हा विषय मी वाचला तेंव्हा सर्वप्रथम माझ्या मनात विचार आला तो भाषेचा. मानव हा धरतीवरचा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. हे त्याने अनेक पुराव्यांनी सिद्ध केले आहे. त्याने लावलेला भाषेचा शोध हा त्यापैकीच एक,असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
भाषा कशासाठी तर विचारांच्या आदानप्रदानात सुलभता आणण्यासाठी. ज्यावेळी आपले विचार, आपली मते कुटुंब, आप्तस्वकीय यांच्या पलीकडे जाऊन अनोळखी तरीही आपल्या असलेल्या लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत अशी इच्छा असते तेंव्हाच लेखनाचा म्हणजे वाङमय निर्माण करण्याचा मार्ग निवडला जातो.अशा साहित्य निर्मिती करणाय्रांना आपण साहित्यिक म्हणून परिभाषित करतो.
जगाच्या पाठीवर असंख्यात भाषा बोलल्या जातात. अशा सर्वच ज्ञात अज्ञात भाषांमध्ये विपुल प्रमाणात लेखन झालेले असणारच. त्यापैकी काही वर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू या!
इंग्लिश साहित्यिक विल्यम शेक्सपिअर याचे नाव माहिती नाही असा व्यक्ती विरळाच. विविध विषयांवरची, निरनिराळ्या बाजाची नाट्यसंपदा त्याच्या नावे आहे.अनेक ठिकाणी त्याच्या नावाचा उल्लेख ‘इंग्लंडचा राष्ट्रीय कवी’ असा केला जातो. म्हणजे तो एक प्रथितयश कवीही होता. थोडक्यात महान साहित्यिक या उपाधीस तो पात्र होता.
याचवेळी माझे लक्ष दुसऱ्या एक चिमुकल्या लेखिकेने वेधले.’द डायरी ऑफ अँन फ्रँक’ ची लेखिका अँन फ्रँक वय वर्षे 13! हिटलरच्या भीतीने कुटुंबियांसह लपून जीवन जगत असताना तिला आलेल्या अनुभवांच्या दैनिक नोंदी केलेल्या एका दैनंदिनीकडे.तिच्या मरणानंतर कित्येक वर्षानी प्रकाशित झालेल्या या डायरीची मूळ भाषा डच आहे परंतु पुढे तिची ६० भाषांमध्ये भाषांतरे झाली.
या दोन उदाहरणांमध्ये प्रचंड विरोधाभास आहे. कुठे भरपूर लेखनाचा धनी असलेला शेक्सपिअर तर कुठे आपल्या अल्पायुष्यात एक च पुस्तक लिहीणारी अँन फ्रँक. तुलना होऊच शकत नाही पण दोघेही लोकप्रिय ख्यातनाम आणि ‘साहित्यिक’श्रेणी प्राप्त शिलेदार होते यात शंकाच नाही.
संस्कृत ही पुरातन भारतीय भाषा आहे. यामध्ये आद्य गुरु श्री व्यास,रामायणकार महर्षि वाल्मिकी, कालिदास, अशा दिग्गज साहित्यिकांची मांदियाळी आहे.हिंदी मध्ये कबीर, तुलसीदासापासून आधुनिक काळातील मैथिलीशरण गुप्ता, महादेवी वर्मा यासारख्या कवी लेखकांची नावे मोठ्या आदराने घेतली जातात. बंगाली भाषा रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद, यांच्या सारख्या महान साहित्यिकांच्या लिखाणाने अलंकृत झालेली आहे.
मराठी वाङमयाची कक्षा तर चकीत करणारी आहे. आद्य मराठी साहित्यकार संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांपासून सुरु झालेली ही तेजःपुंज आकाशगंगा निरंतर अनंत आहे. मराठी वाङमयाचा श्रीगणेशा संत वाङमयाने झालेला दिसतो. अनेकानेक संत कवीनी या भांडारात भरच घातली आहे. सर्वांचा विषय एकच ‘विठुराया’ परंतु वर्णनाची रित मात्र प्रत्येकाची स्वतंत्र, स्वतःची.प्रत्येकाला आपल्या व्यवसायातच परमेश्वर सापडला. या संतमहात्म्यांमध्ये स्वतःची वेगळी छाप पाडणारी तुलनेने आधुनिक कवयित्री बहिणाबाईंचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. या निरक्षर स्त्रीने रचलेल्या काव्याला तोड नाही.
कालांतराने ऐतिहासिक लेखनाच्या पर्वाला आरंभ झाला. काळानुसार सामाजिक समस्या लेखन विषय झाल्या. विनोदी लेखकांची फळी तयार झाली. इतिहासावर लिहीणारे बाबासाहेब पुरंदरे, शिवाजी सावंत, रणजित देसाई समाजाच्या गळ्यातील ताईत बनले. तर अन्यायी रुढी परंपरा विरुध्द आपल्या लेखणीतून आवाज उठवणारे लेखक कवी आदरणीय झाले. त्याचवेळी विनोदाच्या माध्यमातून आनंदाबरोबर समाजातील विषमतेवर हसत हसत नेमके बोट ठेवले जात होते. पु. ल. देशपांडे यांना तर महाराष्ट्र दैवतच मानतो.
नवरसांचा पुरेपूर वापर करून विविध स्वरुपाची साहित्य निर्मिती झाली आहे. यापैकी खरे साहित्यिक कोण?हा प्रश्न अधिक अधोरेखित होतो.
माझ्या मते, सिद्धहस्त भाषाप्रभुंबद्ल मी काही बोलणे म्हणजे ‘ज्योतीने तेजाची आरती’असा प्रकार होईल.मात्र जे नव्या उमेदीने सहित्यक्षेत्रात काही तरी करण्यासाठी धडपडताहेत त्यांची प्रस्थापित, जनाधार लाभलेल्या साहित्यिकांशी तुलना करणे अन्यायकारक ठरेल.त्यांचे लेखन वाचकाच्या ह्रदयाचा ठाव घेत असेल,अपेक्षित प्रतिसाद वाचकवर्ग देत असेल तर तो ‘साहित्यिक’या संज्ञेस पात्र आहे असे म्हणावयास प्रत्यवाय असू नये. नवनवीन प्रयोग करून मराठी भाषेला अधिकाधिक संपन्न करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या साहित्यिक मंडळीना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ चारोळी, लघुकथा, अतिलघुकथा हे आधुनिक प्रकार अगदी थोडक्यात सघन आशय मांडू शकतात. तेही नक्कीच साहित्यिक आहेत, नाही का?
— वर्षा बापट
Varsha Bapat
Leave a Reply