप राग आला होता, स्वत:चा, परिस्थितीचा आणि किंचित तुझाही. अशी कशी गेलीस तू? मला न भेटता. आपण बोललो पण नव्हतो नीट. असो ! नियतीचे खेळ कोणाला चुकलेत?

पण तुला सांगू का मला बर्‍याचदा असंच वाटतं की तू आहेस आमच्यात. कुठेच नाही गेलीस, जाणवतंय आम्हाला तुझं अस्तित्व, आयुष्यातले कितीतरी प्रसंग, क्षण तू आमच्यात असल्याची प्रगल्भतेने साक्ष देतात. यात आम्हाला वेगळं सिद्ध करून दाखवण्याजोगं काहीच नाही आहे. फक्त तू दिसत नाहीस एवढंच. आजही तू आहेस आमचं कवचकुंडल बनून, म्हणूनच आतपर्यंतची सर्व संकटं शिताफीनं पार पडलीत.

शी! मी पण काय बोलत बसलेय. आज एवढी सुवर्णसंधी मिळालीय तर सगळं दु:खदच बोलतेय. पण बोलल्यावर मन हलकं होतं म्हणतात म्हणून बोलले. बाकी बोल, कशी आहेस? तिथे पण मित्र-मैत्रिणींचा गोतावळा केला असशीलच. किती पार्ट्या केल्यास? पाणीपुरी किती खाल्लीस ते सांग? आणि आईसक्रिम? कुल्फी मिळते का गं तिथे? मुख्य म्हणजे मटका कुल्फी मिळते का? ए आई, मला पण येतं हां आता कढईतलं सुकं चिकन बनवता, ते तू साजूक तुपात बनवायचीस ना ते वालं. आवडतं सगळ्यांना आणि पुरणपोळ्या पण येतात. माझ्या चांगल्या बनतात असं दादा बोलतो. पण मी फक्त हळद घालते, तू नाही घालायची ना ! तुझ्या खास मैत्रिणींना करते अधून-मधून फोन. त्या पण करतात मला, वाढदिवसाला, अ‍ॅनिवर्सरीला. बरं वाटतं बोलून त्यांच्याशी. तू नेहमी सांगायचीस, माणसं कमवायला शिक. शिकले, जमवलीत मी पण माणसं आणि त्यांच्या संपर्कात पण राहते मी. हल्ली लिहायला लागलेय म्हणजे आधी पण लिहायचे पण आता मी सगळं social media वर पोस्ट करते म्हणजे कळतं मला लाईक्स आणि प्रतिक्रिया मिळाल्या की कितपत जमलंय ते. आधी काही लिहिलं की त्यात फेरबदल करून द्यायला तू होतीस, आता ती संधी हुकलीय पण हां सगळीकडून विशेषत: बाबांकडून अगदी तुझ्यासारखीच कौतुकाची थाप मिळतेय. तू खूप माणसं कमावलीस आणि त्यारूपी आयुष्यभराची शिदोरी दिलीस. मामा-मामी, मावश्या, काका, आत्या सर्वांनीच भरभरून प्रेम दिलं. प्रसंगी सगळ्यांनी खंबीर आधार बनून साथ पण दिली अजूनही देतायत. तरीही या सगळ्यात तुझी उणीव कायम आहे. कारण आई, आई असते ना गं ! तुझी जागा कुणी कसं घेईल? आणि हेच तर मातृत्वाचं खरं वरदान आहे ना! शल्य आहे मला या सर्वाचं पण ते थोडं कमी व्हावं म्हणून बाप्पाने कन्यारत्न दिलंय मला आशीर्वादात. मायलेकीचं हितगुज, मायलेकीची मैत्री सगळं सगळं भरून काढणार आहे मी माझ्या बाळाबरोबर. तू नको वाईट वाटून घेऊ आणि आधी तू ते गाणं ऐकून रडायची ना, “गंगाजमुना डोळयांत उभ्या का? जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी राहा” ते मला फार कॉमेडी वाटायचं, खूप हसू यायचं पण आता त्या गाण्यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ किती गहन आहे, ते कळायला लागलंय. so त्यासाठी Sorry.

चल आता पुरे करते ! लिहायचा कंटाळा आला म्हणून नाही अगं. काय तू? कालानुरूप सवयी बदलल्या आहेत माझ्या. अगं इथे शब्दांची मर्यादा आहे ना, म्हणून. नाहीतर हे पत्र कधी संपणारच नाही. तू काळजी घे. आम्ही सुखी आहोत. आशिर्वाद वेगळे मागायची गरज नाही ते सदैव आहेतच. आणि पत्राचं उत्तर पण वाचकांच्या प्रतिक्रियांमधून मिळेलंच. तू टेन्शन नको घेऊ. ओके? चल, टाटा.

तुझीच लेक,

आरती.

— आरती शिरोडकर

Aarti Shirodkar

लेखाची लिंक : https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/4115013271848390/

प्रोफाईल लिंक : https://www.facebook.com/aarti.shirodkar.31?

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*