सर्जेराव कुइगडे

जो कसदार साहित्य प्रसवितो तो साहित्यिक, हे साहित्यिक कोण? या प्रश्नाला माझे साधे, सरळ उत्तर. आमच्या लहानपणी आमच्या शेजारच्या दुरपा मावशी आम्हाला गोष्टी सांगत. कधी न ऐकलेल्या नव्या नव्या गोष्टीही त्या अशा रंगवून सांगत की, ऐकणारा हरखून जाई. आता लक्षात येतंय, त्या गोष्टी म्हणजे त्यांच्या मनघडण कथा असत. एका अशिक्षित बाईने स्वतः रचलेल्या कथा त्यावेळी कुणी लिहून काढून प्रसिद्ध केल्या असत्या तर दुरपा मावशीचा साहित्यिक म्हणून निश्चितच गौरव झाला असता. बहिणाबाईंचेच उदाहरण लक्षात घ्या. सोपानदेव चौधरींनी आपल्या मातोश्रींच्या कविता प्रकाशित केल्या नसत्या तर बहिणाबाई ही हिरकणी आपणाला लाभली असती काय?
भाराभर लिहलं म्हणजे तो मोठा साहित्यिक, असंही काही नसतं. घडाभर न लिहता पसाभर लिहलं, जे लिहिलं ते कसदार असेल तर ते अल्प स्वल्प लिहिणारा लेखकदेखील मोठा साहित्यिक मानला जाऊ शकतो. ‘ रणांगण ‘ ही कादंबरी आणि ‘ एक झाड दोन पक्षी ‘ हे आत्मथौनकथन इतकेच अल्प लेखन केलेले विश्राम बेडेकर मराठीतले महान साहित्यिक म्हणून गौरवले गेले. एक मात्र खरे की, तुमचे लेखन दर्जेदार असले तरी साहित्यिक म्हणून तुमची ओळख निर्माण झाली नसेल तर तुम्हाला साहित्यिक म्हणून कोणी विचारत नाही. माझे स्वतःचेच उदाहरण सांगतो,
मी महाविद्यालयात असताना तिथल्या पत्रिकेत मी लिहिलेल्या लेखनावर संतोष व्यक्त करताना आमचे उपप्राचार्य, ज्येष्ठ समीक्षक कै.प्रा. अ.के. भागवत मला म्हणाले, ” तुझी लेखणी चांगली आहे, लिहित रहा. ” पण नोकरीच्या धबडग्यात ते जमले नाही.
निवृत्तीनंतर मात्र पुनः लिहिता झालो. २६/११ च्या मुंबईवरील आतंकी हल्ल्यावर मी लिहिलेले ‘ मुंबई
२६/११ एक हादसा ‘ हे पुस्तक माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांची प्रस्तावना असूनही लेखक म्हणून माझे नाव झालेले नसल्यामुळे कोणी प्रकाशित करू धजत नव्हते. शेवटी मीच त्याचे प्रकाशन केले. या पुस्तकाच्या दोन आवृत्त्या हातोहात संपल्या. यानंतरचे माझे ‘असा आहे हिंदू धर्म ‘ हे दुसरे पुस्तक कोल्हापूरच्या अक्षर दीप प्रकाशनाने प्रसिद्ध केले. त्याचीही पहिली आवृत्ती हातोहात संपली. प्रसिद्धीचे तंत्र व गणित न जमल्याने तसेच माझी पुस्तके सर्वदूर पोचली नाहीत त्यामुळे लेखक म्हणून मी जरी यशस्वी ठरलो तरी लौकिकदृष्ट्या साहित्यिक म्हणून माझे नाव नाव नाही झाले. साहित्यिक असणे नि साहित्यिक म्हणून नाव होणे या सापेक्ष बाबी आहेत. तुमचे लिखाण कसदार असले तरी ते वाचकापर्यंत पोहचणेदेखील तितकेच महत्त्वाचे असते. चांगले लिहिले पण ते वाचकापर्यंत पोहचलेच नाही तर लिहिण्याचा उद्देशच सफल होणार नाही. म्हणून जो चांगले लिहितो आणि लिहिलेले वाचकापर्यंत पोहचविण्यात यशस्वी होतो तो साहित्यिक अशी साहित्यिक या शब्दाची व्याख्या करून थांबतो.

— सर्जेराव कुइगडे
Sarjerao Kuigade

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*