डॉ. शुभांगी कुलकर्णी

*** वेगळी पाऊलवाट ***
मानव हा समाजशील प्राणी आहे. मनातलं कुणाला तरी सांगावसं वाटणं ही त्याची आवश्यक गरज आहे. तसा प्रत्येकजण ते करतोही . पण काही ठराविक लोक ते व्यक्त होणं वेगळया रुपात ,अनेक कल्पना वापरून ,अनेक यमक साधत ,शब्दांना अलंकारात ,वृत्तात ,मात्रेत बांधून
लोकांपूढे मांडतात…. ….हा असतो एक लेखक ./लेखिका.
आणि आपल्या अफाट नैपुण्यपुर्ण लिखाणाने ह्या साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी, प्रगती.. सर्वदूर विस्तार , प्रसंगी विविध बदल, क्रांती… आणि थोडक्यात काही तरी समग्र उलथापालथ घडवून आणतो तो असतो
एक साहित्यिक.
मग साहित्यिक म्हटल्यावर तो प्रत्येक प्रकारात ( ललित , आत्मचरित्र , .प्रवासवर्णने , कथालेखन ,ऐतिहासिक ,विनोदी लेखन ,साहसी किंवा थरारक , निसर्ग वर्णनात्मक …. काव्य…. इत्यादीत ) प्रविण असणं गरजेचं नाही का……???
ह्यात समग्र व्याकरण ,नियम ,शुध्द लेखन ही येणारच.
मग हा एवढा गाढा अभ्यास आपला आहे का….??
असला तरी इतकी कुशलता,इतकं आपलं नैपुण्य आहे का…..??
हा व्यापक विचार ही साहित्यिक धुरा , हा संत साहित्यापासून अगदी अलिकडच्या विद्रोही साहित्य पर्यंत चा वारसा जपतांना आपण करायला नको का…..??
फक्त दोन ओळी लिहीणं म्हणजे साहित्य का…??
कदाचित ते आपलं फक्त व्यक्त होणंच असावं .
त्या सर्व निकषांवर आपण खरे उतरतो का हा सारासार विचार प्रत्येकाने एकदा जरुर करावा नी…. स्वतःच ठरवावं…. # साहित्यिक कोण ….??
साहित्यिक होणं सोपं नाही. एक सखोल शास्त्रोक्त अभ्यास आहे तो. ” तेथे पाहिजे जातीचे , ऐ-या गबाळ्याचे काम नाही….”” !!
आणि आपली अवस्था आपण चांगली च जाणतो.
म्हणूनच मी तर स्वतःला साहित्य प्रेमी समजेल….!! त्या ही पुढे जाऊन … साहित्य उपासक म्हणेल ….. !!
खरं तर त्या वेळच्या साहित्याची ती गरज म्हणावी लागेल.
ह्या साधनेसाठी त्या साहित्यिकांना पुरेसा वेळ उपलब्ध झाला. नी तो त्या काळच्या साहित्यिकांनी खरोखरच सत्कारणी लावून आपल्या समोर हा आदर्श ठेवला.
पण …. ,बदलत्या काळागणिक सामाजिक ,आर्थिक परिस्थिती बदलत जाते…..! जगण्याची मुल्य ही बदलत जातात .तद्वतच हा बदल साहित्य क्षेत्रात ही होत च जातो आणि ते खूप सहाजिक आणि नैसर्गिक आहे.
मग आजच्या ह्या धकाधकीच्या आणि बिन भरवश्याच्या
आयुष्यात ,जेंव्हा श्वास घ्यायला ही फुरसत नाही हे विदारक सत्य असतांना….. मागचे हे त्या काळचे निकष आपण सध्याच्या साहित्यिकांना कसे लावू शकतो…..??
ते लावणे योग्य होईल का……????
त्यावेळी शब्द सोन्यात तोलले जायचे….. म्हणजे एवढा मान होता. शब्दांनी त्यावेळी मान , पान, पत ,प्रतिष्ठा ,पैसा
सर्व च दिलं… !! एक साहित्यिक होऊ घालता.. एव्हढा वेळ जरी दिला तरी शब्दांनी पोट भरले जात नाही….. हे तर ज्वलंत सत्य. ते कसे नाकारणार….??
तो साहित्यिक होतोयं बरं…..!! हे सांगणार…. ??त्याच्या जिम्मेदा-यांचं काय करायचं….. ?? हा ही विचार व्हायला हवा…..!!
