बुद्धिची चमक ही कुठेही लपून राहत नाही

राजा जयदेवाच्या दरबारात एक अतिशय विद्वान, बुद्धिमान मंत्री होता. राणीला मात्र त्याच्या पदावर आपल्या भावाला बसवायचे होते. एकदा किरकोळ कारणावरून तिने मंत्र्याला काढून त्या जागेवर आपल्या भावाची नेमणूक केली. राजाने त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. एक दिवस राजाला फेरफटका मारताना रस्त्यावर हत्तीच्या पायाचे ठसे दिसले. त्याने त्या मंत्र्याला सांगितले की, ‘‘या हत्तीवर लक्ष ठेवा.’’ मंत्र्याने लगेच त्या पायांच्या ठशांवर तळ ठोकून चार दिवस पहारा केला. राजा त्याच्या वेडेपणावर हसला आणि आपल्या जुन्या मंत्र्याचा शोध घेऊ लागला. त्यासाठी त्याने एक युक्ती योजली त्याने राज्यात दवंडी पिटवली की, ‘‘राज महालातील तलावाचे लग्न करायचे आहे. ज्याच्या मालकीच्या विहिरी असतील त्यांनी त्या राजमहालात घेऊन याव्यात.’’ ही विचित्र आज्ञा ऐकून विहिरी असलेले जमीनदार गोंधळात पडले. परंतु राजाचा जुना मंत्री एका शहरात अज्ञातवासात रहात होता. त्याने जमीनदारांना सल्ला दिला की, ‘‘आम्ही आमच्या विहिरी शहराच्या वेशीजवळ आणल्या आहेत. आपण आपल्या तलावाला तेथे घेऊन या म्हणजे लग्न लावणे सोपे जाईल. असा निरोप पाठवावा.’’ हा निरोप मिळताच राजाला समजले की ही बुद्धी त्याच्या मंत्र्याचीच आहे. म्हणजे मंत्री त्याच शहरात आहे. राजाने सेवकांकरवी मंत्र्याला बोलावून घेतले आणि पुन्हा त्याचे मंत्रीपद त्याला परत दिले.
तात्पर्य – बुद्धिची चमक ही कुठेही लपून राहत नाही.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.