नंदिनी म. देशपांडे

आम्ही साहित्यिक समूहावर साहित्यिक कोण? या विषयावर महाचर्चा आयोजित होणं,म्हणजे खरंतर आयोजकांनाच खूप मोठं आव्हान आहे. कारण या समूहाचे सर्व सभासद स्वतःकडे आपण ‘एक साहित्यिक’या नजरेतून बघतात.पण यात किती तथ्य आहे?आपण खरंच या चौकटीत बसतो का? किंवा त्यात योग्य स्थान निर्माण करण्यासाठी आपण त्या दिशेने काही प्रयत्न करतो आहोत का?आपले वर्तन, विचार आणि लेखन यांमध्ये समन्वय आहे का? वगैरे अनेक गोष्टींचे निकष डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकानेच आत्मपरीक्षण करण्याची संधी, या महा चर्चेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मिळाली आहे.असं मला वाटते.उगाचच र ला ट आणि ट ला र लावलं म्हणजे, किंवा शब्दांची गर्दी जमा केली म्हणजे कोणी साहित्यिक होत नाही.
मान्य आहे लिहावयास सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला चुका या होणारच पण त्या कमी कराव्यात, त्यासाठी साहित्याचा व्यासंग आणि प्रयत्न आपण सातत्याने करत आहोत का? हे सुद्धा तपासून बघणे खूप गरजेचे आहे.
साहित्यिक मग तो कोणत्याही वाङमय प्रकारचे लेखन करणारा असो, त्याला त्याची स्वतंत्र,अशी एक विचारधारा असते. प्रत्येक गोष्टीला तर्काच्या अधिष्ठानावर घासत मगच तो आपले मत मांडतो.तसेचं करावं त्यानं हेच अपेक्षित आहे.
जो स्वतंत्रपणे आपले विचार मांडू शकतो, आपल्या अनुभवांना शब्द लालित्याचे कोंदण बसवू शकतो, आणि आपल्यातील प्रतिभाशक्ती ला कल्पनाविश्वात सोडून त्याला रंगीबेरंगी पंख लावू शकतो, तोच खरा साहित्यिक.किंबहुणा हीच तर त्यांची प्रतिभाशक्ती.
आपल्या विचारातून, लेखणीतून उतरलेली प्रत्येक ओळ हे त्या साहित्यिकाचे अपत्य असते.आपल्याच सृजनशीलतेच्या या पालवी कडे कौतुकाने बघत,पुन्हा पुन्हा वाचनाचा आनंद घेत, त्याचा बहरणारा वृक्ष तयार करणारा,तो खरा साहित्यिक. म्हणूनच, आपले साहित्य कोणीतरी चोरले हे समजताच त्याला मनस्वी क्लेश होतात.
खरा साहित्यिक हा छोटा मोठा किंवा मध्यम अशा कोणत्याही वर्गाचा मानकरी नसतो. प्रत्येक साहित्यिक एक परिपूर्ण विचारांचा स्वतंत्र व्यक्ती असतो. तो जास्तीत जास्त लाईक्स वगैरे फालतू गोष्टींकडे लक्ष न देता सातत्याने लिहीत राहतो. त्याचे हेच सातत्य, व्यासंग, वाचन त्याला मोठे बनवत जाते.
उगाच एखाद्या विषयावरचं हे अमुक पुस्तक तुम्ही वाचलंयं का?किंवा या विषयावर कोणती पुस्तक आहेत? किंवा तमुक विषयावर तुमचे मत काय? असे प्रश्न विचारण्यात त्याला रस नसतो.
साहित्यिकाला जाती धर्माचं किंवा विशिष्ट अशा एखाद्या समूहाचं बंधन नसतं. सर्वसमावेशक, समाजमन जाणणारं, सकारात्मक भाव ठेवणारं लिखाण करणं हा खऱ्या साहित्यिकाचा धर्म असतो. म्हणूनच, साहित्यिक समूह हा समाजातील एक महत्त्वाची विचारधारा असते.ती मनानं, विचारानं,वृत्तीनं सकारात्मक दृष्टीची,आशावादी असावी. आपली मतं ठामपणे मांडत आग्रही भूमिका घेणारा साहित्यिक हा, परिवर्तनाच्या प्रक्रियेचा केंद्रबिंदू बनू शकतो.आपल्या लिखाणातून तो आपल्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब उमटवत असतो. म्हणूनच त्याने कायम सजग राहून अभ्यासू वृत्ती जोपासावयास हवी. सभोवतालचे निरीक्षण करावयास हवं. आणि ते समाजा समोर आपल्या लिखाणातून व्यक्त करावयास हवं असं मला वाटते.

— नंदिनी म.देशपांडे
Nandini M. Deshpande

1 Comment on नंदिनी म. देशपांडे

Leave a Reply

Your email address will not be published.


*