श्रीराम लागू (लमाण)

विजयाबाईंची ती अवस्था पाहून माझे पाणीपाणी झाले. वाटले, त्यांना जवळ घेऊन थोपटून धीर द्यायला पाहिजे. नाही तर त्या इथेच उभ्या कोसळतील. पण मी, ‘मी जिकलो मी हरलो’ या नाटकातला ‘माधव’ होतो. श्रीराम लागू नव्हतो ! हे असे हळवे होण्याची माझी चैन नाटकाला अजिबात परवडण्यासारखी नव्हती. नाटकाचा विचका झाला असता. मी तसाच निर्दयपणे विजयाबाईंकडे बघत बसून राहिलो. त्या निःशद्बतेत किती वेळ गेला ठाऊक नाही, पण एवढा विराम (पॉज) मी नाटकात कधीच अनुभवला नाही ! त्याआधी नाही किवा नंतरही. थोड्याच क्षणांत विजयाबाई सावरल्या. पुन्हा ‘अनू’ झाल्या. आणि नाटक पुढे व्यवस्थित गेले. पण त्या काही क्षणांनी मात्र चांगलेच हादरवले. त्यांना आणि मलाही. आम्ही निर्ढावलेले, पक्के ‘नाटकवाले’ असल्याचा निर्वाळाही त्या क्षणांनी दिला !


– श्रीराम लागू (लमाण)