सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे

मुंबईचा एक फार मोठा व्यापारी होता. ऐश्वर्यसंपन्न असाच होता. जवळ सगळी सुखं होती परंतु त्याच्या मनाला शांतता नव्हती. त्यावर उपाय म्हणून पहाटे उठून खोलीत बसून तो तासन्तास ध्यानधारणा करू लागला. परंतु त्याचा अस्वस्थपणा कणभरही कमी होईना. राजाराम स्वामी एक सत्पुरुष होते. त्यांच्याबद्दल व्यापारी बरंच ऐकून होता. त्यामुळे त्यांची भेट घेण्याचे त्यांनी मनाशी ठरवले आणि एक दिवस तो राजाराम स्वामींना भेटायला गेला. आपली सगळी अस्वस्थता त्याने स्वामींना सांगितली, ”शांतता लाभण्यासाठी मी स्वत: ध्यानधारणासुद्धा करून पाहिली पण त्याचाही उपयोग झाला नाही.” स्वामींनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि त्याला विचारलं, ”तुम्ही आत्तापर्यंत दुसर्‍यासाठी काय केलं. ध्यानधारणासुद्धा स्वत:साठीच केली ना ?” त्यावर व्यापार्‍याने होकारार्थी उत्तर दिले. मग स्वामी म्हणाले, ”उघड्या डोळ्यांनी जरा समाजाकडे बघा ! तुमच्याच जवळपास असणार्‍या दु:खी किवा भुकेलेल्या माणसांचा शोध घ्या, त्यांना यथाशक्ती मदत करा. एखाद्या रोग्याची सेवाशुश्रृषा करा.” त्यांच्या या वाक्यावर व्यापार्‍याने त्यांना विचारले, ”समजा रोग्याची सेवा करता करता मीच आजारी पडलो तर ?” त्यावर राजाराम स्वामी म्हणाले, ”एक तर तुमच्या मनात शंकेचं जाळं दिसतं आहे आणि प्रत्येक चांगल्या कामामध्ये तुम्हाला काहीतरी वाईट दिसतं त्यामुळेच तुमच्या मनाला शांती मिळत नाही. एखादं चांगलं काम करत असताना त्यात त्रुटी शोधू नये आणि ते काम वेळेवारी केल्यास तुम्हाला मन:शांती मिळेल!”
तात्पर्य – सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.