सुजाता पाटील

महाचर्चा#साहित्यिक कोण?
साध्या सरळ शब्दात मांडणी केली तर जो साहित्य लिहतो तो साहित्यिक असतो पण,साहित्यिकाची व्याख्या करणे खरचं सहज सोपे नाही. मनाच्या भाव गर्भातून जन्मास येणार्या भावना, विचार,कित्येक वर्षाच्या सखोल अभ्यासातून लेखणी वाचकांशी संवाद साधते. या संवादाचा सृजनकार असतो साहित्यिक….
मग ती आत्मकथा, काव्य, प्रवासवर्णने असोत किंवा कथा.
अलंकारीक भाषाशैली, उदाहरण, रसांनी निश्चितच साहित्य समृध्द होते परंतू, साध्या सरळ भाषा, वाचकांना सहज अवगत होणारी कित्येक साहित्य संपदा सुध्दा लोकप्रिय ठरतात.बहिणाबाईं च्या कविता आहेतच की .. … सहज सरल भाषेत. अशी भावनिक गुंफण घालून मनाचा ठाव घेतो तो असतो साहित्यिक…….
काही साहित्य जन जागृती च्या उद्देशाने लिहले जाते. मान्य आहे व्याकरणाचे सखोल ज्ञान असेल तर उत्कृष्ट साहित्य निर्मीत केले जावू शकते परंतू वाचकवर्गाची आकलन क्षमता, रूची देखील भिन्नता असते.अश्यावेळी सोपी सरळ भाषाशैली प्रभावी ठरते . अश्यावेळी जनमाणसात आपली तळमळ पोहचवीणारा असतो साहित्यिक…..
मग भारूड असो की फंदीचा फटका किंवा दलित साहित्य .
कुणी उत्तम साहित्यकार त्याच्या ज्ञान, वैशिष्ट्यपूर्ण शैलीने, अनुभव यातुन एक उत्तम साहित्य निर्मीती करू शकतो, परंतू त्याच वेळी जर काहींची लिखाणाला सुरूवात झाली असेल तर त्यावेळी अश्या महारथींशी या नवख्या व्यक्तिची तुलना योग्य नसेल, कारण प्रत्येकाने यश प्राप्त करतांना प्रथम पायरी गाठली होतीचं,जे आज वाचकांच्या मनावर राज्य करीत आहेत.साहित्य नवजात बालका सारखे निरागस असते, आणि जन्मदात्याला प्रिय असते, मग ते नवोदित लेखक असले तरी. वटवृक्षाप्रमाणे आधार देवून या नवोदित वेलींना उर्ध्व दिशेने नेणारा असतो साहित्यिक…….
निसर्गाचे अचुक रंग टिपणारा, दुबळ्या जिवांची जाणिव करून देणारा, निर्जीव वस्तूतही प्राण भरणारा, अन्यायाला वाचा फोडणारा, विवशतचीे घुसमट दाखविणारा, विठुनामी तल्लीन होणारा, काळ्याआईचे गुण गाणारा, जन्मभूमी साठी तळमळणारा, विनोदी शैली हसविणारा, शौर्याचे गाथा सांगणारा किती तरी गुणांनी संपन्न असतो साहित्यिक. …

— सुजाता पाटील
Sujata Patil

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*