प्रा.अरुण खांडेकर

मानवी व्यवहारांचे भावनिक,बौद्धिक अशा वेगळ्या अंगाने घडविलेले सर्जनशील,वैचारिक,काल्पनिक,वास्तविक अशा वेगवेगळ्या पातळीवरचे सम्यक दर्शन साहित्यातून होत असते…
आजूबाजूला घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना,प्रसंगाना निवडून त्याची स्वतःच्या कल्पनेतून पुनर्रचना करून केलेली नवनिर्मिती म्हणजे साहित्य… आणि ती निर्माण करणारा… साहित्यिक..!!
निर्माण केलेल्या साहित्यात समाजाचं प्रतिबिंब असतं.. मुळातच ती समाजाची अभिव्यक्ती असते…ज्यात केवळ मानवी हिताचाच विचार असतो.. समाजासह मानवी हितासाठी केलेलं लेखन म्हणजेच साहित्य..!!
साहित्यिक समाजाच्या भावभावना, आशाआकांक्षा, सुखदुःखाना शब्दरूप देतो… त्याचं लेखन वाचकासाठीच असतं… वाचकच नसेल तर लेखनाला अर्थ उरत नाही…जे वाचलं जात नाही ते लिहिणं म्हणजे निव्वळ मूर्खपणाचं..!!
वाचकांची अभिरुची सगळ्यात महत्वाची…आणि हे लक्षात ठेवून लेखन करणारा साहित्यिक इतरांपेक्षा सरस ठरतो…साहित्यातील वेगवेगळे प्रकार साऱ्यांनाच आवडतील अस नाही… आणि एकच लेखक हे सारे प्रकार उत्तम लिहू शकेल असही नाही…पण निर्माण केलेल्या कुठल्याही साहित्यकृतीतून मानवीमूल्याचं व्यक्त होणं गरजेचं… आणि हे ज्याला जमतं त्याची साहित्यकृती उत्तम ठरते…
साहित्यात भाषेचं व्याकरण,बोली,साहित्यिक अडाणी की उच्चशिक्षित,ग्रामीण की शहरी, विद्रोही की समांतर याला फारसं महत्व नसतं…प्रतिभा ही परमेश्वरांकडून मिळालेली देणगी आहे… ती जात,भाषा,धर्म,संप्रदाय यावर कधीच अवलंबून नसते…ती उपजतच असते …साहित्यिकाचं लेखन ज्या वाचकांसाठी असतं त्याला ते आपलं वाटलं पाहिजे…आणि हे तेंव्हाच वाटतं जर त्याच्या जगण्याचं प्रतिबिंब त्याला साहित्यात सापडतं..लेखन सहज सोपं वाचकाला कळेल असं असावं…जड जड शब्द वापरून केलेल्या लेखनाचा दर्जा उच्च असतो हा समज ही चुकीचाच…लिखाणात जे मांडायच आहे त्यातही नेमकेपणा असावा…शब्द मर्यादेपेक्षा content महत्वाचा… या सर्व गोष्टी लक्षात ठेवून केलेलं लेखन वाचकाला नक्कीच आवडतं….
साहित्य समाजमनाचा आरसा आहे…मनाच्या तळाशी उठणाऱ्या भावनांचे तरंग जसे चेहऱ्यावर उमटतात…अगदी तस्सच समाजमनात उठणाऱ्या भावनांचे,जाणिवांचे तरंग साहित्यात उमटले पाहिजेत… अन्न, वस्त्र, निवारा या भौतिक गरजां बरोबरच माणसाची भावनिक,मानसिक,बौद्धिक गरजही तेवढीच महत्वाची… आणि ती भागवण्याची ताकद नक्कीच साहित्यात आहे… याचं भान ठेवून निर्माण केलेली कुठलीही साहित्यकृती सुंदरच …आणि ती निर्माण करणारा लेखक …माणूस म्हणूनही तितकाच सुंदर असेल..!!

— प्रा.अरुण खांडेकर
Prof. Arun Khandekar

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*