ज्याला जी भाषा समजते त्याच भाषेत त्याच्याशी बोलायला हवे

एका कंपनीत निवृत्तीवेतन योजना लागू करावी म्हणून संप झाला. शेवटी कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यात समझौता होऊन निवृत्ती वेतन योजना अंमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेच्या लेखी करारावर व्यवस्थापकीय अधिकार्‍यांच्या आणि कर्मचार्‍यांच्या स्वाक्षर्‍या झाल्या. मात्र त्यांच्यापैकी एक कामगार त्यावर स्वाक्षरी करण्यास तयार नव्हता. अधिकार्‍यांनी आणि इतर कर्मचार्‍यांनी त्याची समजूत काढत खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण तो स्वाक्षरी करत नव्हता. सर्व कर्मचार्‍यांच्या स्वाक्षरीशिवाय योजना अंमलात येणार नव्हती. ही गोष्ट वरिष्ठ अधिकार्‍यांच्या कानावर गेली. त्यांनी अध्यक्षांशी याबाबत सविस्तर चर्चा केली. दुसर्‍या दिवशी अध्यक्षच कंपनीत आले. त्यांनी त्या कर्मचार्‍याला बोलावले. त्याच्यासमोर तो कराराचा कागद ठेवत अध्यक्ष म्हणाले, ‘‘ह्या करारावर सही कर नाही तर तुला नोकरीवरून काढून टाकू.’’ ही वाक्य ऐकून त्याने लगेच सही केली. ते पाहून अध्यक्षांनी विचारले, ‘‘इतके दिवस तू सही का करत नव्हतास ?’’ त्यावर तो कर्मचारी म्हणाला, ‘‘आजपर्यंत मला या भाषेत कोणीच समजावून सांगितले नव्हते.’’
तात्पर्य – ज्याला जी भाषा समजते त्याच भाषेत त्याच्याशी बोलायला हवे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.