श्रद्धेचा गैरफायदा घेणार्‍याला अद्दल घडविलीच पाहिजे

राजा प्रतापसिंगची आई अतिशय आजारी होती. त्या आजारपणामुळेच त्यांच्या आईचा मृत्यू झाला. आईचा मृत्यू झाल्यावर प्रतापसिगला एक गोष्ट मनाला सारखी टोचत होती. त्यांच्या आईने मृत्यूपूर्वी आंबे खाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी आंब्याचा हंगाम नसल्यामुळे आंबे मिळाले नाहीत आणि आईची इच्छा अपूर्ण राहिली. ही सर्व घटना ते आपल्या दरबारातील पंडिताजवळ बोलून गेले. त्यावर पंडित त्यांना म्हणाले, ‘‘महाराज, आपल्या आईच्या आत्म्याला शांती नाही आणि ती लाभावी म्हणून राज्यातल्या पंडिताना आपण सोन्याचे आंबे दान करावे.’’ राजाने त्याप्रमाणे सर्व पंडितांना सोन्याचे आंबे दान केले. राजाचा विश्वासू प्रधान या सर्व घटनांवर लक्ष ठेवून होता. त्याला या पंडितांच्या खोटेपणाचा राग आला होता. परंतु तसे न दाखवता काही दिवसांनी आपल्या आजोबांच्या श्राद्धाचे कारण सांगून प्रधानानी सर्व पंडितांना जेवायला बोलावले. दरबारातील सर्व पंडित त्याच्याकडे जेवायला गेले. प्रधानाने जेवणाऐवजी त्यांना गरम सळ्याचे चटके दिले. त्यामुळे पंडित न जेवताच पळून गेले. बातमी राजाच्या कानापर्यंत गेली. राजाने दुसर्या दिवशी प्रधानाला याबद्दल विचारले असता, ‘‘माझे आजोबा आजारी पडले त्यावेळेस त्यांनी सळ्या तापवून अंगाला डाग द्यायची इच्छा व्यक्ती केली होती; पण ती पूर्ण व्हायच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांची ती इच्छा मी काल पूर्ण केली.’’ घडलेला सगळा प्रकार राजाच्या लक्षात आला आणि आपण फसवले गेले आहोत याची त्यांना जाणीव झाली. ::
तात्पर्य – श्रद्धेचा गैरफायदा घेणार्‍याला अद्दल घडविलीच पाहिजे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.