सत्याची अनुभूती

आनंदनगर गावातील एक आंधळा स्वतःच्या अंधपणाला अतिशय कटाळला होता. कोणीही भेटल्यावर तो प्रत्येकाला म्हणायचा, ‘मला प्रकाश दाखवा. मला त्याची चव घ्यायची आहे.  मला त्याचा स्पर्श हवाहवासा वाटतो आणि मला प्रकाशाचा आवाजही ऐकवा.

त्यावर लोक त्याला सांगायचे की ‘प्रकाशाची चव घेता येत नाही, त्याचा आवाज ऐकू येत नाही आणि त्याला स्पर्शही करता येत नाही. पण त्याला ते पटत नव्हते त्याचा हट्ट चालूच असे. त्याच्या या मागणीला गावातील लोकं कंटाळली होती. कोणालाही त्याचे समाधान करता येईना. एकदा त्या गावात गौतम बुद्ध आले. त्याच्या कानावर या आंधळ्याची हकीगत गेली. ते ऐकून बुद्ध म्हणाले, `त्याला कोणीही उपेदश करू नका. त्याला आता खरी गरज एखाद्या वैद्याची आहे.’

त्याच्या बोलण्याप्रमाणे त्या आंधळ्याला वैद्याकडे नेण्यात आले. त्याच्या डोळ्यातील मोती बिंदू काढला, त्याला दृष्टी मिळाली, त्याला सर्व दिसू लागले. आनंदाने तो बुद्धांकडे गेला बुद्धांनी त्याला पाहिले आणि विचारले, ‘भल्या माणसा आता मला प्रकाशाचा स्पर्श, ध्वनी आणि चव हे सर्व दाखव आणि ऐकवं.`

त्यावर विचार करून तो माणूस म्हणाला, ‘हे अशक्य आहे. हे मी ऐकवू आणि दाखवू शकत नाही. ‘

त्यावर बुद्ध म्हणाले, अरे सद्‌गृहस्था, आजपर्यंत सर्व लोक तुला हेच सांगत होते. पण तू ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतास. पण तरीही तू हट्ट धरलास म्हणून तुझ्या डोळ्यांवर उपचार झाले आणि तुला सत्य समजले. लोकांचे ऐकून जर गप्प राहिला असतास तर अजूनही तू प्रकाशाला मुकला असतास.

तात्यर्य – सत्य हे अनुभवावेच लागते.