मोह, लोभ यांचा त्याग केल्यावरच मन:शांती लाभते

देविदास एक अतिशय श्रीमंत व्यापारी होता. गडगंज संपत्तीच्या रूपाने त्याच्या घरी लक्ष्मीच पाणी भरत होती; पण तरीही देविदास सदैव अस्वस्थ, अशांत असायचा. इतका पैसा असूनही त्याला मन:शांती मिळत नव्हती. तो नेहमी गावातल्या एका साधूच्या दर्शनाला जात असे. एक दिवस त्याने साधू महाराजांना विचारले, ”महाराज, मला मन:शांती हवी आहे त्यासाठी काहीही जप-तप करायला सांगा. मी ते अवश्य करीन.” त्यावर साधू महाराज म्हणाले, ”तू नेहमी जगाकडे पैशाच्या दृष्टिकोनातून बघतो. तुझे सर्व लक्ष सदैव तुझ्या व्यवसायावर केंद्रित झालेले असते. त्या ऐवजी थोडं स्वत:कडे पहायला शिक.” त्यावर देविदास म्हणाला, ”पैसा हे तर माझं सर्वस्व आहे. त्याला सोडून कसं चालेल. त्याचं हे वाक्य ऐकल्यावर साधू महाराजांनी त्याच्यासमोर एक स्वच्छ काचेचा तुकडा धरला आणि त्यातून पहायला सांगितले. देविदासाने काचेतून पाहिले आणि म्हणाला, ”यातून तर पलीकडचे सर्व जग दिसते आहे.” नंतर महाराजांनी त्याच्यासमोर एक आरसा धरला त्यात पाहून देविदास म्हणाला, ”यात तर मीच दिसतो आहे.” त्यावर महाराज म्हणाले, ”साध्या काचेतून सर्व जग दिसते पण त्याच काचेला पारा लावला की आपण स्वत: त्यात दिसतो. त्याचप्रमाणे संपत्तीच्या काचेतून पाहिले तर जग दिसते पण नि:स्वार्थी भावनेचा पारा लागला तर त्यातून आत्मज्ञान होते आणि शांती लाभते.
तात्पर्य – मोह, लोभ यांचा त्याग केल्यावरच मन:शांती लाभते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.