आपल्याजवळ असलेल्याचा शोध आपण बाहेर घेत असतो

रस्त्याच्या कडेला एका झोपडीबाहेर बसून एक भिकारी अनेक वर्ष भीक मागत असे. पैसे गोळा करून खूप श्रीमंत व्हायचं ही त्याची मनोमनी इच्छा होती. तो आज अनेक वर्ष भीक मागत होता पण नशिबापुढे कोणाचे काय चालणार ? तो काही आयुष्यभरात श्रीमंत झाला नाही. आयुष्यभर त्याने भीकच मागितली तरी मरताना त्याच्याजवळ काहीही नव्हते. त्यामुळे मरतानाही तो भिकारी म्हणूनच मेला कारण शेवटी अंत्यविधीसाठी लागतील एवढे पैसे सुद्धा त्याच्या सामानात नव्हते. शेवटी आसपासच्या लोकांनी पैसे गोळा करून विधी केले. काही दिवसांनी त्या भिकार्‍याची झोपडी होती तिथे रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. त्यात त्या भिकार्‍याची झोपडी पाडली गेली. जागा साफ करून रस्त्याच्या नूतनीकरणासाठी त्या जागेवर खणत असताना तेथे एक पेटी सापडली. पेटीत पूर्वापार गाडून ठेवलेले सोन्यानाण्याचे गुप्तधन सापडले. सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. ज्या जागेवर गुप्तधन सापडले त्याच जागेवर बसून भीक मागत तो भिकारी वर्षान्वर्षे श्रीमंत होण्याची स्वप्न पहात होता. धन त्याच्या खालीच होतं पण त्याला ते कधीच समजले नाही.
तात्पर्य – आपल्याजवळ असलेल्याचा शोध आपण बाहेर घेत असतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.