वेदवती कोगेकर – 02 (Vedavti Kogekar)

प्रिय दीपक,
सप्रेम आशिर्वाद.

कर्तृत्वाने तू खूप मोठा होतास पण वयाने दोन वर्षाने का होईना मी मोठी असल्याने तुला आशिर्वाद देण्या इतके मोठेपण माझ्या कडे आले आहे.
स्वर्गाच्या दारात तुझ्या नावाचा पुकारा झाल्यावर तुला धक्काच बसला असेल ना? इथे कोण पुकारते मला? पोस्टमन? मला कुणाचे पत्र आले इथे? थांब, थांब, असा कोड्यात पडू नकोस! पत्र लिहायचे कारणही तसेच आहे. एक तर नऊ तारखेला जागतिक टपालदिन होता आणि दहा तारखेला आपल्या जन्मदात्र्यांचा, स्व. ताई काकांच्या लग्नाचा वाढदिवस! आजच्या दिवशी त्यांनी “कल्पवृक्षा” चे रोपटे लावले पुढे ते बहरले, फुलले, फळले त्याला छान शाखा फुटल्या. ती आठवण मला गप्प बसू देईना तुझ्याशी संवाद साधावा असे वाटले म्हणून हा पत्र प्रपंच! परंतु कल्पवृक्षाचे एक फळ पूर्ण परिपक्व होण्या पूर्वीच गळाले. ते फळ म्हणजे तू हे सांगायलाच नको. फार फार त्रास झाला रे सर्वांना! आठ महिन्यापूर्वीच कायमचा दूरावलास तू आम्हाला!

जवळपास ऐंशी वर्षापूर्वी कै. ताई काकांच्या जीवनगीताची मैफल सुरू झाली. त्यांच्या पोटी सात स्वरांनी जन्म घेतला. सहा मुली एक मुलगा! सगळ्यांना उच्च विद्याविभूषित करून त्यांचे जीवन मार्गी लावले. सद्गुरू कृपेने सर्व कसे छान चालले होते परंतु सात स्वरातील “सा” ला, म्हणजे तुला जडलेल्या असाध्य व्याधीला मात्र गुरू ही थोपवू शकले नाहीत. होता होईल तो ती व्याधी, सुसह्य करण्याचा प्रयत्न मात्र निश्चितच केला. त्यातही आपल्या परम भक्ताचे चांगले करण्याची योजना त्यांनी आखली. “महाशिवरात्री” सारख्या शुभ दिवशी
#आज्ञेविणा_काळ_ना_नेई_त्याला या उक्ती नुसार तुला सहज, शांत, वेदनामुक्त अवस्थेत, असताना च्या क्षणी या भौतिक जगातून मुक्त केले.

आज विचार करता, असं वाटते की, या कोरोना च्या लाँकडाऊनच्या काळात ही गोष्ट घडली असती तर? काय झालं असतं? आपल्या प्रिय व्यक्तीचे अंतिम दर्शन ही न घेऊ शकलेले लोक आम्ही पहात आहोत. तुझे दूरावणे वेदनादायक आहेच. परंतु तुझ्या सकट तुझ्या वर प्रेम करणाऱ्या नातेवाईकांना या महामारीच्या कचाट्यात सापडू दिले नाही स्वामींनी! तुझ्या बाबतीतील सर्व सोपस्कार, संस्कार निर्विघ्नपणे पार पडल्यावर संबंधीत आप्तेष्ट आप आपल्या ठिकाणी रवाना झाल्यावर लाँक डाऊन सुरू झाले ही सुद्धा स्वामींची कृपाच नाही का म्हणायची? कशाचे दुःख, कशाचे सुख मानायचे हेच कळेनासे झालंय बघ! असो.

पण बंधूराया, काळजी करू नको. घडणार होते ते घडून गेले. तुझ्या कुटुंबा वर स्वामींची छत्रछाया पूर्वी इतकीच प्रखर आहे कर्तृत्ववान मुलगा आणि मुलगी आपल्या ठिकाणी सुखरूप आहेत. तुझी सहचारिणी म्हणजे आपल्या कुटुंबाचा अविभाज्य घटक असल्याने तिला अन्य कोणतीही उपाधी न देणेच योग्य ठरेल. ती कधीच एकटी, एकाकी पडणार नाही याची खात्री बाळग! तुझ्या आठवणी शिवाय एकही दिवस जात नाही खूप काही करायचे, बोलायचे राहून गेले रे!

बघू नियतीच्या मनात, पुन्हा आपल्या भेटीचा कधी योग आहे ते! तो पर्यंत तरी वाट बघणेच आपल्या हातात आहे.

कळावे,
तुझी लाडकी बहिण
सौ. सरोज ताई

© वेदवती कोगेकर

Vedvati Kogekar

लेखाची लिंक : https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/4120497857966598/

प्रोफाईल लिंक : https://www.facebook.com/vedavti.kogekar?

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*