हेच तत्त्व प्रत्येकानं आचरणात आणले तर देशाची प्रगती होईल

ऐन थंडीचे दिवस होते. थंडी कडाडून पडली होती. अशा ऐन थंडीच्या दिवसात चंद्रगुप्ताच्या राज्यात घराघरातून चोर्‍या होऊ लागल्या. चोर फक्त घोंगड्यांची चोरी करीत असे. त्यामुळे गरम कपड्याशिवाय प्रजा आजारी पडू लागली. यावर उपाय म्हणून सरकारकडून लोकांना घोंगड्या पुरवाव्यात असे चाणक्याने चंद्रगुप्ताला सुचविले. चंद्रगुप्ताने ते तात्काळ मान्य केले. हजारो घोंगड्या आणल्या गेल्या. घोंगड्याच्या वितरणाचे कामही चंद्रगुप्ताने चाणक्यावर सोपविले. या घोंगड्यांबद्दलची बातमी चोरांना समजली. एकदा रात्री त्यांनी चाणक्याच्या वाड्यात प्रवेश केला. घोंगड्या ठेवलेल्या होत्या त्या चाणक्याच्या खोलीत ते चोर शिरले. त्यांचे लक्ष समोरच्या दृश्याकडे गेले आणि त्यांना धक्काच बसला. चाणक्य आणि त्याचे चार शिष्य भूमीवर झोपलेले होते. त्यांच्या अंगावर पांघरूणही नव्हते. आश्चर्य वाटून चोराने चाणक्याला उठविले आणि विचारले, ”महाराज, तुमच्या वाड्यात घोंगड्यांचा ढीग पडलेला असताना तुम्ही त्यातली एकसुद्धा पांघरायला का घेतली नाही ?” त्यावर चाणक्याने उत्तर दिले, ”अहो, माझ्या घरच्या सगळ्या घोंगड्या चोरीला गेल्या. माझ्याजवळ एकही घोंगडी शिल्लक नाही. या समोर पडलेल्या घोंगड्या माझ्या नाहीत. त्या प्रजेला वाटण्यासाठी माझ्याजवळ दिल्या आहेत. तेव्हा माझ्या नसलेल्या वस्तूचा मी कसा काय वापर करू ? यावर माझा काहीच हक्क नाही.” हे ऐकून त्या चोरांनी शरमेने मान खाली घालून चाणक्याची माफी मागितली.
तात्पर्य – हेच तत्त्व प्रत्येकानं आचरणात आणले तर देशाची प्रगती होईल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.