वय आणि अधिकार आहे म्हणून पात्रता असेलच असे नाही

मोठी माणसं त्यांच्या गोष्टीही मोठ्याच. ही गोष्ट तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची. सावरकर शाळेत विद्यार्थी असताना एका वक्तृत्व स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी उत्कृष्ट भाषण केले. अनेक गोष्टींचे संदर्भ त्यांनी भराभर आपल्या भाषणातून मांडले आणि भाषण चांगलेच रंगले. त्यावेळी इतरही स्पर्धकांची भाषणे झाली. त्यानंतर स्पर्धेचं परिक्षण करणार्‍या परिक्षकांनी निकाल जाहीर केला. त्यात सावरकरांचे भाषण सगळ्यात चांगले होऊन सुद्धा सावरकरांना तिसरा क्रमांक मिळाला. त्यावर परिक्षकांनी सांगितले, ”सावरकर याचे भाषण चांगले झाले पण हे विचार आणि ही मांडणी एका मुलाची असणं शक्य नाही. त्याला हे भाषण कुणीतरी लिहून दिलेलं असणार ! पण भाषण उत्तम झालं म्हणून आम्ही त्याला तिसरा क्रमांक दिला आहे.” हे शब्द कानावर येताच सावरकर ताडकन व्यासपीठावर आले आणि आपल्या खिशातील भाषणातील संदर्भाची टिपणे काढली. ती श्रोत्यांना दाखवून म्हणाले, ”ग्रंथ स्वत: वाचून मी ही टिपणं काढली आहेत. त्यावरील माझे स्वत:चे विचार मी मांडले आहेत. माझी टिपणं आणि बोलण्यातील सत्यता पाहून कदाचित परिक्षक मला आता प्रथम क्रमांक देतील सुद्धा. पण ते पारितोषिक मी स्वीकारणार नाही. कारण जो परिक्षण करतो तो भाषण देणार्‍याच्यापेक्षा श्रेष्ठ योग्यतेचा असावा. म्हणून मी आता पहिलं बक्षीस स्वीकारणार नाही.”
तात्पर्य – वय आणि अधिकार आहे म्हणून पात्रता असेलच असे नाही.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.