सरोज भट्टू

मराठी साहित्य विश्र्वातील एक श्रेष्ठ साहित्यिक विजय तेंडुलकर यांनी एके ठिकाणी,जे लिहिले जाते व जे वाचले जाते ते साहित्य अशी साहित्याची सोपी, सुटसुटीत व्याख्या केली होती.म्हणजे,जो लिहितो तो लेखक आणि जो वाचतो तो वाचक अशी व्याख्या या चालीवर करायला हरकत नसावी.अशी सहजसुलभ साहित्य निर्मिती करणारे अनेक साहित्यिक सर्वत्र आढळतील.मात्र अभिजात साहित्य तेच जे काळातल्या कसोटीवर टिकते,काळ आणि समाजप्रवाह यात पुरुन उरते.इतकेच नव्हे तर प्राप्त काळाच्या पुढचा विचार करते आणि अशा साहित्याचा निर्माता अर्थात लेखक द्रष्टा साहित्यप्रकार ठरतो आपले वैदिक साहित्य, रामायण-महाभारतासारखी महाकाव्ये,ज्ञानेश्वरमाऊली, तुकाराम महाराज अशा अनेकांच्या साहित्याचा असे चिरंतन साहित्य म्हणूनच उल्लेख केला पाहिजे.असे चिरंतन साहित्य व ते निर्माण करणारे साहित्यिक त्या-त्या समाजाचे कालजयी भूषणच ठरतात.समाजधारणेच्या दृष्टिने असे साहित्य व साहित्यिक पूर्वसुकृतच असतात.
आजचे साहित्यिक समाजाच्या विविध वर्गातून आलेले असतात.आज साहित्याचे व पर्यायाने साहित्यिक असल्याचे परिणामहीबदलले आहे.जीवनव्यवहारविषयक चित्रण,विवरण,अर्थनिर्णयन, भाष्य अशी भाषिक अभिव्यक्ती लिहिणारी व्यक्ति म्हणजे साहित्यिक असे म्हटले जाऊ लागले.
लेखन करतांना लेखकाची होणारी मानसिक प्रक्रिया अर्थातच त्याच्या साहित्य कृतित प्रतिबिंबित होते.या साहित्य निर्मिती प्रक्रियेत प्रतिभा,स्फूर्ति, कल्पनाशक्ति,असल्यास,व्युत्पन्नता इ. अनेक घटक समाविष्ट असतात.
साहित्यिकांचे स्वानुभव,शब्दसंपदा इ.त्याच्या लिखाणातून प्रकट होतात.
साहित्यिकांचे सर्वच विचार सर्वांना पटतील असे नाही परंतु ज्या लेखकाच्या लिखाणातून आपल्या जीवनातील घटनांचे साधर्म्य बहुसंख्य वाचकांना आढळते असे लेखक लोकप्रिय होतात.
विविध प्रांतातील लेखकांचे अनुभव, भाषाशैली वेगवेगळी असते अशा वेळी वाचकही त्याच भागातून आला असेल तर त्याला तो साहित्यिक आपला वाटतो,हे अनुभवास येते.
थोडक्यात,आपले विचार,भावना, अनुभव कथा,कविता, कादंबरी इ. मार्गाने वाचकांसमोर मांडतो तो लेखक.
अभिजात साहित्य प्रसविणारे श्रेष्ठ काळावर ठसा उमटविणारे अभिजात साहित्यिक ही साहित्य शारदेच्या दरबारात शोभणारी उत्तुंग व्यक्तित्वे युगायुगात दुर्मिळच असतात.
अर्थात आजच्या युगातही असे अजय साहित्य निर्माण होतेच.गेल्या शंभरेक वर्षांत असे साहित्य, साहित्याच्या विविध विभागत लिहिले गेले आहे,हे आपण जाणतोच अन्यथा, आधुनिक मराठी साहित्य हे आपण नावाजलेच नसते.
ललित साहित्य असं ज्याला म्हटलं जातं त्यात विविधांगी साहित्य प्रकार समाविष्ट असतात,जसे की कादंबरी,कथा,काव्य,
नाटक इत्यादि.
मग साहित्यिक कोणाला समजावे असा प्रश्र्न सहजच येतो.आपण साहित्यिक आहोत का,या प्रदर्शनाला होकारार्थी उत्तर द्यायला फारसा प्रत्यवाय नसावा.मात्र आपण जे लिहितो त्याच्याशी आपण प्रामाणिकच असले पाहिजे,दुसऱ्या कुणाचे लेखन आपल्या नावे कळविणे हा नीचपणाच आहे,याला दुसरा शब्द नाही.आपले अनुभव,भावना,कल्पना आपण जरुर शब्दांकित कराव्यात,पण प्रामाणिकपणे,हे महत्त्वाचेच.
आपल्या समूहावर अत्यंत उत्तम लेखन करणारे आहेतच,प्रकाश पिटकर, माधवी सटवे, सुभाष जोशी,अशी किति नावे घ्यावी,कवि-कवयित्री तर जवळपास सगळेच आहेत मात्र या सर्व साहित्यिक सृजनकारांनी वाचकांना उत्तम तेच देण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण उत्तम वाचकही तुम्हीच घडवायचे आहेत,ही सांस्कृतिक जबाबदारी आहे ज्यायोगे उच्च अभिरुची असणारा, जीवनावर प्रेम करणारा,स्वागतशील वाचक घडेल.
— सरोज भट्टू
Saroj Bhattu

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*