म्हणून आजच्या कालानुरूप सामाजिक आणि आर्थिक निकष नाही का लावावे लागणार…… ??
मग साहित्याची व्याख्या ही त्या अनुषंगाने बदलत जाणार.
थोडक्यात मी असं म्हणेन होता होईल तेवढे सहज ,सुलभ नी सरळ कुठलाही अभिनिवेश धारण न करता व्यक्त होणं म्हणजे तो साहित्यिक असल्याचे लक्षण.
दोन क्षण आपल्या लिखाणाने समोरच्या मनाला भिडणे म्हणजे तो लेखक .
भले ही अंगठे नका देऊ पण ” साला हे सगळं तर आपलंच ” असं अस्फुट तोंडातून फुटणं म्हणजे तो लेखक.
सामाजिक बांधिलकी शब्दांतून जागवणं म्हणजे तो लेखक.
समोरच्या ची वेदना, सल बोच ,सहज आपल्या शब्दांतून मांडणं म्हणजे तो लेखक.
सगळ्यातलाच एक होणं म्हणजे लेखक .
समाज भान ठेवत समाज हित साधणं ते ही शब्दांतून म्हणजे लेखक .
आणि जगण्याच्या लढाईत लोकांचा दुर्दुम्य आशावाद जागृत ठेवणं…आपल्या लिखाणातून.. म्हणजे खरा लेखक.
मग हे जीवंतपण कुठल्या मानबिंदूत तोलणार……???
कुठले निकष लावणार……..????
आणि ह्याच निरागस ,निखळपणातून ,सच्चेपणातून
निर्माण होईल लेखकांची एक वेगळी पाऊलवाट….. जिथे
शब्दांतुन कधी ग्रेस च्या कवितेतील दुःख दिसतील…. कधी कुणाच्या निसर्गवर्णनातुन बालकवी डोकावतील.
कुठे जीवनाच्या संघर्षातून… अचानक मर्ढेकरांचा विद्रोह
जाणवेल…. कुणाच्या शब्दांतून शांताबाई नी बहिणाबाईंचा ही भास होईल…….तर कुणाच्या शब्दांतून पु.लं ची कोटी( विनोद )ही दिसेल.
आणि हेच असेल आजच्या काळाचं साहित्य.
आजच्या साहित्याची नवनिर्मीती……
आणि सापडेल माणसाला माणूस म्हणून शब्दांनी जोडणारा खरा साहित्यिक .!!…कारण जर आधी माणूसच माणसापर्यंत पोहंचत नसेलतर इतक्या अफाट साहित्याचा उपयोग काय….??काय करायचं त्या साहित्याचं…??
ही काळाची नी आजच्या पाँकेटबुक साहित्याची गरज असेल.
हेच असेल येणाऱ्या नव्या पिढीच्या साहित्यिकाचं होऊ घातलेलं…. द्योतक .
साहित्याची चिंता नसावी.साहित्य काही कुठं जातं नाही.
ते कधीही लोप पावणार नाही.फक्त त्याची व्याख्या ,त्या ची संहिता काळानुरूप बदलत जाईल एवढंच.
जोपर्यंत जगणं आहे ,तो पर्यंत साहित्य राहणारचं….
आणि साहित्यिक ग्रुपची साठ हजार संख्या त्याचंच फलीत.
पण ह्या नव्या लेखकांनी साहित्यिक न होता साहित्य प्रेमी व्हावं , साहित्य उपासक व्हावं .(माझ्या सहीत )
मागच्या साहित्यिकांचा आदर्श घ्यावा.
सखोल अभ्यास करावा….. अफाट वाचन जेंव्हा जमेल तेंव्हा करावं हि मात्र मी विनंती जरूर करेन
कारण….. “वाचाल तर वाचाल….” !!आणि ह्या अभ्यासातून
दर्जेदार , कसदार , शुद्ध ,सकस नी सृजनात्मक
निर्मिती करावी.
व पुं च्या भाषेत सांगायचे तर ” वाचक हा दुसरा लेखकच असतो .” म्हणून वाचक जी उपाधी आपल्याला देतात ती खरी आपली जागा .
असो.
माझं प्रांजळ मत मी व्यक्त केलंय. त्यात काही चुक झाली असेल तर मोठ्या मनाने क्षमा असावी.
आणि थोडा लांबलाय लेख पण पर्याय नव्हता. त्यामुळे
पुर्ण वाचून च प्रतिक्रिया द्यावी ही कळकळीची विनंती.

— डॉ. शुभांगी कुलकर्णी  (जालना)
Dr. Shubhangi Kulkarni, Jalna

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*