विनायक नाणेकर (Vinayak Nanekar)

प्रिय चिऊताईस...

प्रिय चिऊताईस

स.न.वि.वि.

हो, तुलाच पत्र लिहितोय मी.ठाऊक आहे मला तू चिमणी आहेस ..तूझा पत्ता मला माहिती नाही तसेच तुला हे पत्र मिळेल की नाही हेही माहिती नाही तरीही माझ्या भावना पोहचवण्याचा बालीशपणा करतोय.

साधारणपणे एक महिन्यापूर्वी तुझं घरटं मला दिसलं तेव्हा केवढा आनंद झालेला म्हणून सांगू! माझ्या घराच्या समोर असलेल्या moneyplant च्या वेलावर एक सुंदरस घरटं तू तयार केलेलंस. त्यासाठी कितीतरी दिवस तू तयारी करत असणार,इकडून तिकडून चारा गोळा करून आणत असणार परंतु तुझी ही तयारी दुर्दैवाने मला कधी दिसलीच नाही गं. दिवसभराच्या कामात इतका व्यस्त होतो की माझ्या घरासमोरच कोणीतरी मोठ्या विश्वासानं आपल्या पिलांसाठी घरटं तयार करतंय हे जाणवलंच नाही.

इतकुसा तुझा जीव पण किती सुबक घरटं बनवलस! आपल्या पिलांना सुरक्षित ठिकाणी राहता यावं यासाठी किती विचारपूर्वक जागा निवडलिस ना तू! इवल्याश्या वेलीचा आधार घेऊन व एकेक जिन्नस गोळा करून टुमदार घर बवण्याची कला तू कुठून शिकलीस? बरं ,हे करताना तुला काय कमी अडचणी आल्या असतील? तुला धोका असणाऱ्या इतर पशुपक्षीपासून आपला बचाव करत हे काम करणं किती जिकीरीचं आहे! त्या घरट्याकडे पाहताना तुझे प्रयत्न, त्यातील सातत्य व चिकाटी जाणवते व लहानसहान अडचणींचा सामना करताना जेरीस येणारो आम्ही तुझ्यासमोर खुजे वाटतो.

एव्हाना तुझ्या रोज सकाळच्या चिवचिवाटाची सवय होऊन गेली होती.आपल्या पिलांसाठी चारा व दाणा आणण्यासाठी तुझी धडपड मी पाहिलीये ना रोज. सकाळी सकाळी चिवचिव करून जणू तू आम्हाला हक्काने सांगायचीस की मला भूक लागली आहे अन तेवढ्याच मायेने मम्मी सुद्धा तुला तांदूळ द्यायची.

इतकं सगळं छान सुरू असताना आज सकाळी तुझं दर्शन झालंच नाही ना तुझा आवाज आला. घरट्याकडे पाहिलं तर ते रिकामच वाटत होतं. कालपर्यंत तर तुझ्या पिलांसकट तू तिथे राहत होतीस ना..मग अचानक कुठे निघुन गेलीस? तुला व तुझ्या पिलांना काही झालं तर नसेल ना?कावळ्यासारख्या पक्षाकडून पिलांना धोका असतो हे मला माहितीये कारण मागे एकदा तिथेच एका चिऊताईच घरटं कावळ्याने उध्वस्त केल्याचं मी पाहिलं होतं.तसं तर नाही झालं ना गं काही?की एका विशिष्ठ काळानंतर स्थलांतर करणं तुझ्यासाठी नैसर्गिक आहे? काहींच समजत नाहीये. जाताना मला काही सांगितलं पण नाहीस किंवा कदाचीत तुझ्या चिवचिवाटातील निरोपाचा संदेश मलाच ओळखता आला नसावा.

रिकाम्या घरट्याकडे पाहून उदास वाटतंय.तसा आपला सहवास काही काळावधीचाच पण खरोखर लळा लावला होतास तू.म्हणतात ना अशी पाखरे येती आणीक स्मृती ठेवुनी जाती.असो. तुझी काळजी वाटली म्हणून हे पत्र लिहितोय.तू जिथे असशील तिथे सुरक्षितच असावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.तुझ्यासाठी माझ्या घराची दारं सदैव खुली असतील ही खात्री बाळग.

कळावे.

तुझाच मित्र

डॉ विनायक

— विनायक नाणेकर

लेखाची लिंक : https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/4113930018623382/

प्रोफाईल लिंक : https://www.facebook.com/vnanekar2005?

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*