‘मी’पणा संपल्यावरच तुम्ही परमेश्वराशी एकरूप होता. स्वतःला ‘मी’ म्हणवून परमेश्वरापासून आपण आपल्याला विभक्त करून घेतो

एक साधू एकदा आपल्या गुरुच्या दर्शनाला जायचं म्हणून गुरुच्या झोपडीसमोर येऊन उभा राहिला. पण त्यांच्या झोपडीचे दार बंद होते. एकदम दार उघडून झोपडीत कसे शिरायचे म्हणून गुरुंची परवानगी घेण्याकरिता त्याने दार वाजवले. थोडावेळाने आतून विचारणा झाली, ‘‘कोण आहे ?’’ तो प्रश्न ऐकून ह्याला वाटले की गुरु आपल्या नेहमीच्या शिष्याचा आवाज ओळखतील म्हणून त्याने उत्तर दिले ‘‘मी आहे.’’ त्यानंतर आतून काहीच प्रतिसाद आला नाही. बराच वेळ थांबून त्या शिष्याने पुन्हा दार वाजवले. पण तरीही आतून उत्तर मिळेना. शेवटी न राहून पुन्हा दरवाजा वाजवला. शिष्य म्हणाला, ‘‘महाराज, आपण दरवाजा का उघडत नाहीत ? मी आपल्या दर्शनासाठी आतुर झालो आहे.’’ त्यावेळेस झोपडीतून प्रतिप्रश्न विचारला गेला की, ‘‘बाहेर इतका अहंकारी कोण उभं आहे जो स्वतःला ‘मी’ म्हणतो ? कारण ‘मी’ हे संबोधन वापरण्याचा अधिकार फक्त एकट्या परमेश्वराला आहे. तुम्ही त्याचे अंश असल्यामुळे ‘मी’ म्हणण्यासाठी तुमचं कोणाचेही स्वतंत्र अस्तित्व नाही.’’ शिष्याला त्याची चूक समजली. त्याचा ‘मी’पणा गळून पडला. बाहेरूनच गुरुंना नमस्कार करून तो तिथून निघून गेला.
तात्पर्य – ‘मी’पणा संपल्यावरच तुम्ही परमेश्वराशी एकरूप होता. स्वतःला ‘मी’ म्हणवून परमेश्वरापासून आपण आपल्याला विभक्त करून घेतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.